“उद्या निवडून येणारा पुण्याचा खासदार दिल्लीत किती वजनदार ठरतो हा मुद्दा देखील पुण्याचा उद्याच्या विकासात मोलाचा दगड सिद्ध होऊ शकतो “
पुणे…महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पण त्याच बरोबर मुंबई नंतरचं महाराष्ट्रातील दुसरं सर्वात मोठं आर्थिक उलाढाल असलेलं शहर. एस. एम. जोशी, विठ्ठलराव गाडगीळ यांसारख्या मातब्बर लोकनेत्यांचा राजकीय वारसा असलेलं शहर. कोणताही बडेजाव न ठेवता लोकांमध्ये मिसळून अगदी ग्राउंड वरून काम करणारी हि नेतेमंडळी. यांचं कर्तुत्व पुण्याच्या विकासाची चर्चा करतांना नाकारणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल. खरं तर याच नेत्यांनी पुण्याच्या विकासाचा पाया रचला असं म्हटलं तरी चालेल.
पण २०१४ साली आश्वासनांची खैरात वाटून सत्तेत आलेल्या मोदी सरकारकडून अच्छे दिनाची वाट पाहत इथला सामान्य माणूस रस्त्यावरील ट्राफिक मध्येच मोदींची आठवण घरी जाईपर्यंत काढत असतो. हेच विचारत कि कुठे आहे स्मार्ट सिटी ? हेच आहेत का अच्छे दिन ? रात्रीच्या वेळी पुण्यात एक फेरफटका मारल्यास एक गोष्ट मात्र नक्की जाणवते कि आधी असलेले मोठे रस्ते फोडून त्यात भलेमोठे फुटपाथ निर्माण करणे म्हणजेच स्मार्ट सिटी असते, असाच इथल्या सत्ताधाऱ्यांनी स्मार्ट सिटीचा अर्थ घेतलेला दिसतो.
अच्छे दिन आने वाले है…हीच लालूच दाखवीत २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर स्मार्ट सिटी, रोजगार, मुद्रा लोन, शेतकरी योजना, सिंचन यांसारख्या हजारो घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला…पण पुढे काय झालं ? कुठे आहेत मुद्रा योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभे केलेले उद्योजक ? कुठे आहेत दुप्पट कमाई झालेले शेतकरी ? कुठे आहेत स्मार्ट सिटीज ? कुठे आहे सिंचनाच्या योजना ? यांसारखे अनेक प्रश्न सामान्यांना पडलेले आहेत. त्याचं उत्तर द्यायची तसदी मात्र सत्ताधाऱ्यांकडून घेतली गेल्याचं पाहायला मिळत नाही.
एअर स्ट्राईक सारखे भावनिक मुद्दे पुढे करून इतरांनी केलेल्या शौर्याच्या जीवावर पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुण्यात मात्र गेल्यावेळेला जनतेतून निवडून आलेल्या पण परत जनतेत फिरकलेच नाहीत अश्या अनिल शिरोळे याचं तिकीट कापून घरी बसवलं. याचाच अर्थ अनिल शिरोळे याचं पुण्याचे खासदार म्हणून असलेलं अपयश भाजपाने मान्य केलंय का असा प्रश्न आता विचारला जातोय. २०१४ साली गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव अनिल शिरोळे यांना तिकीट देऊन मोदी लाटेत ते निवडून आले खरे, पण यंदा असलेल्या आक्रोशात त्याचं काही खरं नाही हे वेळीच ओळखलेल्या भाजपाने पुण्याची नाडी माहित आलेल्या गिरीश बापटांना तिकीट दिले.
बापटांना तिकीट दिल्यांनतर सुरुवातीला अत्यंत सोपी वाटणारी हि निवडणूक आता कॉंग्रेसने अत्यंत हुशारीने उचललेल्या पावलांमुळे बापटांना अत्यंत जड जाणार हे तर नक्की झालं आहे. त्याचं कारणही तसं मोठ आहे. अनेक नेते पुण्याच्या उमेदवारीसाठी शर्यतीत होते, परंतु शेवटच्या क्षणी माजी आमदार राहिलेले आणि कॉंग्रेस पक्षावर प्रचंड निष्ठा ठेऊन असलेल्या मोहन जोशींना कॉंग्रेसने मैदानात उतरविले अन गिरीश बापटांना भर उन्हात अधिकचा घाम फुटणार हे निश्चित झालं.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले अन सुरुवातीला मिल कामगार असणारे, कॉंग्रेसच्या पुण्यातल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे आणि एक एक कार्यकर्ता जोडत पुण्यातल्या राजकारणात स्थान मिळवणारे मोहन जोशी हे कॉंग्रेस हायकमांडच्या अत्यंत विश्वासू गटातले मानले जातात. दुसरीकडे गिरीश बापट यांच्या बद्दल भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या जवळीकी बद्दल मात्र साशंकता आहे, त्यामुळे उद्या निवडून येणारा पुण्याचा खासदार दिल्लीत किती वजनदार ठरतो हा मुद्दा देखील पुण्याचा उद्याच्या विकासात मोलाचा दगड सिद्ध होऊ शकतो.
पुण्याचे पालकमंत्री असलेल्या गिरीश बापटांनी निवडणुकीचा प्रचार सुरु केलेला असला तरी पुण्याच्या ट्राफिक बद्दल अथवा पुण्यात सातत्याने घटणाऱ्या रोजगाराच्या समस्येबद्दल आणि एकूणच पुण्याच्या भविष्याबद्दल कोणतीही ब्लू प्रिंट न दाखवता केवळ भावनिक मुद्द्यांवर प्रचाराची राळ उडविलेली असतांनाच मोहन जोशींसारखा अभ्यासू अन पुण्याची खडान खडा माहिती असलेला उमेदवार समोर असल्याने लढत तुल्यबळ होणार यात वाद नाहीच. तरी सत्ताधाऱ्यांना वैतागलेले पुणेकर लोकशाहीच्या या महाकुंभात कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार हे २३ मे ला निकाल जाहीर झाल्यावरच कळेलच.