९० च्या दशकात असा एकही सिनेमा नव्हता ज्यात जॉनी नाही. एकवेळेस सिनेमाची स्क्रिप्ट नंतर ठरवली जाई पण त्यात जॉनी असणार हे आधी ठरत असे.
९० च्या दशकात खुप सिनेमे आले. त्यातले काही निखळ मनोरंजन करणारे होते. हा तोच काळ ज्यात शाहरुख खान ह्या नव्या हिंदी सिमेमाच्या सुपरस्टारचा उदय झाला. अब्बास मस्तानचा बाजीगर हीट झाला आणि त्या सिनेमाने दोन स्टार हिंदी सिनेमाला दिले. तुम्ही म्हणाल दोन कसे ? हो दोनच. एक रोमांसचा बादशहा ‘शाहरुख खान’ आणि दुसरा कॉमीडीचा बादशाह ‘जॉनी लिवर.’ शाहरुखच्या खलनायकाने जितकं घाबरवलं तितकच बाबुलालने हसवलं. ह्या जॉनी नावाच्या मुलाने मग हिंदी फिल्म इंड्स्ट्रीवर कायमची छाप सोडली.
जॉनी तसा लहानपणापासूनच सिनेमाचा चाहता होता. मेहमुद, जॉनी वॉकर हे त्याचे आवडते विनोदी कलाकार. फिल्मच्या वेडापायी त्याने एकदा फिल्म इन्स्टिट्यूटला जायला पुणेही गाठले. पण घरची परीस्थिती बेताची त्यात जॉनी घरात सर्वात मोठा. आर्थिक अडचणी मुळे त्याने शाळाही सोडली. पोटासाठी तो रस्त्यावर पेन विकु लागला. पण हा काही साधा विक्रेता नव्हता. त्याचे पेन विकायला संजीव कुमार, प्राण, अशोक कुमार, असली हिंदी सिनेमातली नावजलेली मंडळी यायची. म्हणजे तो ह्यांची मिमीक्री करुन पेन विकायचा आणि त्याच्या ह्या अनोख्या शैली मुळे ग्राहक पेन विकत घेउ लागले. गर्दी वाढू लागली.
नंतर त्याने वडीलांच्या कंपनीत हिंदुस्तान लिवरमध्ये काम करायला सुरुवात केली. पण तिथेही हा काही सामन्य कर्मचारी म्हणून काम करत नसे. त्याचे सहकारी सांगतात की तो कामावर लागायच्या आधी कोणालाच कामात रस नव्हता. आठ तास काम करणं मुश्किल वाटु लागलं. हा आला आणि सर्वच बदललं. हा सर्वांना सतत हसवत रहायचा. जॉनी कंपनीतल्या सर्वांची मिमीक्री करायचा. ह्यात कामचे आठ तास कसे जायचे कळायचही नाही.
कंपनीच्या एका मोठ्या कार्यक्रमात जॉनीला शो करायला ह्या मित्रांनी सांगितले. त्याने त्या कार्यक्रमात कंपनीतल्या सर्वांची नक्कल केली पण नाव न सांगता. त्याने नक्कल केली की सर्व ओळखायचे की तो कोणाची नक्कल करतोय. त्यात त्यांच्या एका वरीष्ठ कर्मचाऱ्याने खुष होऊन म्हटले की,
“जॉनीने तो हिंदुस्तान लिवर के सबकी बँड बजादी, आजसे तेरा नाम जॉनी लिवर.” तोपर्यंत त्याचे नाव जॉन प्रकाश राव जानुमाला होते.
नंतर त्याला कल्याणजी आनंदजी ह्यांच्या म्युजीकल शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली. एका कार्यक्रमात शो मधल्या मुलींना कपडे बदलायला वेळ लागणार होता. आयोजकांना कळत नव्हते की काय करावे. आनंदजींना कल्पना सुचली आणि त्यांनी जॉनीला सांगितले की जा आणि हसव प्रेक्षकांना. पण प्रेक्षक साधे नव्हते. सर्व बॉलिवूडच तिथे समोर बसलं होतं. हा शो जॉनीने इतका गाजवला कि त्याला वंस मोअर मिळाला आणि तिथुनच त्याला हिंदी सिनेमात कामं मिळु लागली. मग काय. बघता बघता ह्याने १३ फिल्मफेअर नामांकन मिळवली आणि त्यातले दोन ‘दिवाना मस्ताना’ आणि ‘दुल्हेराजा’ ह्या सिनेमासाठी ते पटकावले देखिल. ९० च्या दशकात असा एकही सिनेमा नव्हता ज्यात जॉनी नाही. एकवेळेस सिनेमाची स्क्रिप्ट नंतर ठरवली जाई पण त्यात जॉनी असणार हे आधी ठरत असे.
सिनेमातल्या मुख्य कलाकारांसोबतच जॉनीच्या नावानेही सिनेमे विकले जाउ लागले. बरेच सिनेमे असे आहेत जे केवळ आणि केवळ जॉनीच्या विनोदी भूमिकेनेच तरले आहेत. कादर खान, गोविंदा आणि जॉनी हे एकत्र असले की हास्याची पर्वणीच असायची.
आजही गोलमाल सिरीझ असो की दिलवाले सारखा सिनेमा असो जॉनीमुळे ह्या सिनेमांना चार चांद लागलेत. जॉनी वॉकर तर त्याला स्वतः पेक्षा जास्त उजवा कलाकार मानतात. तो सध्या भरमसाठ सिनेमे करत नाही. कारण त्याने आता कुटुंबाला जास्त वेळ द्यायचं ठरवलय. त्याच्या मुलाला एकदा गळ्यात गाठ झाली होती, त्याच्यासाठी तो काळ खुप कठीण होता. तो दिवसरात्र मुलाच्या ठिक होण्याची प्रार्थना करु लागला. काही दिवसाने ती गाठ नाहीशी झाली. त्याला हा इश्वरी चमत्कार मानतो आणि तेव्हा पासून तो धार्मिक झाला आहे.
जॉनी प्रत्यक्ष फार हळवा आहे. सुट्टी असेल तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत सिनेमातल्या अश्या कलाकारांना जाउन भेटतो ज्यांना लोक विसरले आहेत. आत्ताच्या कमरेखालच्या विनोदी सिनेमा पाहणाऱ्या पीढीला हे दाखवायला हवे की एकही कमरेखालचा विनोद न करता ह्या माणसाने डोळ्यात पाणी येईपर्यंत आपल्याला हसवलय.
मेहमुद, अब्बास मस्तान, तब्बसुम हे दिग्गज जॉनीला जेव्हा भरभरुन प्रेम देतात तिथेच त्याचा दर्जा काय आहे तो कळतो. सध्या तो एका मराठी कॉमेडी शोचा जज आहे. नव्या मुलांना तिथे तो ज्या टीप्स देतो त्या एकण्यासारख्या असतात. त्याची मुलगीही त्याच्यात पाउलावर पाउल ठेवुन कॉमेडी शो करतेय आणि तिच्यात तिच्या वडीलांची कला पुर्ण उतरली आहे हे दिसते. कॉमेडीच्या ह्या सम्राटाला खुप खुप शुभेच्छा आणि हा असाच हसत राहो आणि आपल्याला हसवत राहो ही सदिच्छा.