आरेतील कारशेडला होणारा विरोध अनाकलनीय का आहे ?

1519

जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि दररोज लोकलने प्रवास करत असाल तर मुंबईमध्ये प्रवास करणे म्हणजे काय दिव्य आहे याची तुम्हाला पूर्ण कल्पना असेल. कित्येकवेळा आपण पाहतो, ऐकतो, वाचतो कि अमुक एका तरुणाचा किंवा तरुणीचा लोकल ट्रेन पकडतांना अपघाती मृत्यू झाला किंवा अमुक एक व्यक्ती लोकल ट्रेन पकडतांना खाली पडली व तिला आपले पाय गमवावे लागले व त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आले.

बरं ह्या लोकल प्रवासाच्या अग्निदिव्यामध्ये जीव जातोय कुणाचा ? तर सर्वसामान्य मुंबईकरांचा, तुम्ही कधी पाहिलंय का कि कुणीतरी गर्भश्रीमंत उद्योगपती किंवा राजकारणी रोज लोकलने प्रवास करतोय? तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं का कि अमुक एका राजकारण्याचा लोकलने प्रवास करताना अपघात झाला? नसेलच ऐकलं असं काही, कारण लोकलने प्रवास करतो तो सामान्य मुंबईकरच, लोकलच्या जीवघेण्या गर्दीत श्वास गुदमरतोय तो त्या सामान्य मुंबईकराचाच.

दुसऱ्या राज्यातून किंवा महाराष्ट्रातील अन्य भागांतून पहिल्यांदाच मुंबईला आलेला एखादा व्यक्ती लोकल स्टेशनवरची गर्दी बघूनच अक्षरशः घाबरून जातो. कित्येक लोक तर लोकलचा जीवघेणा प्रवास करावा लागू नये म्हणून पुन्हा मुंबईत परतायचेच नाही असं ठरवतात. पण त्या सामान्य चाकरमान्या मुंबईकरांचे काय ज्यांना ह्याच भयंकर गर्दीतून रोज प्रवास करावाच लागतो, रोज त्या मुंबईकराला आपला जीव धोक्यात घालावाच लागतो.

(Source – Indian Express)

तुम्हाला माहिती आहे का कि लोकलने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या किती आहे? ऐकून खरं वाटणार नाही कदाचित पण मुंबईमध्ये लोकलने दररोज प्रवास करणाऱ्यांची अंदाजे संख्या ७५ लाखांपेक्षाही जास्त आहे. होय! हे खरंय. जगातील कित्येक असे देश आहेत ज्या देशाची एकूण लोकसंख्या सुद्धा ७५ लाखांपेक्षा कमी आहे. लोकलने प्रवास करणे किती महाकठीण आहे हे जाणून घ्यायचे असेल तर सकाळी जे चाकरमाने मुंबईकर आपल्या कामावर जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात त्यांना विचारा. विशेषतः सकाळी ८ ते १० दरम्यानची वेळ व संध्याकाळी ६ ते ९ दरम्यानची वेळ म्हणजे लोकल ट्रेन मधील गर्दीचा उच्चांक म्हणावा लागेल.

आणखीन एक धोकादायक बाब जी त्या लोकांच्या कधीच नजरेस येणार नाही जे लोकलने प्रवास करत नाहीत. ती महत्वाची बाब म्हणजे लोकल ट्रेनचे दरवाजे उघडे असतात. ते बंद करणेही शक्य नसते. अश्या परिस्थितीत जर हजारो प्रवासी एकाच वेळी प्रवास करणार असतील व लोकलचे दरवाजेही उघडे असतील तर जीवघेणे अपघात होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराला धावत, पळत, पडत का होईना समोर दिसणारी लोकल पकडावीच लागते. त्याशिवाय ना तो कामावर जाऊ शकतो ना आपले घर चालवू शकतो.

(Source – Youtube)

लोकल ट्रेन अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्या सामान्य मुंबईकरांविषयीची हि धक्कादायक आकडेवारी नजरेखालून घालाल तर तुम्हाला सर्व परिस्थितीची सहज कल्पना येईल. आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सन २०१७ ह्या वर्षी विविध लोकल अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांची संख्या आहे ३०१४. तसेच २०१३ ते २०१८ ह्या दरम्यान विविध रेल्वे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सामान्य मुंबईकरांची संख्या आहे १८,४००. लोकल ट्रेनला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. ते खराही आहे. पण आता ह्या जीवनवाहिनीला थोडासा मोकळा श्वास घेऊ देण्याची नितांत आवश्यकता आहे. लोकल ट्रेनच्या सेवेवर पडणारा हा भयंकर ताण कमी करण्यासाठी सक्षम अश्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेची किती नितांत आवश्यकता आहे हे केवळ तो सामान्य मुंबईकरच सांगू शकतो जो रोज ह्या लोकलच्या जीवघेण्या गर्दीत जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे.

ह्या सर्व परिस्थितीवर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे कारण रोज शेकडो मुंबईकरांच्या आयुष्याचा अंत ह्या लोकल प्रवासामध्येच होत आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने मुंबई लोकलवरील अतिप्रचंड ताण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे सेवा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचे ठरवले व सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ८ जून २०१४ रोजी मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. गुदमरणाऱ्या लोकलच्या गर्दीला वैतागलेल्या मुंबईकरांनी मेट्रोचे स्वागत अतिशय आनंदाने केले. पहिल्याच दिवशी तब्बल अडीच लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला. मुंबई मेट्रोच्या ह्या पहिल्या टप्प्यात ११.४ किलोमीटर अंतर कापले जाते. पण हि तर केवळ सुरुवात आहे. मेट्रोच्या कामाचे तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबईकर प्रवासी १६१ किमीचे अंतर केवळ काही वेळातच पूर्ण करू शकणार आहे. एवढेच नाही तर ह्या १६१ किमीच्या अंतरादरम्यान मेट्रो रेल्वे प्रतिदिन १५ लाख प्रवाश्यांची ने-आण करणार आहे असा अंदाज आहे.

(Source – blogs.adb.org)

मेट्रो रेल्वे हि अत्यंत आरामदायी, सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय म्हणून मुंबईकरांचे आयुष्य सुसह्य करत आहे. अत्यंत सुसज्ज असलेली हि मेट्रो एलसीडी स्क्रीन व थ्रीडी मॅपने सुसज्ज आहे ज्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सोपा आणि सुलभ होणार ह्यात संशय नाही. मेट्रो-१ चे काम पूर्ण होऊन सध्या हि मेट्रो ट्रेन वर्सोव्हा ते घाटकोपर दरम्यान रोज हजारो प्रवाश्यांची ने-आण करत आहे. मेट्रो-१ मुळे मुंबई उपनगराचा पूर्व व पश्चिम भाग अगदी सहज रित्या जोडला गेला आहे. जेव्हा मेट्रोचे पुढील टप्पे सुद्धा पूर्णत्वास जातील तेव्हा मुंबई उपनगरात मेट्रोचे दाट जाळे उभे राहील ज्यामुळे शहराच्या एका टोकास असलेल्या व्यक्तीस शहराच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी सुरक्षित, आरामदायी व जलद अशी दळणवळण सुविधा मेट्रोच्या रूपाने उपलब्ध होऊ शकेल.

खरंतर सर्व सुजाण मुंबईकरांनी मेट्रोच्या कामास सहकार्य करायला हवे जेणेकरून सर्वच मुंबईकरांचे जीवन सुसह्य होईल पण आज मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या कारशेड संदर्भात जो वाद चालू आहे ते पाहता हा प्रकल्प आणखीन लांबणीवर पडून अजून पुढील काही काळ सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागेल असे दिसत आहे.

न्यायालयानेसुद्धा मेट्रो कारशेडचे असणारे महत्व लक्षात घेऊन कारशेडविरोधात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. तसेच कारशेड उभारणीसाठी आवश्यक ती जागा वापरण्याची परवानगी सुद्धा दिली होती. पण असे असूनसुद्धा सामान्य मुंबईकरांच्या सोयीसाठी होत असलेल्या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या कारशेडला व पर्यायाने मेट्रोच्या तिसऱ्या लाईनला जो विरोध होत आहे तो सामान्य मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय आहे हे निश्चित.

(Source – HT)

आरेतील कारशेडला होणारा विरोध अनाकलनीय का आहे ?

मेट्रोच्या तिसऱ्या लाईनचे ४८ टक्के काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण होऊन मुंबईकरांना लवकरात लवकर मेट्रो सेवेचा लाभ घेता यावा ह्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे पण काहीजण मेट्रोच्या कारशेड बांधणीला विरोध करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मेट्रो कारशेडमुळे आरेतील संपूर्ण झाडे व पर्यावरण नष्ट होणार आहे, पण हे खरे नाही आरे भागात जवळजवळ ४.५ लाख झाडं आहेत. त्यापैकी केवळ २७०० झाडं ह्या कारशेड बांधणीच्या प्रक्रियेमध्ये तोडली जाऊ शकतात. पण ह्या कारशेडला विरोध करणारे लोक हे जाणीवपूर्वक विसरत आहेत कि MMRCL आरे मिल्क कॉलोनी व मुंबईच्या इतर भागामध्ये २४, ००० झाडे लावत आहे. ह्या २४,००० झाडांमध्ये बेहडा,कदंब, करंज अशी विविध प्रकारची झाडं लावण्यात देखील आलेली आहेत. मागील २ वर्षांपासून हे वृक्षारोपणाचे काम सुरुच आहे व अनेक झाडांची उत्तम प्रकारे वाढही झालेली आहे.

आरे इथे होणारा कारशेड इतका महत्वाचा का आहे ?

आरे इथे होणार असलेल्या मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे कि आरे इथे होणारा कारशेड जर कांजूरमार्गला हलवला तर एकूण प्रकल्पाची किंमत ५७०० कोटींनी वाढणार आहे व त्याचा बोजा वाढलेल्या तिकिटाच्या स्वरूपात सर्वसामान्य मुंबईकरांवरच पडणार आहे. शिवाय मेट्रोमुळे रस्त्यावर कमी होणारी वाहतूक व त्यामुळे कमी होणारे कार्बनचे उत्सर्जन ह्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसेल. त्यामुळे त्यांनी ह्या कारशेडला विरोध करणे थांबवावे हेच सामान्य मुंबईकरांच्या व मुंबईच्या हिताचे आहे