मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. या शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले.
छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल प्रत्येक माणसाला अभिमान आहेच आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक छोट्यामोठ्या घटनांची प्रत्येक माणसाला पराकोटीची उत्सुकता असते. लहानपणापासून आपण शिवरायांच्या गोष्टी ऐकून वाढलो आणि आजही शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. असाच एक सुवर्णप्रसंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर घडला आणि तो प्रसंग होता शिवरायांचा राज्याभिषेक.
शिवरायांचा राज्याभिषेक हि घटना इतिहासातील सर्वांत महत्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते, या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि याचे परिणाम सुद्धा दूरगामी झाले. आज आपण याच शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल काही रंजक माहिती पाहूया.
काय होता राज्याभिषेक ?
दिनांक ६ जून १६७४ रोजी शहाजी राजांच्या पुत्राने म्हणजेच शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या हेतूने स्वतःचा या स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करविला. याच अभूतपूर्व सोहळ्याला शिवराज्याभिषेक अथवा राज्याभिषेक सोहळा असे म्हटले जाते. शिवरायांनी या राज्याभिषेकासाठी अमाप द्रव्य (धन) खर्च केले आणि सोबतच स्वराज्याचे सर्व मंत्री, सरदार आणि मावळे यांनी मिळून या सोहळ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. हजारो पाहुण्या मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा रायगडावर संपन्न झाला. राज्याभिषेकानंतर स्वराज्याला अधिकृत राज्य हि मान्यता आणि शिवरायांना स्वराज्याचे छत्रपत्री हि अधिकृत मान्यता प्राप्त झाली.
शिवराज्याभिषेकाची गरज
अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो कि शिवराय हे तर आपले राजे, मनापासून आपण त्यांना राजे म्हणतो आणि मानतो देखील, मग राज्याभिषेक करवून स्वतःला छत्रपती घोषित करण्याचा हा आटापिटा महाराजांनी का बरं केला असेल ? सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि, शिवाजी राजांनी स्वराज्य मोहीम उभारली खरी पण तेव्हा त्यांचे स्वराज्य हे पारतंत्र्यात होते. शिवराय ज्या शत्रूंविरोधात लढत होते ते शत्रू आणि बरेचसे मराठे आणि आप्तस्वकीय देखील शिवरायांना शहाजीराजांचा एक विद्रोही पुत्र जो शत्रूच्या राज्यात शिरतो आणि लूटमार, लढाया आणि चकमकी करतो अशीच ओळख देत.
शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..
बाबासाहेब पुरंदरे आपल्या ‘राजा शिवछत्रपत्री’ या पुस्तकात म्हणतात कि, ‘महाराज हे अधिकृत सिंहासनाधिष्टित राजे नसल्यामुळे स्वराज्यातील लोकांना हे स्वराज्य खरे नव्हे असेच वाटत असे. स्वराज्यातील प्रजेला अजून स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झाला नव्हता. यामुळेच आपला खरा राजा कोणता याबद्दल अनेकवेळा प्रजेच्या मनात शंका येत असे. आपला खरा राजा कोणता ? राजनिष्ठा कोणती ? राजद्रोह म्हणजे काय ? असे एक-ना-अनेक प्रश्न रयतेला होते. स्वराज्य असूनही ते अधिकृत नव्हते, संक्रमणकाळ चालूच होता आणि त्यामुळे राजाच्या शाश्वततेबद्दल लोकांना अविश्वास निर्माण होत होता.’
शिवरायांचे अनेक पराक्रम जगजाहीर झाले होते, शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनामनात प्रेम, आदर आणि निष्ठा होती. परंतु त्यांचे हे स्वराज्य अधिकृत नव्हते त्यामुळे शिवराय आपल्या रयतेच्या निष्ठेची अपेक्षा करू शकत नव्हते. सोबतच रयतेच्या कल्याणासाठी काही करार, नियम, अटी व कायदे शिवाजीराजे करू शकत नव्हते कारण त्यांचे स्वराज्य अधिकृत नव्हते. या आणि अशा अनेक कारणांमुळे, आपल्या स्वराज्यनिर्मितीच्या संघर्षाच्या तब्बल ३० वर्षांनी शिवरायांनी आपला दिग्विजय अधिकृत करण्यासाठी राज्याभिषेक करणे पसंत केले.
राज्याभिषेकाची तयारी
राज्याभिषेक करायचे ठरविल्यावर अनेक ठिकाणांहून महाराजांना विरोध झाला होता, याचे कारण असे कि महाराज हे क्षत्रिय नव्हते आणि राजा म्हणून गादीवर फक्त एक क्षत्रिय व्यक्ती बसू शकतो. हा आरोप फेटाळून लावत मराठ्यांनी शिवरायांच्या परिवाराचा इतिहास शोधून हे सिद्ध केले कि शिवाजी भोसले हे राजस्थानातील उदेपूर येथील सिसोदे या राजपूत घराण्याचेच वंशज आहेत, त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक अतिशय वैध आहे. राज्याभिषेक जेथे होणार त्या म्हणजे रायगडावर चोख पहारा असणे आणि सोहळ्याआधी गडाची डागडुजी करून घेणे अत्यंत महत्वाचे होते.
राज्याभिषेकासाठी अनेक मंडळींना आमंत्रित करणे गरजेचे होते, सामान्य रयतेसोबतच देश-विदेशातून देखील अनेक विद्वान, इतिहासकार,अधिकारी, सरदार, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि अशी अनेक मंडळी उपस्थित राहणार होती. या सर्वांसोबतच महत्वाचे होते ते म्हणजे शिवरायांचे सिंहासन आणि गडाची सजावट. सबंध गड डोळे दिपवणाऱ्या थाटात सजविला गेला होता, कसलीही कमतरता गडावर भासत नव्हती इतकी उत्तम व्यवस्था गडावर ठेवली गेली होती. शिवरायांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन खास तयार करवून घेतले गेले, त्याची रचनादेखील पारंपरिक पद्धतीने, आठ खांब जडवून केली होती.
आता सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे आपल्या वेदमंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक पद्धतीने शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न करणारे ब्राह्मण अथवा पंडित. गडावर साधारण १००० ब्राह्मण उपस्थित होते आणि या साऱ्यांसोबतच भोसले कुटुंबाचे कुलोपाध्याय व पुरोहित प्रभाकर भट्ट यांचे चिरंजीव बाळंभट्ट आणि ज्यांचे नाव राज्याभिषेकाच्या सोहळ्यात न चुकता घेतले जाते असे गागाभट्ट उपस्थित होते. हे गागाभट्ट म्हणजेच बनारस येथील विश्वेश्वर होय, त्यांच्या वडिलांनी दिलेल्या गागा या टोपण नावाने ते ओळखले जात.
मूळचे महाराष्ट्रातील असणाऱ्या गागाभट्टांचे पूर्वज महाराष्ट्रातून बनारस येथे मुक्कामास गेले व तिथेच स्थायिक झाले. गागाभट्ट अतिशय नावाजलेले पंडित, त्यांना शास्त्रांचे अतिशय सखोल व उत्तम ज्ञान होते. शिवरायांना जो राज्याभिषेक विधी करण्याची मनीषा होती तो विधी व त्याची पद्धत बऱ्याच कालावधीपासून कोणी हिंदू राजा न झाल्याने लोप पावली होती परंतु, गागाभट्ट असे विद्वान होते ज्यांना हि पद्धत सराईतपणे माहित होती आणि तेच केवळ हे कार्य पार पाडू शकत होते. राज्याभिषेकाच्या अनेक विधींचे वर्णन गागाभट्ट यांनी आपल्या ‘श्री शिवराज्याभिषेक प्रयोग’ या ग्रंथात देखील केले आहे.
राज्याभिषेकाचे परिणाम
राज्याभिषेकामुळे आणि शिवराय आता छत्रपती झाल्यामुळे अनेक परकीय सत्तांवर नैतिक दबाव निर्माण झाला होता. शिवरायांना स्वराज्याचा व रयतेचा संपूर्ण हक्क प्राप्त झाला आणि रयतेच्या कल्याणासाठी व स्वराज्यासाठी कायदे व नियम करणे शिवरायांना आता सोपे झाले. राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच स्वराज्यातील राजपत्रांवर ‘क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नमूद करणे सुरु झाले. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन शक सुरु केला आणि शिवराय शककर्ते राजे झाला आणि या शकाला ‘शिवराज्याभिषेक शक’ असे संबोधले जाते.
शिवरायांनी आपल्या स्वतःच्या स्वराज्यात स्वतःच्या नावाची नाणी पाडली. तांब्याच्या पैश्याला ‘शिवराई’ व सोन्याच्या पैश्याला ‘शिवराई होन’ असे म्हटले जाऊ लागले. स्वराज्यात अधिकृतरीत्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली आणि अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे व जबाबदाऱ्या वाटून दिल्या.
ज्या काळात मुघलांचे राज्य शिखरावर होते त्या काळात शिवरायांनी आपल्या मातृभूमीवर आपले स्वतःचे, रयतेचे, मासाहेब जिजाऊंच्या व राजे शहाजी यांच्या स्वप्नातील स्वराज्य उभे केले आणि त्या स्वराज्याची वाटचाल सुराज्याकडे सुरु केली. हि घटना इतिहासात अजरामर आणि सुवर्ण घटना म्हणून नमूद करावी अशीच आहे. आपण खरे दुर्दैवी कारण आपण या सोहळ्याचे भाग प्रत्यक्ष होऊ शकलो नाही परंतु शिवरायांच्या या सुवर्ण सोहळ्याचे वाचन करून, अभ्यास करून आणि शिवरायांना आठवून आपण हा भूतकाळातील सोहळा मनापासून अनुभवू शकतो. आपुल्या राजा शिवछत्रपतींना मनाचा मुजरा.