गांधींजींना “महात्मा” अशी उपाधी रवींद्रनाथ टागोरांनीच दिली, तर गांधींजींनीच “गुरुदेव” म्हणून टागोरांना पहिल्यांदा हाक मारली
जेव्हा दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाच्या आणि भिन्न विचाराच्या व्यक्ती भेटतात तेव्हा ते काय वैचारिक देवाणघेवाण करत असतील ? एकमेकांबद्दल मनात काय इमेज बनवत असतील आणि पुढे ते नाते कसे बनत असेल हा माझ्या साठी अगदी कुतूहलाचा विषय आहे, कारण आजकाल आपल्याला पटले नाही तर पटकन नाती तोडून टाकली जातात, ऍडजस्टमेंट करून एकमेकांचा आदर ठेवणे आपल्या पिढीला अवघड जात आहे ! अशीच एकदा भिन्न व्यक्तींची ऐतिहासिक भेट झाली होती आज पासून सुमारे १०४ वर्षांपूर्वी, त्या भेटीचे पुढे काय झाले नक्की वाचा !
एक दिवस असा उगवला ज्या दिवशी महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर हे पहिल्यांदा सामोरासमोर भेटले. दोघेही स्वतः च्या क्षेत्रातील दिग्गज आणि लोकप्रिय सुद्धा. टागोर प्रगल्भ कवी आणि विचारवंत देशभक्त तर गांधीजी हे भारतीय राजकारणातील स्वातंत्र्यपुर्व काळापासून सक्रिय व्यक्तिमत्त्व. दोघांचाही लोकांवर मोठा प्रभाव, दोघेही देशातील पारतंत्र्य संपवण्यासाठी वेगवेगळ्या वाटेवर चालून प्रयत्न करत होते, तरीही देशप्रेम ही केवळ एक सामाईक गोष्ट सोडली तर हे दोघेही अतिशय विरुद्ध व्यक्तिमत्त्व.
गांधींजींना “महात्मा” अशी उपाधी रवींद्रनाथ टागोरांनीच दिली, तर गांधींजींनीच “गुरुदेव” म्हणून टागोरांना पहिल्यांदा हाक मारली.
भारतीय इतिहासात या दोन दिग्गज व्यक्ती ६ मार्च १९१५ रोजी पहिल्यांदाच भेटल्या. पहिल्यांदाच भेटून सुद्धा त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल एक आदरयुक्त सन्मान आणि उत्सुकता होती.
कशी घडली ही ऐतिहासिक भेट ?
यात गंमत म्हणजे, ही भेट घडवून आणण्यासाठी एक इंग्रज कारणीभूत ठरले, चार्ल्स फियर अँड्र्यूज. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर काही दिवसानंतर, चार्ल्सनी रवींद्रनाथांच्या शिक्षण संस्थेत, म्हणजेच शांतनिकेतन येथे गांधीजींनी एक आठवडा राहावे अशी व्यवस्था केली. पण या काळात टागोर शांतीनिकेतन मध्ये नव्हते, तरीही गांधीजी त्यांच्या भेटीसाठी तेथे वाट बघत थांबले. ते एक आठवडा तेथे राहिले, हा आठवडा कायमचा लक्षात रहावा यासाठी आजपर्यंत, संस्था दरवर्षी १० मार्च या दिवशी “गांधी दिवस” साजरा करते. या दिवशी नोकर आणि स्वयंपाकी सुट्टी घेतात, तर विद्यार्थी आणि शिक्षक त्यांची सर्व कामे पार पाडतात.
अखेर भेट घडली !
६ मार्च या दिवशी दोघे भेटणार म्हणून पूर्ण शांतिनिकेत उत्साहात होते, गांधीजींचे सहकारी असलेले काका काळेकर सांगतात की, रवींद्रनाथ एका सोफ्यावर बसले होते. ते अतिशय उंच होते, चंदेरी केस आणि लांब दाढी आणि त्यांचे कपडे म्हणजे लांब गाऊन मध्ये ते एखाद्या सिंव्हा सारखे रुबाबदार दिसत होते. तर गांधीजी अगदी किरकोळ उंची आणि धोती साधा कुडता काश्मिरी टोपी घातलेले अगदी उंदीर-सिंव्हाची जोडी ! दोघे प्रचंड आदराने एकमेकांच्या कडे बघत होते, रवीबाबू सोफ्यावरून उठले त्यांनी गांधीजींना बाजूला बसायचे निमंत्रण दिले. पण आपल्या बापूंची साधी राहणी आणि वागणे सुद्धा साधेच. बापू बसले जाऊन खाली सतरंजीवर आणि मग रवीबाबूंना सुद्धा जमिनीवरच बसावे लागले !
या भेटी नंतर अनेक वर्षे दोघे भेटत राहिले, पत्र पाठवत राहिले, एकमेकांच्या कामा बद्दल प्रतिक्रिया देत राहिले बऱ्याच वेळा जे पटलं नाही त्यावर पण चर्चा करू लागले. दोघांच्या मतभेदाचे अनेक उदाहरणे आहेत. त्या पैकी एक म्हणजे, १९३४ साली बिहार आणि नेपाळच्या काही भागात मोठा भूकंप झाला आणि खूप मोठे नुकसान झाले.
त्यावर गांधीजी म्हणाले की,”हरीजनांवर (अस्पृश्य लोक) जो अन्याय या देशात होतोय त्या पापाची शिक्षा म्हणून हा भूकंप झाला”.
त्यावर टागोर-गांधी मध्ये बरेच वाद-विवाद झाले. टागोर म्हणले की, “मी गांधीजींच्या या अवैद्यनिक (नॉन सायंटिफिक) तर्क लावल्याने आतून दुखावला गेलोय, अश्या अंधश्रद्धा ठेवल्याने देश स्वतंत्र होण्यासाठी अजूनच वेळ लागणार आहे”.
डॉ आंबेडकर म्हणत होते, बॅकवर्ड हिंदू लोकांसाठी वेगळं मतदान घ्यावे आणि ह्याच्या विरोधात मे १९३२ मध्ये गांधीजी येरवडा येथे उपोषणाला बसले आणि त्या दोघांमध्ये नंतर “पुणे करार झाला”. ह्या वेळी आपल्या मित्राला भेटायला गुरुदेव बंगाल मधून पुण्याला लांबचा प्रवास करून आले आणि करार झाला तेव्हा ते तिथे उपस्थित होते. इतकेच नाही तर उपोषण सुरू असताना गांधीजी त्यांना म्हणले तुम्ही लिहलेले गीत म्हणून दाखवा, त्याने मला उपोषणात उत्साह वाढेल, ताकद मिळेल, ही विनंती मान्य करून टागोरांनी त्यांची काळजी सुद्धा घेतली.
पुढे टागोर आजारी असताना त्यांनी गांधीजींना ‘शांतिनिकेत तुमच्या पंखा खाली घ्या’, अशी विनंती केली, पण गांधीजी म्हणाले तुमच्या सारख्या संत माणसाने चालू केलेल्या शांतिनिकेतला देवाचा आशीर्वाद आहे, माझी काहीच गरज नाही इथे. ह्या सगळ्या प्रसंगा मधून परस्परविरुद्ध व्यक्तींमध्ये सुंदर मैत्री होऊ शकते हेच दोघांनी सिद्ध केलं आहे.
त्यांची पत्रं सर्वांनीच वाचावी अशीच आहेत. पत्रांमधून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. सत्य, स्वातंत्र्य, लोकशाही, माणुसकी, शौर्य ह्या विषयावर विचार मांडले. एक कवी आणि राजकारणी ह्यात जितका फरक होता तेवढीच ओढ आणि आदरही होता. गांधीजी आपल्या पत्नी बरोबर नंतर परत एकदा शांतिनिकेतला गेले, ती त्यांची रवींद्रनाथ टागोर यांच्या मृत्यूपूर्वीची शेवटची भेट ठरली.