मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या पाच दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी आणि लक्ष्मीकांत बर्डे ह्यांनी मिळून मराठी चित्रपटाला पडत्या काळात नवसंजीवनी दिली होती, ८०चे पूर्ण दशक आणि ९०च्या दशकातील काही वर्षे पडद्यावर फक्त ह्या दोघांचेच राज्य होते. चित्रपट हिट करायचा फॉर्म्युला म्हणजे त्यात ही जोडी असणे हे समीकरण पक्के झाले होते.
“जे आपल्याला हवं ते आपल्याला मिळतंच फक्त आपल्याला मनातून जबरदस्त ईच्छा असायला हवी “
अशोक सराफ ह्यांचा जन्म ४ जून १९४७ ह्या दिवशी साऊथ मुंबईतील चिखलवाडीला झाला, त्यांचे वडील इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय करायचे. त्यांची पण त्यांच्या मुलाकडून सामान्य पालकांची असते तशीच अपेक्षा होती, चांगले शिकून चांगली नोकरी करावी. पण ह्या अतरंगी मुलाच्या मनात अभिनयात शिरण्याचे बेत शिजत होते, तरीही वडिलांच्या हट्टा पुढे त्यांचे काही चालले नाही. मग काय त्यांनी मनाविरुद्ध बँकेतील नोकरी स्वीकारली, नुसती स्वीकारलीच नाही तर नेटाने पुढील १० वर्षे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ते नोकरी करत राहिले. अधे मधे आपली आवड जिवंत राहावी म्हणून नाटकात छोटे रोल करत राहिले.
हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल की विनोदी भूमिकांमध्ये ज्यांना ध्रुव-पद मिळाले आहे त्यांच्या अभिनयाची सुरुवात सुध्दा एक विदूषकाच्या भूमिके पासून झाली. प्रसिद्ध लेखक ‘वि.स. खांडेकर’ ह्यांनी लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका केली. कदाचित हाच नियतीचा एक सिग्नल होता की जो माणूस पुढे लोकांना हसवून लोटपोट करणार होता त्याचा प्रवास विदूषकाची भूमिका करून सुरू होणार होता.
कसा सुरू झाला चित्रपट प्रवास ?
त्यांच्या भूमिका बघून त्यांच्यातील प्रतिभा ओळखून, गजानन जहागीरदार यांच्यासारख्या मराठी सिनेमातील मोठ्या दिग्दर्शकाने त्यांना एक रोल दिला. रोल खूप लहान होता आणि पैसा पण खूप नव्हता. पण ह्यातून काहीतरी खास साध्य झालं, ते म्हणजे मोठ्या स्क्रीनवर अशोक सराफ यांची उपस्थिती प्रेक्षकांना जाणवली होती. १९७१ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे नाव ‘दोन्ही घरचा पाहुणा’ होते.
चित्रपट प्रवासाला सुरुवात तर झाली, परंतु चित्रपटातील यश बघायला चार वर्षे जाऊ द्यावी लागली. १९७५ ला दादा कोंडकेच्या ‘पांडु हवालदार’ चित्रपटाद्वारे त्यांनी प्रथम यश काय असते ते अनुभवले आणि ते पण असे की परत कधी ह्या मार्गात अपयश आलेच नाही, आणि वेग पण इतका होता की त्या वेगात फक्त लक्ष्मीकांत बर्डेच त्यांच्या बरोबर धावू शकले, बाकी कोणी आसपास सुद्धा आले नाही.
कॉमेडीचा बेंचमार्क !
बेंचमार्क म्हणजे एक माप ज्याच्या आधारे मूल्यांकन केले जाते. अशोक सराफ यांच्या कॉमेडीला मराठी सिनेमा विश्वात एक खासच जागा मिळाली होती. त्यांनी वल्गर हावभाव आणि थोबाडीत मारून विनोद निर्मिती केलेल्या दृश्यांपेक्षा एक स्वच्छ आणि निखळ विनोद काय असतो ते दाखवून दिलं. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत-जम्मत’, ‘धूम धाडका’ आणि ‘एक पेक्षा एक’ अशा चित्रपटांमधून त्यांनी स्वतः ला सिद्ध केले.
सगळ्या इंडस्ट्रीचे ‘मामा’ !
अनेकांना टोपण नावाने ओळखले जाते किंवा काही नावं प्रेमाने मिळतात. अशोक सराफांना पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत मामा ह्या नावाने ओळखले जाते, त्या मागे एक मजेदार किस्सा आहे. ७०च्या काळात कोल्हापूरला एका चित्रपटाचे शूट चालले होते आणि तिथला कॅमेरामन होता ‘प्रकाश शिंदे’. तो त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन शूटींगला येत असे आणि त्या मुलीला त्याने हा अशोक मामा अशी ओळख करून दिली. थोड्याच दिवसात सेट वरील सर्वच लोक त्यांना मामा म्हणू लागले आणि हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले !
रंजना ते निवेदिता जोडी जबरदस्त !
त्यांची जोडी मराठी अभिनेत्री रंजना बरोबर प्रेक्षकांना खूप आवडली. त्या दोघांची जोडी अगदी शाहरुख-काजोल किंवा अमिताभ-रेखा यांच्या जोड्या सारखीच मराठी मध्ये गाजली. त्या दोघांच्या सिनेमाला प्रचंड फॅन-फॉलो-अप मिळत असे. विनोदी अभिनेत्याच्या रूपात एक ठसलेली ओळख असूनही, त्यांनी रोमँटिक हिरो म्हणून ओळख मिळवणे ही एक मोठी बाब होती. अशोक सराफ यांचे एक अतिशय गाजलेले रोमँटिक गाणे ‘अश्विनी ये ना’ विशेष म्हणजे हे गाणे ‘किशोर दा’ यांनी अशोक सराफांसाठी गायले आहे.
अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी पण त्यांची जोडी चांगलीच प्रसिध्द झाली आणि नंतर दोघांनी लग्न देखील केले. त्यांना एक मुलगा आहे, अनिकेत. त्याने अभिनेता बनण्याऐवजी शेफ म्हणून करियरची निवड केली आहे.
मराठी आणि हिंदी !
हिंदी सिनेमाचे म्हणाल तर, हिंदी चित्रपटसृष्टीने अशोक सारफ यांची प्रतिभा योग्यरीत्या वापरलीच नाही. त्यांना योग्य भूमिका देऊन योग्य न्याय केला नाही. तिथे त्यांना कायम लहान भूमिकेत ठेवले गेले, ते हिंदीत केवळ कॉमिक रिलीफ म्हणून वापरले जात. त्यांनी मात्र कायम मिळालेल्या संधीचे सोने केले, त्यांच्या विशिष्ट शैलीने ते कायम प्रेक्षकांना लक्षात राहिले. मग तो रोल ‘करण अर्जुन’ मधील मुन्शी असो की “येस बॉस” मधील शाहरूखचा मित्र, “सिंघम” मधील हेड कॉन्स्टेबल आणि “जोरू का गुलाम” मधील गोविंदाचा मामा.
अशोक सराफची प्रतिभा लहान पडद्यावर पण छाप पाडून गेली. ‘हम पांच’ या मालिकेतील आनंद माथूर कोण विसरू शकेल का ? किंवा, सहारा टीव्हीवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ सीरियल, ही मालिका अशोकच्या पत्नी निवेदिता यांनीच निर्माण केली होती.
सुमारे पाच दशकांपूर्वी अशोक सराफ यांची चालू झालेली ही हास्य यात्रा अजूनही सुरू आहे. ‘शेंटीमेंटल’ या मराठी सिनेमात त्यांनी पुन्हा खाकी वर्दी घातली होती. त्यांचे सगळे चाहते हीच प्रार्थना करतात की, त्यांचा प्रवास असाच पुढे चालू राहो. त्यांना स्क्रीनवर पहाताना, आपल्या चेहर्यावर एक मोठ्ठं हसू असण्याची खात्रीच आहे !