हिरवी नंबर प्लेट काय प्रकार आहे? कोण लावू शकेल हि प्लेट? आणि ह्या वाहनांना एवढ्या सवलती का?
मंडळी आपल्या सगळ्यांना माहित आहेच कि भारताला सगळ्यात जास्त आयात करावी लागते ती कच्च्या तेलाची. हे कच्चे तेल भारतामध्ये कमी उपलब्ध आहे आणि त्या प्रमाणात आपली भूक मात्र जास्तच आहे त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात अरब देशांवर अवलंबून आहे. कधी कधी या अवलंबेमुळेच आपल्याला अरब देशांची अरेरावी सहन करावी लागते. वर अजून याच्या वापरामुळे होणारे प्रदूषण वेगळेच त्यामुळे सध्याच्या घडीला भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती कच्च्या तेलाची आयात असं म्हणायला हरकत नाही.
यावर पद्धशीरपणे उपाय करण्यासाठी भारत सरकारने अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत, यामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे, आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे याचा समावेश महत्वाचा आहे. याआधीसुद्धा कार बनविणाऱ्या कंपन्यांना सरकारने बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार इलेक्ट्रिक वाहनांना अधिक महत्व द्या असं सांगितलेलं आहे, यामध्ये सध्या महिंद्रा नेतृत्व करताना आपल्याला दिसत पण आहे.
हिरवी नंबरप्लेट कशासाठी?
आता लोकांनी सुद्धा वाहतुकीसाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करावं या हेतूने केंद्र सरकारने या वाहनांना हिरवी नंबरप्लेट देण्याचा निर्णय घेतला आहे सोबतच या वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल सुद्धा द्यावा लागणार नाहीय. केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने भारतातील सगळ्या राज्यांना पत्र लिहून आदेश जारी केले आहेत.
या बदलासाठी २०१४ साली झालेल्या नीती आयोगाने पुढाकार घेतल्याचे समजते, नीती आयोगाने याबाबत एक प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता, यावेळी आयोगाने यासाठी सात मंत्रालय पॉवर, रोड, हेवी इंडस्ट्रीझ यांची मदत घेऊन हा प्रस्ताव तयार करून सरकारला दिला होता. आता याच प्रस्तावाचे अंमलबजावणी सरकार करत असल्याचे दिसत आहे.
कशी असेल हि नंबरप्लेट ?
साधारण कायम असणारी नंबरप्लेटच असणार आहे पण यासाठी विशिष्ठ रंग देण्यात आला आहे. म्हणजे नंबरप्लेट पूर्णपणे हिरव्या रंगात असेल आणि मग त्यावर वाहनाचा नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे, ज्यामुळे ते वाहन प्रदूषणमुक्त गणले जाईल आणि सरकारच्या सगळ्या सवलतीचा लाभ घेऊ शकेल.
सध्या कोणत्या नंबरप्लेट आहेत ?
नंबरप्लेट मध्ये रंगाचा बदल एका ठराविक वाहनांसाठी करण्याची हि पाहिलंच वेळ नाही, भारतामध्ये सध्या खासगी वाहनांना पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी, टेस्ट ड्राईव्हसाठी लाल आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट देण्यात आली आहे.