हा संप यशस्वी झाला का ? २० दिवस रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती का ? एवढा मोठा संप कोणत्या मागण्यांसाठी झाला होता ?
भारतात दररोज अनेक उठाव, मोर्चे, उपोषण, संप, निषेध, प्रदर्शने होताना आपण बघत असतो. त्यातही विविध रेकॉर्ड मोडले जातात, पण १९७४ साली एक संप इतक्या मोठ्या स्तरावर झाला की त्याचा रेकॉर्ड जगात कुठेही मोडल्या गेलेला नाही. १९७४ साली मे महिन्यात भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला जो चक्क २० दिवस म्हणजे ८ मे ते २७ मे पर्यंत चालला आणि एकूण १७ लाख कर्मचारी ह्या संपात सहभागी झाले.
हा संप इतका भयंकर होता की त्यांनी इंदिरा गांधी सरकार हादरून सोडले, संप मोडण्यासाठी सरकार कडून वाट्टेल ते प्रयत्न झाले, हजारो लोकांना पकडून जेल मध्ये डांबले, हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले पण त्यांची एकी मोडली नाही. इंदिरा गांधी सरकार अश्या रीतीने कात्रीत पकडले गेले होते की त्यांना ह्या संपानंतर भारतात अश्याच अनेक कारणांमुळे आणीबाणी (emergency) लागू करावी लागली होती.
जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे युनियन लीडर म्हणून या संपाचे म्होरक्या होते, त्यांनी या संपासाठी घोषवाक्य बनवले होते, “बेटर इन जेल, देन इन रेल”. हा संप फसला असे सरकार कडून सांगण्यात आले होते, पण त्याचे चांगले परिणाम नंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना नक्कीच मिळाले. नंतर अनेक अभ्यासकांनी आणि संस्थांनी या संपाचा अभ्यास केला, अनेक पुस्तके तसेच प्रबंध यावर लिहिले गेले. कर्मचारी, सरकारी संस्था आणि युनियनचा अभ्यास करण्यासाठी हा मोठा धडा होता. स्वतंत्र भारतातील हा पहिलाच इतक्या मोठया प्रमाणात झालेला संप होता.
काय कारणं असतील इतक्या मोठ्या संपा मागे ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे मध्ये ब्रिटिश काळा पासून एक ट्रिपच्या वेळेप्रमाणे कामाचे तास ठरत. म्हणजे एखादी रेल्वे ३६ तास रुळावर धावत असेल तर त्या संबंधी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सलग ३६ तास असत. सलग तासंतास काम करावं लागे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतके वर्ष हीच परंपरा सुरू राहिली. कामाचे तास इतर नोकरदारांसाठी जसे दिवसाचे ८ तास ठरले होते त्याप्रमाणे रेल्वेमध्ये ही शिफ्ट ८ तासांच्या असाव्या, अशी पहिली मागणी होती. दुसरे म्हणजे, पगारवाढ अनेक वर्षे मिळालीच नव्हती. ३रा वेतन आयोग लागू झालेला असून सुद्धा रेल्वे मध्ये पगार कित्येक वर्षं स्थिर होते,तसेच बोनसही मिळत नव्हता.
फर्नांडिस यांचे म्हणणे होते की, पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये कमीतकमी ४५ डॉलर्स वेजेस मिळत असे आणि त्यावर बोनस सुद्धा मिळत असे तेही वर्षातून २ ते ३ वेळा किंवा त्या कंपनीला झालेल्या नफ्या प्रमाणे बोनस मिळे. पण रेल्वे मधील कर्मचाऱ्यांना फक्त २६ डॉलर्स महिन्याला पगार मिळत असे आणि बोनस तर बिलकुल मिळत नव्हता. बाकीच्या सरकारी खाणी, स्टील मिल, वीजनिर्मिती या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असे.
रेल्वे ही सरकारी संस्था असूनही त्यातील कर्मचाऱ्यांना सरकारी सवलती मिळत नव्हत्या उलट त्यांना इंडस्ट्रीचे नियम लावले जात असत. अश्या कारणांमुळे रेल्वे मध्ये अनेक वर्षे संप होत होता. १९६७, १९६८, १९७०, १९७३ आणि १९७४ चा सगळ्यात मोठा संप ज्यात रेल्वेच्या ७०% परमनंट कर्मचारी सहभागी झाले, २० दिवस चाललेल्या ह्या संपामुळे मोठे नुकसान झाले. संपूर्ण देशात जणू चक्का जाम झाला होता. एक दिवस तर बाकीच्या बऱ्याच संस्थेचे कर्मचारी सुद्धा, रेल्वेच्या समर्थानासाठी संपात उतरले, ज्यामध्ये बँक, इन्शुरन्स कर्मचारी होते, वरंगळ येथील जेल मध्ये मोठे मोठे कर्मचारी १८ महिन्यासाठी बंदी करण्यात आले आणि इंदिरा गांधी सरकारला मोठी नाचक्की सहन करावी लागली.
सरकार अन्नसाठा पुरेसा ठेवण्यास असमर्थ होती, तसेच रेल्वे विस्कळीत झाल्याने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती. सुमारे ३००० रेल्वे युनियन मधील लोकांना अटक झाल्याने त्यांनी सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत बोलणी करण्यास नकार त्यांनी दिला. पण २७ मे ला त्यांना संप मागे घ्यावा लागला. सरकारने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या आणि असे कारण दिले की जर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर देशावर ७०० दशलक्ष डॉलर्सचा भार येईल आणि त्यांचे बघून ईतर युनियन सुद्धा अश्या मागण्या मागतील.