आज संपूर्ण भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो, पण कोणी या तारखे बद्दल विचार केला आहे का ? असे काय घडले की भारताला 15 ऑगस्ट 1947 याच दिवशी स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले. काय आहे या तारखे मागील रहस्य जाणून घेऊयात या लेखामध्ये…
यासंबंधी पडु शकनारा पहिला प्रश्न म्हणजे 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य का मिळालं ?
भारतामध्ये जहाल आणि मवाळ अशी क्रांतिकारकांचे दोन गट होते. त्यांचे गट जरी असले तरी त्यांचे लक्ष्य आणि ध्येय एकच होते, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत स्वातंत्र्यासाठी पेटून उठला होता तर, पश्चिम बंगालमध्ये सुभाष बाबूही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते. सुभाषबाबू भारताच्या बाहेर गेल्यानंतरही आझाद हिंद सेनेच्या हालचालीमुळे इंग्रज पूरते घाबरून गेले होते. त्यातच दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांकडे आर्थिक सुबत्ता राहिली नव्हती. या महायुद्धामध्ये इंग्रजांचे मोठे नुकसान झाले होते.
1935 नंतर इंग्रज त्यांचाच देश चालवतील याचीच शास्वती कोणाला वाटत नसे, त्यातच दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सत्तापालट झाला. 1940 च्या दशकामध्ये इंग्लंडमध्ये मजूर (Labour) पार्टीने सत्ता हस्तांतरित केली होती, त्यामुळे भारताला स्वातंत्र्याचे दार उघडे झाले होते, कारण मजूर (Labour) पार्टीने सत्ता ग्रहण करण्याच्या आधी त्यांच्या घोषणापत्रामध्ये भारतासारख्या इतर अनेक वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते.
भरपूर संघर्ष झाल्यानंतरही भारतीय नेत्यांनी लॉर्ड वेव्हेल यांच्याशी स्वातंत्र्याबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली. आता भारताचे स्वातंत्र्याचे स्वप्न खरे वाटू लागले होते. काही दिवसांनी ब्रिटिश सरकारतर्फे लॉर्ड माऊंटबॅटन यांची भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे भारताला शिस्तबद्ध पद्धतीने स्वातंत्र्य देण्याचे काम सोपविण्यात आले होते. सुरुवातीच्या रचनेनुसार भारताला जून 1948 मध्ये स्वातंत्र्य देण्यात येईल अशी चर्चा होती. व्हाइसरॉय म्हणून जबाबदारी मिळताच लोर्ड माउंट बँटन यांनी भारतीय नेत्यांशी वाटाघाटी चालू केल्या. पण हे काम एवढे सोपे नव्हते कारण स्वातंत्र्यामधील अजूनही काही अडसर बाजूला करायचे राहून गेले होते.
बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तान हा स्वतंत्र देश हवा होता आणि या मागणीसाठी त्यांच्यात आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये अनेक मतभेद निर्माण झाले होते. जीन्नांच्या या मागणीमुळे भारताच्या अनेक भागांमध्ये धार्मिक द्वेषातून दंगली उसळल्या. माऊंटबॅटन यांनी अशा कुठल्याही अप्रिय घटनेची अपेक्षाच केली नव्हती. स्वातंत्र्यावरून अजून गदारोळ होऊ नये म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतीय नेत्यांशी चर्चा करून 1948 च्या ऐवजी 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले.
दुसरा प्रश्न आपल्याला पडू शकतो तो म्हणजे 15 ऑगस्टच का ?
लॉर्ड माऊंटबॅटन 15 ऑगस्ट या दिवसाला शुभ मानत असत, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 15 ऑगस्ट 1945 ला जपानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते आणि या काळामध्ये लॉर्ड माऊंटबॅटन ‘अलाँयड फोर्सेस’ या सैन्य दलाचे कमांडर होते. त्यामुळे लॉर्ड माऊंट बॅटन 15 ऑगस्ट शुभ तारीख मानत असत, पण यातही रात्री बारा वाजता भारताला स्वातंत्र्य देण्याचे एक निराळेच कारण आहे.
लॉर्ड माऊंटबॅटन यांनी 15 ऑगस्टची तारीख जाहीर केल्यानंतर भारतीय ज्योतिषांनी ही तारीख अशुभ आहे असे सांगत तारीख बदलून देण्याबद्दल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे विचारणा केली. पण लॉर्ड माऊंटबॅटन हे या तारखेबाबत फारच आग्रही भूमिका घेत असत, त्यामुळे मधला मार्ग म्हणून भारताला रात्री बारा वाजता स्वातंत्र्य देण्यात यावे असे सुचविण्यात आले. जेणेकरून लॉर्ड माऊंटबॅटन तसेच ज्योतिषीही समाधानी असतील.