हरीश साळवे ह्यांच्याकडे एखादी केस आली तर त्यात यश नक्कीच मिळते असा त्यांचा लौकिक आहे आणि ह्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्याला आला आहे.
हरीश साळवे हे नाव कित्येकांना आधी माहिती असेलच पण आता ह्या नावाची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होऊ लागली आहे. हरीश साळवे हे देशातील अत्यंत हुशार आणि यशस्वी वकिलांपैकी एक. हरीश साळवे ह्यांच्याकडे एखादी केस आली तर त्यात यश नक्कीच मिळते असा त्यांचा लौकिक आहे आणि ह्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्याला आला आहे. कुलभूषण जाधव खटल्याप्रकरणी अंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला व ह्या विजयाचे प्रमुख शिल्पकार होते जेष्ठ विधिज्ञ हरीश साळवे.
कुलभूषण जाधव ह्यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया करणे हे आरोप ठेवून अटक केली होती. पाकिस्तानी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील करण्यात आले. कुलभूषण जाधव ह्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यासाठी हरीश साळवे ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हरीश साळवे हे देशातील एक अत्यंत महागडे वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. ते एका केससाठी एका दिवसासाठी २५ ते ३० लाख रुपये आकारतात. केवळ न्यायालयात हजर राहण्यासाठी हरीश साळवे लाखो रुपये घेतात असे म्हटले जाते. पण कुलभूषण जाधव ह्यांची केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढतांना त्यांनी केवळ एक रुपया मानधन घेतले होते. देशभक्ती काय असते ह्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या ह्या कृतीतून नक्कीच आला असेल.
तर दुसरीकडे पाकिस्तानची बाजू मांडणारे खावर कुरेशी ह्यांना तब्बल २० कोटी रुपये देण्यात आले होते असे समजते. केम्ब्रिज विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतलेले खावर कुरेशी ह्यांना २० कोटी रुपये दिल्याचे पाकिस्तानने आपल्या संसदेच्या सभागृहात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सांगितले होते. एकीकडे जेष्ठ व अनुभवी असलेले हरीश साळवे ह्यांनी केवळ १ रुपया मानधन घेऊन भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवून दिले तर दुसरीकडे तब्ब्ल २० कोटी रुपये घेऊन सुद्धा खावर कुरेशी ह्यांना पाकिस्तानची बाजू समर्थपणे मांडता आली नाही.
हरीश साळवे ह्यांनी केवळ १ रुपया मानधन आकारल्याची माहिती माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांनी १५ मे २०१७ ला ट्विटरवर दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला मानवाधिकार व व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी चांगलेच फटकारले आहे. ह्याप्रकरणी १६ पैकी १५ न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने निकाल देतांना कुलभूषण ह्यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करावी असे निर्देश दिले आहेत.
असा झाला हरीश साळवे ह्यांचा आजवरचा प्रवास
धुळे जिल्ह्यातील वरुड गावी जन्मलेल्या हरीश साळवे ह्यांना वकिलीचे धडे सर्वप्रथम घरातूनच मिळाले. त्यांचे आजोबा पी.के. साळवे हे क्रिमिनल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा जज (न्यायाधीश) होते. हरीश साळवे ह्यांनी आधी सीएची पदवी मिळवली पण त्याकाळी त्यांच्यावर तत्कालीन प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला ह्यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे सीए झाल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. आधी वरिष्ठ वकील व नंतर सॉलिसिटर म्हणून काम केलेले हरीश साळवे ह्यांनी देशातील अनेक मोठमोठ्या केसेस लढल्या आहेत ज्यात कृष्णा-गोदावरी नदीपात्रातील गॅस संबंधीचा खटला, सलमान खान हिट अँड रन केस तसेच वोडाफोन दूरसंचार कंपनी विरुद्ध केंद्र सरकार खटला ह्या व अश्या अनेक खटल्यांचा समावेश आहे.