निवडणुकीचे वातावरण आता महाराष्ट्रभर चांगलेच तापू लागले आहे. अनेक ठिकाणी होणाऱ्या विविध नेत्यांच्या सभांमधून अनेक मुद्दे आणि गुद्दे यांचा भडीमार होताना दिसत आहे. गंगाखेड मतदारसंघही त्याला अपवाद नाही. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली सभा पालम येथे पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्यांना आवरा, आपले चांगले संबंध खराब करू नका, अशा शब्दांत महादेव जानकर यांना ऐकवले. उद्धव ठाकरेंच्या विधानाचा रोख अर्थातच रत्नाकर गुट्टे यांना महादेव जानकरांनी दिलेल्या उमेदवारीकडे होता. फक्त विरोधी पक्ष किंवा निवडणुकीच्या व्यासपीठावरून झालेली टीका इतकेच याचे स्वरूप होते, असं वाटत नाही.
राजकीय उलथापालथीचा मतदार संघ म्हणुन गंगाखेड मतदार संघाची ओळख आहे. राजकिय तडजोडीसाठी निष्ठा डावलून काम करणाऱ्या या मतदार संघात विकास मात्र रखडलेला आहे. या मतदार संघात अनेक बलाढय नामदार आमदार झाले तर काहीजण आमदार झाल्यानंतर बलाढय झाले. यात मात्र सर्व सामान्यांचा विकास मात्र रखडला. अशा परिस्थितीत या घडीला रत्नाकर गुट्टे यांच्याकडे आशेने पाहीले जात आहे.
रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड मतदारसंघातील बिनीचे उमेदवार आहेत. सध्या ते तुरुंगात असले तरी त्यांची मतदारसंघावरील पकड घट्ट आहे. गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघात बरेच जनकार्य केलेले आहे. त्या कार्याला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. माखणी येथील गंगाखेड शुगर्स या साखर कारखान्याची निर्मिती, ऊस तोडणी कामगारांसाठी केलेली कामे, या कारखान्याच्या सुविधेसाठी केलेली रस्ते निर्मिती आणि या कारखान्याच्या निमित्ताने परिसरातील अनेकजणांना मिळालेला रोजगार, यांमुळे शेतकरी तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीत रत्नाकर गुट्टे यांचे नाव आदराने घेतले जाते.
या सगळ्या बाबी लक्षात घेता उद्धव ठाकरेंचा वरील इशारा सूचक आहे. उद्धव ठाकरेंसारखी व्यक्ती गंगाखेडमधील सभेच्या व्यासपीठावर उभं राहून भाषणाच्या सुरवातीलाच रत्नाकर गुट्टे यांच्याबद्दल इशारा देते, तेव्हाच त्यांची जनमानसावरील पकड लक्षात येण्यासारखी आहे. गुट्टे यांचे या भागातील कार्य, त्यांची प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंचे विधान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर मतदार रत्नाकर गुट्टे यांच्या बाजूने झुकलेला आहे असे दिसून येत आहे.