‘मॅन ऑफ द मॅच’ हा अवॉर्ड एका सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो पण क्रिकेटच्या इतिहासात अश्या ३ घटना आहेत जेव्हा एका खेळाडूला नव्हे तर पूर्ण टीमलाच ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलेले
क्रिकेट हा एक सांघिक खेळ म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे, भारतात तर क्रिकेट हा नुसताच खेळ नाही तर एक धर्म आहे असे आपण मान्यच केलं पाहिजे, इतक्या प्रचंड प्रमाणात लोक ह्या खेळावर प्रेम करतात. आजपर्यंत कित्येक विश्वविक्रम या खेळात नोंदवले गेले आणि प्रत्येक सामन्यात एक नवीन कहाणी लिहिल्या जाते !
हा सांघिक खेळ असल्याने सर्व ११ खेळाडूंचा ह्यामधे मैदानातील खेळ खूप महत्वाचा ठरतो. तरी पण काही खेळाडू अगदी असामान्य कामगिरी करून हरलेला सामना जिंकवून देतात तर काहींच्या अगदी सुमार झालेल्या कामगिरीमुळे हातात आलेला सामना, निघून जातो. सामना संपल्यावर प्रत्येकवेळी उत्सुकता असते ती, ‘ सामनावीर ‘ (man of the match) कोण ठरलं हे जाणून घ्यायची.
ICC (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) ने सामनावीर कोणाला द्यावा असे खूप नियम केले नसल्याने, हरलेल्या संघातून सुद्धा सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू सामनावीर होऊ शकतो. पण संपूर्ण क्रिकेटच्या इतिहास असे फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा फक्त एक खेळाडू नाही तर संपूर्ण संघच सामनावीर ठरला !
१) ३ एप्रिल १९९६ – न्यूझीलँड विरुद्ध वेस्टइंडिज
न्यूझीलँडने ३५.५ ओव्हर्स मध्ये १५८ धावा काढल्या. वेस्टइंडीज सारख्या शक्तिशाली आणि बलाढय संघासाठी हे लक्ष्य फारच छोटे होते, परंतु न्यूझीलँड संघाने एकत्र मिळून आश्चर्यकारक कामगिरी करत, वेस्टइंडीज संघाला ४९.१ षटकात फक्त १५४ धावा करू दिल्या आणि ४ धावांनी त्यांच्यावर विजय मिळविला. संपूर्ण संघाची कामगिरी इतकी महत्वपूर्ण आणि उत्तम होती की शेवटी संपूर्ण संघालाच सामनावीर म्हणून घोषित केले गेले.
२) १ सप्टेंबर १९९६ – पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड
पाकिस्तानी संघाने एकता दाखवत एकत्र खेळलेले सामने अगदीच बोटावर मोजण्या इतके असतील. एकमेकांमधील मतभेद जगविख्यात आहेत तरीही असे असूनही, न्यूझीलँड नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये संपुर्ण संघाला सांघिक कामगिरी बद्दल सामनावीर मिळविणारा हा जगातील दुसरा संघ ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून एक मजबूत स्कोर उभा केला. पाकिस्तान समोर २४६ धावांचे लक्ष्य होते. या आशियाई संघाने दोन विकेट राखून हे लक्ष्य गाठले. खरे तर निक नाईट ह्या इंग्लिश खेळाडूने नाबाद १२५ धावा काढल्याने त्याला सामनावीर घोषित करणे अपेक्षीत होते, परंतु पाकिस्तानी संघाला एकीने खेळल्यामुळे संपूर्ण टीमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
३) १५ ते १८ जानेवारी १९९९ (टेस्ट मॅच) – वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा एकमेव सामना असा आहे की संघातील सगळ्याच्या सगळ्या आकरा खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच बक्षीस मिळाले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने आधी फलंदाजी करत ३१३ धावा केल्या. जेव्हा कॅरेबियन संघ फलंदाजीसाठी गेला तेव्हा त्याने पहिल्या डावात फक्त १४४ धावा केल्या.
ह्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली, आता त्यांनी दुसऱ्या डावात ३९७ धावा अजून काढल्या. आता वेस्ट इंडिज समोर ५६९ धावांचा डोंगर होता परंतु त्यांनी त्याचे उत्तर म्हणून फक्त २१७ धावा केल्या. या सामन्यामध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंनी शतके झळकविली, बॉलर्सनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे एकंदर सामना बघता शेवटी संपूर्ण संघालाच सामनावीर किताब देण्यात आला.