आज माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झालं. ९ ऑगस्टपासून जेटलींना श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना एम्स मधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
भाजप सरकारच्या २०१४ पासून च्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली. परंतु या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. तसा पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांनी निर्णय कळवून ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती. मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये, असंही त्यांनी सांगितलं होतं.
अरुण जेटलींचा जीवनप्रवास
जेटली हे राजकारणी म्हणून सर्वपरिचित असले तरी त्यांना मात्र CA व्हायचे होते, पण ते होऊ शकले नाहीत.वकीलीचे शिक्षण घेऊन जेटली यांनी 1987पासून विविध उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 1990 मध्ये दिल्लीतील उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. 1991 साली ते राजकारणात सक्रिय झाले. 1999 च्या लोकसभेच्या निवडणुकीत जेटली भाजप पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. २००१ च्या वाजपेयीच्या मंत्रिमंडळात जेटली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबरोबरच निर्गुंतवणूक मंत्रालयाचे मंत्री होते. २००० च्या मंत्रिमंडळातून राम जेठमलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेटलींकडे कायदा आणि न्याय तसेच कंपनी व्यवहार या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. 2004 ते 2014 युपीए सरकारच्या काळात त्यांनी राज्यसभेवर विरोधी पक्षनेते पद भूषविले. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.