योग्य आहार – विहार केल्याने आपण दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवू शकतो, हे प्राचीन भारतीय लोक जाणून होते. त्यांनी आपल्याला आयुर्वेदिक शास्त्रातून काही नियम घालून दिले आहेत. ते जर दैनंदिन आयुष्यात पाळले तर, छोट्या छोट्या तक्रारी म्हणजे केस गळणे, थकवा, त्वचेवर डाग, फोड येणे, आळस, पोट कायम बिघडणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या तक्रारी हद्दपार होतील. सगळं खाऊनही वजन न वाढणे किंवा कमी खाऊनही सतत वजन वाढणे ह्याचा अर्थ, कदाचित तुम्ही विरुद्ध अन्न खात असाल.
प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळ्या पदार्थांचा परिणाम शरीरावर वेगवेगळा होत असतो, त्यामुळे एखाद्याला झालेला त्रास आपल्याला होत नाही आणि आपल्याला झालेला त्रास सगळ्यांनाच होईल असे नाही. तरी सुद्धा जे अन्न आयुर्वेदाने विरूद्ध-अन्न सांगितले आहे, ते कोणीही एकत्र खाऊ नये. त्याचे दुष्परिणाम कळत – नकळत प्रत्येकाला भोगावे लागतात. पाहूया कि कोणते खाद्यपदार्थ विरुद्धान्न आहेत आणि ते एकत्र खाणे का टाळावे.
१) दूध : दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर असे काही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होतात. दुधाबरोबर कधीही अंडे, मांस – मच्छी, कांदा, केळ, नमकीन फरसाण, आंबट फळे (लिंबू वर्गीय), मुळा, फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देत नाहीत, दोघांनाही पचायला लागणारा वेळ वेगवेगळा असतो.
कांदा+दूध = त्वचारोग.
आंबट फळे+दूध = पोटाचे विकार.
२) दही : दुधाप्रमाणेच दह्याबरोबर सुद्धा फळे खाऊ नयेत, त्याने कफाचा उद्रेक होतो, कफ फुफ्फुसात जाऊन बसतो आणि infection चा धोका वाढतो. दही आणि उडीद एकत्र खाणे खुप घातक आहे, त्याने अचानक रक्तदाब वाढतो, हृदयविकार होतात. त्यामुळे दहिवडे खाणे आरोग्याला अतिशय घातक आहे.
३) बीयर, कोल्ड्रिंक्स : इत्यादी बरोबर नमकीन शेंगदाणे खूप लोक खात असतात, पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते, कारण बीयर, कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, (dehydration) आणि त्यातच अजून खारट पदार्थ खाल्ले तर शरीरातील सोडियम झपाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनच घटत जाते, ह्यामुळे चक्कर येणे, जीव घाबरणे, उलट्या होणे, घाम येणे अशी लक्षणं दिसून येतात.
४) तूप : सगळ्यात पौष्टिक समजले जाणारे तूप एरव्ही वरदान आहे, पण तूप हे तांब्याच्या भांड्यात कधीही ठेवू नये, त्यामुळे तूप विषारी होते, तसेच तूप आणि मध समप्रमाणात घेतल्यास विष तयार होते.
५) टमाटे+काकडी आणि गाजर+लिंबू : टमाटे व काकडीची एकत्र कोशिंबीर करणे काही शहाणपणाचे नाही, त्यामुळे पोट फुगते प्रचंड गॅसेस तयार होतात. गाजर आणि लिंबू एकत्र केल्याने छातीत जळजळ आणि मूत्रविकार होतात.
६) जेवणामध्ये किंवा नंतर लगेच अतिथंड किंवा अति गरम पेय घेऊ नये, यामध्ये, आईसक्रीम, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी ह्याचा समावेश होतो.
७) मांसाहार करणारे लोक जास्त आजारी पडतात असे निदर्शनास आले आहे, पण त्याचे कारण, मांसाहार करताना त्यासोबत विरुद्व अन्न खाणे हे आहे. मांसाहार करताना बरोबर दूध, दही, चीझ, मोड आलेले पदार्थ, बटाटा, स्टार्च इत्यादी टाळावे, तसेच मांसाहारी पदार्थ तिळाच्या तेलात बनवू नये. नॉनव्हेज बर्गर बरोबर फ्रेंच फ्राईज हे घातक ठरते, पण फॅशन म्हणून सर्रास ते खातांना आपण बघतो, ह्यामुळे शुगर, वजन वाढणे, गॅसेस ह्यांचे त्रास दुपटीने वाढतात.
वेगवेगळ्या हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंटमध्ये सतत विविध चवी देण्यासाठी, कशामध्ये काहीही एकत्र करून नवीन डिश बनवतात. ह्यामुळे आपल्या जिभेचे भरपूर लाड होतात, पण पोट आणि ईतर अनेक अवयवांना हे त्रास भोगावे लागतात. पुढच्या वेळी काही खातांना वरची लिस्ट चेक करायला विसरू नका, कारण आरोग्य चांगले असेल तरच बाकीचे आनंद आयुष्यात आपण उपभोगू शकतो.
Disclaimer : आपल्याला ‘लईभारी’ तर्फे आरोग्य आणि खाद्य पदार्थांबद्दल दिलेली माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दिली गेली आहे. यातील कोणतीही गोष्ट स्वतःवर आजमावून बघण्याअगोदर कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आपले कुठलेही नुकसान झाल्यास त्यासाठी ‘लईभारी’ जबाबदार नाही.