१० ऑगस्ट १९८६ हीच ती तारीख, हाच तो दिवस ज्या दिवशी भारतमातेच्या एका शूरवीर पुत्राची काही माथेफिरूंनी पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. अनेक युद्धांमध्ये अचाट पराक्रम गाजवणाऱ्या, आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी देशाच्या दुश्मनांचा अचूक वेध घेणाऱ्या ह्या वीर सैनिकाला एका बेसावध क्षणी गाठून त्याची हत्या करण्यात आली होती. ह्या शूर आणि जिगरबाज सैनिकाचे नाव आहे जनरल अरुणकुमार वैद्य.
२७ जानेवारी १९२६ साली जन्मलेले अरुणकुमार वैद्य १ ऑगस्ट १९८३ साली भारतीय सैन्याच्या सर्वोच्च पदी रुजू झाले. तो दिवस तमाम महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा होता. अरुणकुमार ह्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४५ साली केली. त्यावेळी ते ब्रिटिशांच्या सैन्यदलात दाखल झाले होते. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. अरुणकुमार वैद्य नुकतेच रॉयल डेक्कन हॉर्स ह्या रेजिमेंटमध्ये रुजू झाले होते. लढवय्या स्वभावाचे अरुणकुमार एखादी आरामदायी सनदी नोकरी पत्करून आनंदात आपल्या कुटुंबासोबत जीवन जगू शकले असते पण तो त्यांचा स्वभावच नव्हता.
ब्रिटिश सैन्यात रुजू झाल्यानंतर ते आपल्या रेजिमेंटसोबत ब्रम्हदेश (म्यानमार) येथे गेले. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी अगदी जवळून युद्धभूमी पहिली होती. म्यानमार इथे ब्रिटीश विरुद्ध जपान हि लढाई एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली होती. ह्या लढाईत अरुणकुमार ह्यांना एका टँकमध्ये हलगणर म्हणून पाठवण्यात आले होते. आयुष्यात प्रथमच युद्धभूमीवर प्रत्यक्ष युद्ध लढण्यासाठी उतरलेल्या अरुणकुमार ह्यांनी आपल्या गणरने कित्येक जपानी सैनिक यमसदनी धाडले होते.
आपल्या पराक्रमाचा व युद्धातील घडामोडींचा वृत्तांत सांगतांना त्यांचा उत्साह थक्क करणारा होता असे त्यांचे मित्र निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रभाकर सोमण ह्यांनी स्वतः सांगितले. अश्या ह्या लढवय्या व शूर सैनिकाने ४ दशके भारतमातेची सेवा बजावतांना अतुलनीय पराक्रम गाजवला. जनरल अरुणकुमार वैद्य ह्यांची कारकीर्द पाहिली तर ह्याची खात्री पटते कि अरुणकुमार ह्यांचा जन्म सैनिक बनण्यासाठीच झाला होता.
४० वर्ष आपल्या देशाची सेवा करणाऱ्या अरुणकुमार वैद्य ह्यांना १९६५ च्या भारत – पाक युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवल्यामुळे महावीर चक्र ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. बसंतरचे युद्ध असो किंवा बारपिंडचे युद्ध असो अरुणकुमार ह्यांचे युद्धातील कौशल्य व नेतृत्वगुण थक्क करणारे होते.
भारतीय टँक्स भूसुरुंग पेरलेल्या भूमीवर अगदी दूरवर जाऊन शत्रू सैन्यावर आग ओकत होते आणि हे टँक्स अरुणकुमार ह्यांच्याच नेतृत्वाखाली अशी अचाट कामगिरी करत होते. त्यांनी दाखविलेले कौशल्य व नेतृत्वगुण ह्यासाठी त्यांना पुन्हा एकदा १९७१ च्या भारत – पाक युद्धातील पराक्रमासाठी महावीर चक्राने सम्मानित करण्यात आले. तसेच १९८३ साली अतिविशिष्ट सेवा मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ह्याच वर्षी म्हणजेच १९८३ साली अरुणकुमार भारतीय सैन्यातील सर्वोच्चपदी रुजू झाले. अरुणकुमार आता इंडियन आर्मी चीफ बनले होते.
त्यानंतर दोन वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावून १९८५ साली अरुणकुमार वैद्य निवृत्त झाले. इतकी प्रदीर्घकाळ देशसेवा केल्यानंतर निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगण्याचा त्यांचा विचार असावा पण नियतीला ते मंजूर नव्हते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी मोहिमा फत्ते केल्या होत्या. पण त्यांनी ज्या एका मोहिमेचे नेतृत्व केले होते तीच मोहीम त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली होती. ती मोहीम होती ऑपरेशन ब्लु स्टार.
१९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी खलिस्तानी दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले. त्यावेळी जर्नेलसिंग बिंद्रनवाले आणि इतर खलिस्तानी आतंकवादी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलच्या हरमिंदर साहिब कॉम्प्लेक्समध्ये दडून बसले होते. त्यांच्याजवळ घातक शस्त्रास्त्रे सुद्धा होती. खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मनसुबा संपूर्ण गोल्डन टेम्पल ताब्यात घेण्याचा होता पण ऑपेरेशन ब्लु स्टार अंतर्गत भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. हि संपूर्ण मोहीम यशस्वी करण्यामागे सर्वात मोठी भूमिका बजावली होती जनरल अरुणकुमार वैद्य ह्यांनी. हि मोहीम झाल्यानंतर एका प्रसंगी अरुणकुमार ह्यांनी बोलून दाखवले होते कि हि मोहीम त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आणि वेदनादायक मोहीम होती.
ऑपेरेशन ब्लु स्टार पूर्ण होऊन दोन वर्ष उलटले होते. जनरल अरुणकुमार वैद्य निवृत्त झाले होते. ६० वर्षीय जनरल अरुणकुमार त्या दिवशी पुण्याच्या पश्चिमी भागातील एका रस्त्यावरून आपल्या मारुती ८०० कारने जात होते. सोबत त्यांची पत्नी होती. कारच्या मागच्या सीटवर त्यांचे सेक्युरीटी ऑफिसर बाबुराव क्षीरसागर बसले होते. त्याचवेळी काही दुचाकीस्वार आले. त्यांनी जनरल अरुणकुमार ह्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. गोळ्या अगदी जवळून झाडण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांच्या ह्या भ्याड हल्यात अरुणकुमार वैद्य ह्या शूर सैनिकाचा मृत्यू झाला.
ऑपेरेशन ब्लु स्टार नंतर त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या येतच होत्या. पण धमक्यांना अरुणकुमार कधीच घाबरले नव्हते. अरुणकुमार सारखा सच्चा सैनिक मरणाला कधीच घाबरत नसतो. ज्या क्रूर दहशतवाद्यांनी जनरल अरुणकुमार ह्यांची हत्या केली त्यांची नावे आहेत हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा. ह्या दोघांना नंतर पकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण ह्या २ माथेफिरुंच्या भ्याड कृत्यामुळे १० ऑगस्ट १९८६ ला भारतमातेने आपला वीर पुत्र गमावला.