पंडित नेहरूंच्या त्या निर्णयाने भारताला पहिलं ‘सरकारी फाईव्ह स्टार हॉटेल’ मिळालं

pandit nehru, jawaharlal nehru, hotel ashok, united nations, first five star hotel, govts five star hotel

“भारत सरकारला आणि पंडीत नेहरुंना हे भव्य फाईव्ह स्टार हॉटेल बांधायची गरज का वाटली असावी ? ह्याची कहाणी फार रंजक आहे.”

काही वास्तुंची निर्मिती जेवढी भव्य असते तशीच त्यांच्या निर्मितीमागची कथा देखील भव्य असते. मग ती ताज महाल सारखी मुघल कालीन वास्तु असो की शिवकालीन वाडे असो वा जमशेदजी टाटांचे ताज हॉटेल असो, ह्यांची भव्यता, सौंदर्य ही त्या वास्तुच्या निर्मिती मागच्या विचारांचीही भव्यता, मेहनत आणि दुरदृष्टीची साक्ष देतात.

भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या इच्छाशक्तीची आणि स्वातंत्र्यानंतर जागतीक पातळीवर आपली देश म्हणून ओळख निर्माण करु पाहणाऱ्या भारताच्या धडपडीची कहाणी सांगणारी अशीच एक वास्तु दिल्लीच्या चाणक्यपुरीत ७० वर्षांपुर्वी बांधण्यात आली होती आणि ती आजही आहे. ती वास्तु म्हणजे भारत सरकारचे पहीले पंचतारांकित हॉटेल “हॉटेल अशोक” ज्याचे सुरुवातीला नाव “हॉटेल अशोका” होते. भारत सरकारला आणि पंडीत नेहरुंना हे भव्य हॉटेल बांधायची गरज का वाटली असावी ? ह्याची कहाणी फार रंजक आहे.

साल होते १९५५ चं, युनेस्कोची पॅरिसला परीषद भरली होती. ह्या परीषदेला नुकताच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरला नेहरुही ह्या परीषदेला उपस्थित होते. त्यावेळी युनेस्कोचे शिखर परीषद भारतात भरवावे अशी विनंती पंडीत नेहरूंनी युनेस्कोला केली आणि ती मान्यही झाली. प्रमुख देशांच्या प्रतिनीधींच आदर आतिथ्य करण्याची आणि भारताची ओळख करुन देण्याची ही संधी पंडित नेहरुंनी सोडली नाही. पण खरा प्रश्न तर पुढे होता.

pandit nehru, jawaharlal nehru, hotel ashok, united nations, first five star hotel, govts five star hotel
(Source – Betterindia)

ह्या परीषदेला येणाऱ्या प्रतिनीधींचे आदरआतिथ्य करणारे जागतिक दर्जाचे संकुल वा हॉटेल सरकारकडे नव्हते. जी थोडीफार होती ती खाजगी मालकीची आणि त्यातही पंचतारांकित मोजकीच. हा पेच सोडविण्याचा मोठा प्रश्न पंडित नेहरु आणि भारत सरकार समोर होता. अशा वेळी त्यांनी सरकारी मालकीचे पंचतारांकित हॉटेल व परीषद हॉल उभारायचा महत्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला. पण हा निर्णय प्रत्यक्षात उतरवणे सोपे अजिबात नव्हते. सर्वात मोठी अडचण होती ती अश्या भव्य वास्तुच्या बांधणीसाठी लागणाऱ्या निधीची. सरकारी तिजोरीला एवढा खर्च परवडणारा नव्हता.

स्वातंत्र्या नंतरही राजघराणी सरकारी योजनांसाठी सहाय्य करीत असत. ह्या गोष्टीचा इथे फायदा झाला. नेहरूंनी राजघराण्यातल्या त्यावेळच्या राजांना सांगितले की मी तुम्हाला ह्या वास्तुसाठीची जमीन उपलब्ध करुन देतो पण तुम्हाला ह्यासाठीचा निधी उभारावा लागेल. राजघराण्यांनी नेहरुंना होकार कळवला आणि ह्या भव्य हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात झाली. काही काळानंतर राजघराणी ह्यासाठी निधी पुरवण्यास असमर्थ ठरली. ह्या बाबतची हकीकत स्वतः सरदार-ए-रियासत डॉ.करण सिंह यांनी सांगितली. ते म्हणाले की आमच्या कडील निधी संपल्याची माहीती आम्ही पंडितजींना सांगितली आणि पुन्हां पेचप्रसंग पंडितजींपुढे उभा राहीला.

pandit nehru, jawaharlal nehru, hotel ashok, united nations, first five star hotel, govts five star hotel
The Ashoka Hotel under construction (Source – Rediffmail)

अखेर सरकारला निधीची व्यवस्था करावी लागली कारण युनेस्कोच्या परीषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रमुख प्रतिनिधी येणार होते आणि त्यासाठीची व्यवस्था वेळेत होणे हे महत्वाचे होते आणि त्यावेळी सरकारने २ कोटींचा निधी उपलब्द करुन दिला आणि हॉटेल अशोकचा पुर्ण खर्च ३ करोड वर पोहोचला. एका वर्षात हे हॉटेल बांधुन पूर्ण करायचे आव्हान बी.ई. डॉक्टर ह्या मुंबईतील वास्तुशिल्पकाराकडे होते. ते त्यांनी लिलया पेलले. हे हॉटेल २५ एकरांमध्ये पसरले होते, ज्यात ५५० रुम, १११ सुट आणि त्यावेळचा दिल्लीतला पहीला खांबविरहीत परीषद हॉलही बांधण्यात आला होता.

‘हॉटेल अशोक’चे बांधकाम आपल्याला भारताच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे आहे. इथल्या कमानी आपल्याला मुघल वास्तुकलेची आठवण करुन देतात, नटराज सुट, काश्मीर सुट, राजपूत सुट हे सर्व त्या त्या इतिहासाचे पुरावे वाटावे इतके हुबेहूब तयार केले आहेत आणि हॉटेलचे नाव भारताचा चक्रवर्ती सम्राट होउन गेलेल्या राजा अशोकाच्या नावाने ठेवण्यात आले आहे. ह्याची अजुन एक खासियत म्हणजे हे हॉटेल बांधुन पुर्ण झाल्यावर तिथल्या बागेत स्वतः पंडीत नेहरुंनी एक आंब्याचे झाड लावले आहे आणि ते झाड अजूनही तिथे उभे आहे.

पंडीत नेहरूंच्या इच्छाशक्ती शिवाय आणि दुरदृष्टी शिवाय हे शक्यच नव्हते. मधल्या संपूर्ण काळात दिल्लीमध्ये बरीच पंचतारांकित हॉटेल उभारले गेले. त्याही उत्कृष्ट वास्तु आहेत पण त्यामुळे काही हॉटेल अशोकने ख्याती गमावण्याचे कारण नाही. खरे कारण म्हणजे बदलत्या काळात हॉटेलच्या डागडुजीच्या बाबतीत केलेला निष्काळजीपणा. सरकारी असल्याने अनेक नेते आणि सरकारी बाबु आपला हुद्दा वापरुन विनापैसा इथे राहु लागले, त्यांच्या मागण्या पुरवण्यात तोट्यात पडलेले हे भव्य हॉटेल आता लिलावात काढण्याची वेळ सरकार वर आली आहे.

pandit nehru, jawaharlal nehru, hotel ashok, united nations, first five star hotel, govts five star hotel
Hotel Ashok built by Nehru (Source – Rediffmail)

हे तेच हॉटेल आहे जिथे पुर्व अमेरीकेचे राष्ट्रप्रमुख बिल क्लिंटन राहुन गेले, जिथे “गांधी” या ऑस्कर मिळवणाऱ्या सिनेमाचे चित्रीकरण झाले. अनेक भारतीयांना ह्या हॉटेलचे ऐतिहासिक महत्व माहीत नाही. नुकताच एअर इंडीयच्या पायलटने हॉटेल अशोक मध्ये राहण्यास नकार दिला होता. सामान्य माणसाला महत्व तेव्हाच पटेल जेव्हा ते सरकारला पटेल. इथे सरकारनेच त्याची वाताहत केली आहे आणि आता त्याला पुन्हा उभारी देण्यासाठीची पंडीत नेहररुंसारखी दुरदृष्टी सध्या कुठल्याच नेत्यामध्ये नाही.

सरकारने इतरही राज्यात असलेले सरकारी मालकीचे हॉटेल लिलावात काढण्याचा विचार केला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हॉटेलच्या आणि अशाच अनेक ऐतिहासिक वास्तुंच्या देखरेखीच्या बाबतील प्रचंड हलगर्जीपणा आपल्याकडे आहे. हॉटेल अशोकच नाही तर अशा अनेक ऐतिहासिक वास्तु आपले वैभव हरवुन बसल्या आहेत आणि मग त्यांची देखरेख नंतर खाजगी कंपण्यांकडे सोपवली जाते. एकप्रकारे आपला इतिहास खाजगी कंपण्यांच्या हातात देण्याचाच हा प्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here