अनेक इतिहासकार म्हणतात “मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या तोडीची अद्भुत कृत्ये बाजीरावांच्या हातून घडलेली आहेत.”
स्वराज्याचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे नाव इतिहासात मोठ्या आदराने घेतले जाते. शाहूराजांचे एक विश्वासू पेशवा म्हणून त्यांनी स्वराज्यासाठी हिरीरीने कामगिरी केली. त्यांचे हेच मोठेपण, हाच विश्वासूपणा आणि त्यांचे आदराने घेतले जाणारे नाव पुढे नेले, टिकविले आणि वाढविले ते म्हणजे त्यांच्या मुलाने म्हणजे अर्थात बाजीरावांनी. वडिलांच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी मोठ्या विश्वासाने पेशवेपदाची सूत्रे बाजीरावांच्या हाती सोपविली. बाजीरावांनी देखील अतुलनीय कामगिरी करत, ते देखील इतिहासात अजरामर झाले.
बाजीरावांची ओळख
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे थोरले पुत्र बाजीराव यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी सिन्नर (नाशिक) येथे झाला. लहानपणापासूनच बाजीराव वाचन, लिखाण आणि लेखांकनात उत्तम होते, इतकेच नव्हे तर त्यांना घोडेस्वारी सुद्धा उत्तम येत होती. आपल्या वडिलांसोबत अगदी लहान वयातच बाजीरावांनी उत्तरेकडील स्वारी केली होती त्यामुळे पेशवा पदाचा भार घेण्याआधीच त्यांना उत्तरेकडील राजकारणाची आणि भौगोलिक स्थितीची ओळख झाली आणि याचा फायदा पेशवेपदावरून सूत्रे हाताळतांना झाला.
बाजीराव ते पेशवा बाजीराव
बाजीरावांच्या योग्यतेवर शाहुराजांना फार विश्वास होता म्हणूनच पेशवा बाळाजींच्या निधनानंतर शाहूराजांनी बाळाजी विश्वनाथ यांचा मोठा मुलगा बाजीराव यांच्या हाती पेशवेपदाची सूत्रे सोपविली. अनेक सरदार बाजीराव यांच्या पेशवेपदाला विरोध करीत होते. असे असूनही केवळ शाहूराजांनी सर्वांना बाजीरावांप्रती विश्वास देऊन बाजीरावांनाच पेशवा पद देण्याचे नक्की केले. मसूर (सातारा) येथे १७ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव यांच्या हाती पेशवेपदाची सर्व सूत्रे सोपविण्यात आली आणि बाजीरावांचा पेशवे म्हणून प्रवास सुरु झाला.
पेशवे पदावर येताच बाजीरावांनी आपल्या कामांना वेग दिला. बाजीरावांचे मुख्य धोरण हे लष्करी स्वरूपाचे होते आणि त्यामुळे त्यांनी आपले सैन्य अधिक मोठे व बळकट करण्यावर जोर दिला. निझाम उल मुल्क, सिद्दी, पोर्तुगीझ, आपलेच काही मराठा सरदार व घराणी अशा अनेक शत्रूंशी बाजीरावांनी एकाच वेळी लढत केली.
बाजीरावांच्या खासगी आयुष्यावर एक नजर
बाजीरावांचे पहिला विवाह हा महादजी कृष्णा जोशी यांच्या कन्या काशीबाई यांच्याशी झाला. बाजीराव व काशीबाई यांना एकूण तीन अपत्ये होती. पहिले होते बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब, दुसरे होते रघुनाथराव आणि तिसरे होते जनार्दन राव. बाजीरावांना त्यांचे काम बाजूला सारून ज्या एका गोष्टीवरून टीकेचा विषय केला जातो ती गोष्ट म्हणजे त्यांचा दुसरा विवाह आणि तो देखील मुस्लिम स्त्री सोबत. मस्तानी असे या दुसऱ्या पत्नीचे नाव होते. बुंदेलखंडच्या छत्रसाल राजाच्या मुलींपैकी मस्तानी एक होती. बाजीराव व मस्तानी या दोघांना देखील एक अपत्य होते, त्याचे नाव समशेर बहादूर असे होते.
पेशवा बाजीरावांचा मृत्यू
साधारण १७३९/४० सालची हि गोष्ट आहे. बाजीराव पेशवा दिल्लीकडे कूच करत होते. वाटेत थांबून आपल्या जागीर आणि आपल्या अधिपत्याखालील प्रदेशांवर ते पाहणी करून घेत होते. १७४० साली बाजीराव इंदोर येथे पोहोचले असता त्यांनी खरगोणे जिल्ह्यातील रावरखेडी या ठिकाणी सुमारे १,००,००० सैन्यासहित आपला तळ ठोकला. बाजीराव हे पेशवा पदावर येण्याआधीच अतिशय मेहनती व धाडसी होते आणि वडिलांसोबत देखील त्यांनी अनेक मोहिमांमध्ये साथ केली. पेशवा पद स्वीकारल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यांचे सगळे दिवस धावपळीत जाऊ लागले. बाजीरावांचे धोरण देखील मुळात लष्करी असल्याने नेहमीच युद्धाला, नवीन प्रदेश काबीज करायला अथवा काही ना काही चकमकींना सामोरे जावे लागत होते.
या सगळ्या धावपळीत बाजीरावांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणे साहजिक होते. बरेचदा बाजीराव पेशवे आजारी असत आणि तेव्हाच्या काळात हल्ली उपलब्ध असतात तसे आधुनिक उपायही नव्हते. त्यामुळे बरेचदा आजार बरे होण्यास जास्त कालावधी लागे आणि अनेकदा तर आजाराचे निदान होणे देखील कठीण असे. रावेरखेडी येथे आपला तळ ठोकून बाजीराव सैन्यासह थांबले असता त्यांना एकाएकी ताप येऊ लागला आणि दिवसागणिक त्याचे प्रमाण वाढले तरीही काही ना काही कामांमध्ये बाजीराव गुंतलेले असत त्यामुळे शरीराला आराम हा जवळजवळ नाहीच.
हा महिना साधारण एप्रिलचा होता, सध्याचं पहा ना एप्रिल महिन्यात उन्हाने अंगाची लाही होते तर तेव्हाच्या एप्रिल महिन्यात तेही बऱ्याच प्रमाणात मोकळ्या असलेल्या जमिनीवर उन्हाचे चटके नक्कीच जास्त बसत होते. त्यामुळे काही इतिहासकारांच्या मतानुसार बाजीरावांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला. उष्माघातामध्ये माणसाच्या शरीराचे तापमान साधारण ४०.० डिग्री पर्यंत पोहोचते आणि त्यामुळे बरेचदा रूग्ण दगावण्याची देखील शक्यता असते. अशाच उष्माघाताने बाजीरावांचा मृत्यू झाल्याचे मत अनेक इतिहासकार व तेव्हाची काही साधने करतात. या उलट काही साधने बाजीरावांचा मृत्यू हा तापामुळे झाला असा उल्लेख करतात.
२८ एप्रिल १७४० रोजी साधारण वयाच्या ३९ व्या वर्षी पेशवा बाजीरावांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. याच दिवशी त्यांच्या शरीरावर अंतिम विधी रावेरखेडी येथील नर्मदा नदीजवळ केले गेले. बाजीरावांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळला, एक भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचं नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरदेखील या बातमीचा शोक व्यक्त झाला. सिंधिया या घराण्यांनी रावेरखेडी येथे पेशवा बाजीरावांचे एक स्मारक बांधले, याला साधारणपणे छत्री असे म्हटले जाते. याच स्मारकाजवळ धर्मशाळा बांधली गेली आणि तेथे जवळच दोन मंदिरांचे देखील निर्माण करण्यात आले. यातील एक मंदिर निळकंठेश्वर महादेवाचे तर दुसरे रामेश्वराचे मंदिर आहे.
याच स्मारकाजवळ एका दगडावर काही अक्षरे कोरली आहेत. हि अक्षरे म्हणजे अनेक राजा, इतिहासकार वगैरे मंडळींनी पेशवा बाजीरावांबद्दल काढलेले स्तुतीपर उद्गार आहेत.
छत्रपती शाहू महाराज म्हणतात, “सारे माझेच आहेत. परंतु माणूस असा बाजीराव. मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजीपंतांनी केला. तादाधिक्य बाजीराव. तलवार बहाद्दरपणाची पराकाष्ठा. असा पुरुषचं झाला नाही.”
इतिहासाचार्य राजवाडे यांचे देखील वाक्य तेथे नमूद आहे ते म्हणतात, “मराठ्यांच्या इतिहासात शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या तोडीची अद्भुत कृत्ये बाजीरावांच्या हातून घडलेली आहेत.”
एक पेशवा म्हणून बाजीरावांनी आपली योग्यता सिद्ध करून दाखविली. २० वर्षाच्या कालावधीत बाजीरावांनी मराठ्यांची सत्ता दक्षिण तसेच उत्तरेतही पसरविली. बाजीरावांमुळेच निझाम-उल-मुल्क याने मराठ्यांना त्यांची चौथ व सरदेशमुखी परत केली, बाजीरावांमुळेच सिद्दीसारख्या आरमारी ताकदीला वचक बसला, पोर्तुगीज़ानसारख्या विदेशी सत्तानाही धडा मिळाला. आज २८ एप्रिल २०१९ रोजी बाजीरावांचे निधन होऊन सुमारे २७९ वर्षे झाली. इतकी वर्षे उलटून देखील बाजीरावांचे नाव इतिहासात अजरामर आहे, त्यांचे जीवन आदर्श आहे आणि त्यांच्या अनेक योजनांचे, सैनिकी हल्ल्यांचे आजही मोठ्या अभिमानाने आणि आश्चर्याने उल्लेख येतात.
या पुढेही बाजीरावांचे नाव असेच इतिहासात अजरामर राहील आणि त्यांनी केलेल्या कामांची, मराठी सत्ता महाराष्ट्रापलीकडे घेऊन जाण्याच्या शौर्याची देखील आठवण नेहमीच काढली जाईल. अशा आदर्श व्यक्तिमत्वाला त्रिवार नमन.