“नाही मासाहेब ! आदिलशाहीविरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. ज्यावेळेस आम्ही इथे विजय मिळवीत होतो, तेंव्हा दक्षिणेत जंजीनजीक महाराजसाहेब (शहाजीराजे) आदिलशाही फासात अडकले. मुस्ताफखानाने विश्वासघाताने आबासाहेबांना कैद केले.”
“शिवबा, काय सांगतोस?” (मासाहेब म्हणाल्या)
“मासाहेब दुर्दैवाची कहाणी अशी कि, आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावध असताना मुधोळच्या बाजी घोरपड्यानं छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची व महाराजसाहेबांची चकमक घडली. शहाजीराजे गिरफतार केले गेले. जे महाराजसाहेब दरबारीसुद्धा हत्तीवरून जात असत, ज्या महाराजसाहेबांचे ऐश्वर्य अदिलशाहीलाही लाजवी, ते शहाजीराजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आणले गेले.”
यावर महाराज पुढे म्हणतात,
“मासाहेब, शिवाजीच्या बापाच्या हाती बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही, हे त्यांना कळून येईल.”
हे वाचून आपल्या लक्षात आलचं असेल कि आपल्या शिवरायांच्या आबासाहेबांना अटक केली आहे. आता पुढे काय ? कसं सोडविणार शिवराय आपल्या महाराजसाहेबांना ? चला आज हीच कहाणी पाहूया व शिवरायांच्या राजकीय चातुर्याचा प्रत्यय घेउया.
शहाजीराजांच्या कैदेमागचे कारण
शहाजीराजांना कैद करण्यामागे मुख्य उद्दिष्ट होते शिवरायांच्या हालचालींना आळा बसविणे. शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या व हेच स्वप्न जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजविले. शिवरायांनी स्वराज्य हा एकच ध्यास घेतला व हनुमानाने जशी बालवयातच सूर्याला पकडण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली तशाच प्रकारे शिवरायांनी लहान वयात सूर्यासारख्या अनेक विशाल शत्रूंशी लढण्यासाठी झेप घेतली.
स्वराज्य स्थापनेसाठी सर्वात महत्त्वाचे होते किल्ल्यांचा ताबा घेणे परंतु बरेचसे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. शिवरायांनी आपली स्वत:ची छोटेखानी फौज तयार केली आणि स्वराज्य निर्मितीच्या कामी लागले. एकेक किल्ले सफाईने शिवाजी महाराज व त्यांचे मावळे मिळवित होते. किल्ले कोंढाणा मोठ्या सफाईने स्वराज्यात सामील केला गेला, तोरणा झाला आणि मग पुरंदर देखील मिळविला. या सर्व हालचालींची खबर आदिलशाही बादशहाला होतीच परंतु शिवाजी अजून लहान आहेत आणि या सार्या गोष्टींना पोरखेळ समजून त्याने याकडे दुर्लक्ष केले. पुढे अजून काही खबरी शिवरायांच्याबदल कानावर आल्या आणि बादशहाने ताबडतोब शहाजीराजांना कळविले परंतु माझा मुलगा माझ्या शब्दात नाही त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल हवा तो निर्णय घ्यावा असे उलट शहाजी राजांनी कळविले.
या नंतर काही कालावधीने फत्तेखान स्वराज्यावर चाल करून येत होता आणि त्याचा सरदार बाळाजी हैबतराव हा सुभानमंगळ येथे थांबला होता. अशावेळी कावजी मल्हार यांनी स्वराज्याची कामगिरी घेतली आणि सुभानमंगळ येथे हल्ला केला, गड घेतला व लूट केली. मग फत्तेखानाने पुरंदरवर चाल केली परंतु त्याला चांगलाच प्रतिकार करून त्याचे सैन्य पळवून लावले गेले. शिवाजीराजांचे हे पराक्रम आदिलशाहीच्या कानावर जाताच अदिलशाहने शहाजीराजे जंजीला असताना वेढा देऊन झोपेत छावणीवर हल्ला करवीला आणि शहाजीराजांना कैद केले.
कैदेनंतर
शहाजीराजांना कैद करण्याचा उद्देश मुळातच शिवाजीराजांच्या हालचालींना आळा बसविणे असा होता. शहाजीराजांना कैद केल्यावर शिवरायांशी पत्रव्यवहार केला व आपल्या वडिलांची सुटका करावयाची असेल तर आपल्या केलेल्या गुन्ह्यांची माफी मागून घेतलेले किल्ले परत करण्याची अट ठेवली गेली. या वार्तेने शिवराय पूर्णतः कात्रीत फसले. इकडे किल्ले देण्यास नकार करावा तर वडीलांचा जीव धोक्यात होता आणि तिकडे वडीलांसाठी विचार करावा तर आजपर्यंत मेहनतीने घेतलेले सर्व किल्ले परत करावे लागणार. काहीही झाले तरी आबासाहेबांना सोडवून आणणे तर पहिले कर्तव्य होते. महाराज मोठ्या संकटात सापडले होते तरी धिराने यातून मार्ग काढू पहात होते.
सुटकेची युक्ति
महाराजांना अचानक एक नामी युक्ति सुचली. आदिलशाही त्या काळात कितीही मोठी वाटत असली तरीही मुघल सत्तेपुढे तिलादेखील झुकणे भाग असे. जर आबासाहेबांना सोडण्याचा आदेश खुद्द मुघल सत्तेकडून दिला गेला तर ? ही युक्ति तशी होती धोकादायक परंतु शिवरायांनी हा मार्ग अवलंबायचा ठरवलं. त्यावेळी मुघल सत्तेवर शाहजहान होता. त्याचा मुलगा मुरादबक्ष म्हणजेच मुराद याचाशी पत्रव्यवहार करण्याचे महाराजांनी ठरविले.
या काळात मुराद औरंगाबादला होता. महाराजांनी मुरादबक्षशी केलेल्या पत्रव्यवहारात लिहिले होते की,
‘आपली चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू परंतु आदिलशाहने विनाकारण आमच्या आबासाहेबांना कैद केले आहे. या कारणामुळे आम्ही संकटात सापडलो आहोत, नाहीतर आपल्या भेटीसाठी आम्ही निश्चितच आलो असतो. आम्हास खातरजमेचे पत्र येताच आम्ही आपल्या दर्शनाला येऊ.’
अशा प्रकारचा संदेश मुरादबक्ष कडे पाठविण्यात आला. उत्तरादाखल, मुरादचा देखील खलिता शिवरायांना आला. त्याचा मजकूर साधारण असा होता की,
‘तुम्ही खातरजमेचे पत्र आल्यानंतर हुजुरास येतो म्हणून लिहिले. ऐसियास आपला वकील आगोदर पाठविणे म्हणजे खातरजमेचे पत्र पाठविण्यात येईल.’
असे पत्र शिवरायांना लिहिल्यानंतर मुरादकडून एक खलिता शहाजी राजांसाठी पाठविला गेला. हा खलिता शहाजीराजे कैदेत होते त्याच ठिकाणी आदिलशाहीला गेला. या खलीत्यासोबतच शहाजीराजांना खिल्लत देखील देण्यात आली आणि आदिलशाहीला लिहिण्यात आले की शहाजीराजांना ताबडतोब सन्मानाने मोकळे करण्यात यावे. शहाजीराजांना आलेल्या या पत्रामुळे त्यांचे मुघलांकडे भारीच वजन आहे असा बादशाहचा समज झाला.
या खलीत्याच्या आदेशानुसार आदिलशाहने शहाजीराजांना सन्मानाने मुक्त केले आणि मानाची वस्त्रे देऊन सन्मान केला, शहाजीराजांसोबत हत्ती, घोडे पाठविण्यात आले आणि सोबतच शहाजीराजांना ‘फर्जन्द’ हा किताब देण्यात आला. अशा तर्हेने सन्मानाने शहाजीराजांना सोडण्यात आले. हे जितके सहज सोपे वाटले तितके सोपे मुळीच नव्हे.
आदिलशाहने शहाजीराजांना सन्मानाने सोडून तर दिले परंतु यासाठी शिवरायांकडे काही अटी देखील ठेवल्या. या अटींनुसार, शिवजींचे थोरले बंधु संभाजी राजे यांनी लढविलेले बंगळूर शहर व कंदर्पी किल्ला बादशहाला परत द्यावा आणि शिवरायांनी बादशाहचा कोंढाणा किल्ला परत करावा. या अटी मान्य झाल्यावरच शहाजीराजांची सुटका करण्यात आली.
या सर्व प्रकारातून शिवरायांची राजनीति आणि दूरदृष्टि किती आणि कशी होती याचा प्रत्यय येतो. राजकीय गरजांनुसार वेगवेगळे डावपेच आखणे, त्या डावपेचांनुसार खर्या-खोट्या शपथा घेणे, बातमी पसरविणे, माघार घेणे इत्यादि सगळ्या प्रकारांत शिवाजी राजे तरबेज होते. शिवरायांच्या या सगळ्या राजकीय हालचालींना शहाजीराजांचे खंबीर पण छुपे पाठबळ होते. शिवरायांनी मासाहेबांना दिलेला शब्द देखील खरा केला, वडिलांना कैदेतून मुक्त केले आणि स्वतःचे चातुर्य आणि शौर्य सिद्ध केले.
शहाजी राजे सुटून आल्यानंतर स्वराज्य निर्मितीची ही कल्पना आता थांबेल वगैरे अदिलशाहला वाटले होते परंतु, उलट हे स्वराज्य निर्मितीचे काम आणखीन जोमाने सुरू झाले. खुला पाठिंबा देता येत नसल्यामुळे शहाजी राजांनी त्यांची विश्वासू माणसे ‘कान्होजी जेधे’ वगैरे खास शिवरायांच्या सेवेसाठी रवाना केली आणि या माणसांनी देखील शिवरायांशी मरेपर्यंत ईमान राखले. अशा तर्हेने शिवरायांच्या हालचालींमुळे अटकेत पडलेले शहाजीराजे पुन्हा शिवरायांच्याच हालचालींमुळे सन्मानाने सोडले गेले.