प्रतिभावान दिग्दर्शक नागराज मंजुळेने अनेक संवेदनशील विषय आपल्या चित्रपटांमधून पडद्यावर आणले आहेत. त्याचा सैराट सिनेमा तर प्रेक्षकांना इतका आवडला कि ह्या सिनेमाचे कन्नड, तेलगू, हिंदी ह्या भाषांमध्ये रिमेकसुद्धा बनवले गेले. सैराटनंतर नागराजच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याच्या ह्याच लोकप्रियतेचा फायदा ‘कोण होणार करोडपती’ ह्या शोच्या निर्मात्यांनी उचलायचं ठरवलं आणि ह्या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा नागराजच्या खांद्यावर दिली.
नागराजचे सूत्रसंचालन आणि शोचा फॉरमॅट ह्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोण होणार करोडपतीचा हा सिझन ४५ भागांचा असून त्यासाठी नागराजला २ कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे समजते. सोनी मराठी ह्या वाहिनीवरील कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमाच्या ह्या आधीच्या सीझनमध्ये लोकप्रिय कलाकार स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करतांना आपल्याला दिसला होता. कौन बनेगा करोडपती ह्या हिंदीतील प्रचंड यशस्वी झालेल्या शोच्या धर्तीवर मराठीमध्ये कोण होणार करोडपती हा शो खास मराठी प्रेक्षकांसाठी आणला गेला.
हिंदीतील कोण बनेगा करोडपती ह्या शोचं एकूण बजेट कोण होणार करोडपतीच्या तुलनेत जास्त आहे. तसेच तिथल्या बक्षिसाच्या रकमेतसुद्धा वाढ करण्यात आली आहे. हिंदीतील कौन बनेगा करोडपतीमध्ये स्पर्धक ७ कोटी रुपयांपर्यंत रक्कम घरी घेऊन जाऊ शकतात तर कोण होणार करोडपतीमध्ये जास्तीतजास्त १ करोड रुपयांपर्यंतची रक्कम जिंकण्याची संधी स्पर्धकाला असते. नागराजचा पहिला हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात महानायक बच्चन ह्यांची भूमिका असणार आहे. पहिल्याच चित्रपटात नागराजसोबत अमिताभ बच्चन काम करणार आहेत हि अभिमानास्पद बाब आहे.