“खाकी वर्दीचा मान ठेवण्यासाठीच पोलीस सतत झटत असतात. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहतो, कि जर सिनेमाचा नायक एखादा पोलीस अधिकारी असेल, तर तो आपल्या वर्दीचा खूप सम्मान करत असतो.”
प्रत्येक देशात कायदा आणि सुव्यवस्था नीट लागू करण्याची मोठी व महत्वाची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते. भारतात प्रत्येक राज्याचे स्वतंत्र पोलीस दल आहे. सण – समारंभ असो, महत्त्वाचे दिवस असो, दैनंदिन कामकाज सुरळीत चालणे असो, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, नागरीकांना सुरक्षित ठेवणे किंवा कायद्यांची अंमलबजावणी करणे. अशी मोठीच जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. पोलिसांच्या भरवशावर आपण शांतपणे घरी झोपू शकतो. पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी दिवस – रात्र तैनात असतात. ह्या पोलिसांची ओळख असते, ती म्हणजे त्यांचा गणवेश.
भारतात जवळजवळ सगळ्या राज्यात खाकी रंग पोलीस युनिफॉर्मसाठी वापरण्यात येतो, ह्यात कमी, जास्ती गडद किंवा फिक्का रंग असू शकतो, पण तो खाकीच असतो. खाकी गणवेशात पोलिस अधिक रुबाबदार व शिस्तबद्ध दिसतात. खाकी गणवेशात असलेली जरब ही काही औरच आहे. खाकी रंग पोलिसांच्या गणवेशासाठी का निवडण्यात आला, ह्यामागे कोणती गोष्ट आहे, ती आपण जाणून घेऊ. ब्रिटिश – इंडियामध्ये पोलिसांना स्वच्छ पांढऱ्या रंगाचा गणवेश होता. पण, भारतातील कोरड्या उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात भरपूर धूळ असल्याने पांढऱ्या रंगाचा गणवेश, घाम आणि धुळीमध्ये पार बदलून जायचा.
या पोलिसांची अगदी लाजिरवाणी अवस्था होत असे. हे गणवेश धुतल्यावर सुद्धा डाग निघत नसत, मग हे डाग लपवण्यासाठी पोलिसांच्या घरातील बायका गणवेश नीळ लावून धूत असत, पण त्यामुळे पांढरा रंग निळसर होऊन जायचा. त्यामुळे काही पोलिसांच्या गणवेशाला निळा, आकाशी किंवा पिवळट पांढरा अश्या वेगवेगळ्या छटा त्यात दिसत, त्यामुळे युनिफॉर्ममधील एकीच गायब झाली होती. सर्व युनिफॉर्म सारखे दिसावे म्हणून आणि हवामान, धूळ ह्यांचा सामना करण्यासाठी ‘खाकी’ ह्या रंगाची निवड केली गेली.
खाकी रंगाला आपण मळखपाऊ रंग म्हणू शकतो. त्यावर धूळ, माती सहज दिसून येत नाही. कितीही घाण जमा झाली, तरी खाकी रंग बदलत नसे, कोऱ्या चहाच्या पाण्यात भिजवून हा रंग पांढऱ्या गणवेषांना देण्यात आला. अश्या फिकट, पिवळा आणि भुर्या रंगाचे मिश्रण असलेला खाकी सर्वांना पसंत पडला. तुम्ही इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा गणवेश पहिला असेलच, ह्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांचा गणवेश खाकी असण्याचे कारणही हेच असावे असे वाटते.
कधी आणि कोणी खाकी रंग निवडला ?
१८४७ साली, सर हॅरी लुम्सडेन यांनी पहिल्यांदा खाकी रंगाचा वापर केला आणि भारतीय पोलिसांसाठी खाकी रंगांचे गणवेष बनवून घेतले. सर हॅरी लुम्सडेन यांनी खाकी रंग का निवडला याचे अजून एक कारण आहे, ते म्हणजे, सर हेन्री लॉरेन्स हे नॉर्थ – वेस्ट फ्रंटियरमध्ये राज्यपाल असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सहकारी होते, आणि लाहोरला राहत होते. त्यांनी डिसेंबर १८४६ साली एक दल उभे केले, “कोर्प्स ऑफ़ गाइडन्स” दल. हे ब्रिटीश – इंडीयन सैन्यामधील एक रेजिमेंट होते, जे उत्तर – पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आले होते.
सर हॅरी लुम्सडेन यांना ह्या दलाचे कमांड ऑफिसर बनविण्यात आले, आणि विलियम स्टीफन रायक्स होडसन या अधिकार्याला त्यांच्या हाताखाली मदतीसाठी देण्यात आले, आणि अजून एक “गॉप्स ऑफ गॉड्स” दल उभारण्याचे काम त्यांना देण्यात आले. सुरुवातीला, या दलातील सैनिकांना त्यांच्या स्थानिक पोशाखातच काम करू दिले गेले, परंतु १८४७ साली सर हॅरी लुम्सडेन यांनी एकसमान खाकी गणवेशाला मान्यता दिली. त्या दिवसानंतर पोलिसांच्या दलाने खाकी वर्दी स्वीकारली, जी अद्यापही भारतात वापरली जाते.
भारतातील काही भाग सोडून, उदाहरणार्थ कलकत्ता (जिथे पांढऱ्या रंगाचा गणवेष पोलिसांना आहे), बहुतेक सर्व राज्यात आजही खाकी गणवेष हा पोलिसांची शान आणि ओळख आहे. पोलिस दलात भरती होताना प्रत्येक तरुणाला आजही त्या खाकी युनिफॉर्मचेच जास्ती आकर्षण आहे आणि नेहमीच राहील. ह्या खाकी वर्दीचा मान ठेवण्यासाठीच पोलीस सतत झटत असतात. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहतो, कि जर सिनेमाचा नायक एखादा पोलीस अधिकारी असेल, तर तो आपल्या वर्दीचा खूप सम्मान करत असतो असे दाखवले जाते. वास्तविक आयुष्यातही असे अनेक शूर पोलीस अधिकारी होऊन गेलेत ज्यांनी आपल्या ह्या वर्दीसाठी प्राणांची बाजी लावली होती.