तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात का ? असे बरेच चाहते असतात जे क्रिकेट बद्दल प्रत्येक माहिती साठवुन ठेवतात, प्रत्येक सामना त्यांनी मनापासून पाहीलेला असतो. काहींनी आपल्या आवडत्या खेळाडूच्या आयुष्यावर पारायण केलेली असतात तर काहींनी आपल्या आवडत्या संघाबद्दल सर्व माहीत मिळविलेली असते. कोणत्या खेळाडुच्या जर्सीचा नंबर काय आहे ? तो त्याच नंबरची जर्सी का वापरतो ? हे ते चाहते आवर्जून शोधुन काढतात.
तुम्ही जर भारतीय क्रिकेट संघाचे चाहते असाल तर तुम्हीही अश्या बऱ्याच बारीक सारीक गोष्टींची माहीती आपल्या संघाबद्दल मिळवली असेलच. पण तुम्हाला हे माहीती आहे का की भारतीय क्रिकेट जर्सीवर BCCI च्या लोगो वर तिन तारे का आहेत ? ते पुर्वी का नव्हते ? ह्या लेखात तुम्हाला त्या तिन ताऱ्यांमागचे कारण कळेलच पण त्या आधी आपल्याला ह्या भारतीय क्रिकेट जर्सीचा इतिहास जाणुन घ्यावा लागेल.
BCCI चा थोडक्यात इतिहास
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना १९२८ साली तमिळनाडू सोसायटी नोंदणी आधिनियमाखाली एका सोसायटीच्या रुपात केली गेलेली. ह्या सोसायटीने एक लोगो स्विकारला. हा लोगो इंग्रजांनी सुरु केलेला एका पुरस्कारा मधुन घेण्यात आला आहे. आता हा पुरस्कार म्हणजे “ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया”. १८५७ चा उठाव तुम्हाला ठाउकच असेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल विषय क्रिकेटचा विषय चालू असतांना मध्येच १८५७ चा उठाव कसा आठवला ?
त्याचे कारण असे की त्या उठावात जे भारतीय राजे इंग्रजांशी प्रामाणिक राहीले त्यांचा सन्मान म्हणून “ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया” ह्या पुरस्काराने १८६१ साली राणी व्हिक्टोरियाने सुरु केला. हा लोगो म्हणजे एक सुर्याच्या आकाराचा गोल आणि त्यात एक तारा, असा तो लोगो. तोच लोगो आपण स्विकारला. भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) चे स्वतः चे असे संविधान आहे आणि त्याची नियमावली नियामक मंडळाच्या सर्व आधिकाऱ्यांना आणि खेळाडुंना लागु होते. ह्या मंडळाने हा लोगो स्विकारला. तुम्ही पहाल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेट संघाच्या जर्सीवर त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने स्विकारलेला लोगो असतोच आणि त्यातील काहींच्याच लोगो वर तारा किंवा तारे असतात.
आता वळुया मुळ विषयाकडे. भारतीय क्रिकेट जर्सीवर तिन तारे लोगोच्या वरच्या बाजूला आहेत. ही जर्सी “नायकी” (NIKE) ने २०११ नंतर बनवली आहे. आता आधी “नायकी” चा आपल्या भारतीय क्रिकेटशी काय संबंध हे सांगावे लागेल. तर गोष्ट अशी आहे की नावाजलेल्या खेळ सामग्री बनवणाऱ्या “नायकी” ही कंपनी भारतीय क्रिकेटची आधिकारिक जर्सी प्रायोजक आहे. ही कंपनी भारतीय क्रिकेट खेळाडुंना सामन्यांसाठी तसेच सरावासाठी क्रिकेट साहीत्य पुरवते. ह्या प्रायोजकत्वाचे अधिकार २०१६ ते २०२० पाच वर्षांसाठी ३७० करोड रुपयात विकत घेण्यात आले आहेत.
आत्ता तुम्हाला ठाउकच आहे की भारताने तिन विश्वचषक जिंकले आहेत. काय ? डोक खाजवताय ? आहो म्हणजे दोन आय.सी.सी एकदिवसीय क्रिकेटचे आणि एक आय.सी.सी टी-२० असे तिन हो. म्हणजे कपिल देव ह्यांच्या नेतृत्वाखालील संघाने १९८३ साली कुणालाही आशा नसतांना खेचुन आणलेला शेवटच्या सामन्यातला विजय आणि तो विश्वचषक त्या काळचे क्रिकेटप्रेमी नाही विसरु शकत. त्यानंतर आपल्याला बरीच प्रतिक्षा करावी लागली.
२००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी तर इतकी सरस होती की ऑस्ट्रेलियानंतरचे प्रमुख दावेदार भारतीय संघालाच मानले गेले पण तो हाता तोंडाशी आलेला घास सुटला. मग आला २००७ चा आय.सी.सी. टी-२० चा पहीलाच विश्वचषक आणि त्यासाठीच भारतीय संघाच नेतृत्व करत होता कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी. नव्या दमाचे खेळाडू आणि काही अनुभवी खेळाडू घेउन धोनीच्या ह्या संघाने संपूर्ण विश्वचषकात रंगत आणली आणि बघता बघता आपण पहीलाच टी-२० विश्वचषक जिंकलो. तिथुन सर्व भारतीयांच्या नजरा ह्या येउ घातलेल्या २०११ च्या विश्वचषकावर होत्या.
धोनी एक आशा होती आणि सचिन तेंडुलकर ह्या क्रिकेटच्या देवाला विजयी निरोप देवुन संघातुन निवृत्त व्हायचे होते. युवराज, गौतम गंभीरसह सर्वांनीच कंबर कसली. डोळे दिपवुन टाकणारी कामगीरी ह्या खेळाडुंनी केली आणि बघता बघता आपण फायनलला धडक दिली आणि फायनलचा तो सामना आणि गंभीरच निर्णायक खेळ आणि ग्रेट फिनिशर, कॅप्टन कुल धोनीने मारलेला तो विजयी षटकार भारतीय विसरुच शकणार नाही. २०११ चा विश्वचषक भारतीय क्रीकेट संघाने आपल्या नावे केला आणि सचिनला आनंदाश्रू आवराता नाही आले, प्रतिक्षा संपली.
आता तुम्ही म्हणाल काय विषयांतर करताय ? तिन तारे जर्सी वर का असतात ते सांगायच सोडुन ह्या विश्वचषकाच्या कहाण्या का सांगत बसलाय ? आहो, ह्या कहाण्यामध्येच तर उत्तर आहे. आपण जिंकलेले हे तिन विश्वचषक म्हणजेच भारतीय क्रिकेट जर्सीवरचे ते तिन तारे. आल लक्षात ? हो. हेच कारण आहे. तुम्हाला शहानिशा करायचीच असेल तर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट लोगो पहा. एक ढाल आणि त्यावर पाच तारे. पाच तारे का ? तर ऑस्ट्रेलियाने तिन विश्वचषक सलग तर दोन विश्वचषक कालांतराने जिंकलीत. म्हणजे एकूण पाच. म्हणून पाच तारे.
आता हे ते ते देश ठरवतात की आपल्या लोगो वर असे स्टार असावेत की नाही. नाहीतर बाकी देश जे विश्वचषक जिंकलेत त्या सर्वांनीच ही पद्धत वापरली असे नाही. आपण भारतीय आहोत आणि ह्या जर्सीवरचे तारे वाढत जावो असेच आपणा सर्वांना वाटणार. तसेच होवो हीच सचिन तेंडुलकर ह्या क्रिकेटच्या देवाच्या चरणी प्रार्थना. तेंडुलकाराय नम: !