भारतीय महिला क्रिकेट संघातील धोनी म्हणून जिला ओळखले जाते, भारतीय महिला क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार व सर्वात जास्त वन डे सामन्यांमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करणारी महिला क्रिकेटपटू, क्रिकेटच्या टी -२० फॉरमॅटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारी फलंदाज जिने टी -२० मध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत रोहित शर्माला सुद्धा मागे टाकले आहे अश्या ह्या महिला क्रीकेटपटूवर एक बायोपिक बनविण्यात येणार आहे.
क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक विक्रम सर करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आहे मिताली राज. तिच्याच आयुष्यावर आधारित एक सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. ह्यात मुख्य भूमिका साकारणार आहे तापसी पन्नू. तापसी पन्नूने नाम शबाना, पिंक अश्या अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयायाची क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ह्या सिनेमात तिला मितालीची भूमिका साकारतांना पाहणे म्हणजे तिच्या फॅन्ससाठी आनंदाची बाब असणार आहे.
तापसी पन्नूने ह्याआधीच हे बोलून दाखवले होते कि जर मिताली राजच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्याची संधी आपणास मिळाली तर ती अतिशय आनंदाची बाब असेल. आता हि संधी तिच्याकडे चालून आल्यामुळे ती नक्कीच आनंदी असेल. एखाद्या खेळाडूची भूमिका साकारणे हे तापसीसाठी नवीन नसून ह्याआधीही तिने सुरमा ह्या चित्रपटात एका हॉकीपटूची भूमिका साकारलेली आहे. “सांड कि आँख” हा तिचा आणखीन एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात ती भूमी पेडणेकरबरोबर दिसेल.