लोकशाहीत कोणीही ‘प्रिन्स’ नसतो, स्मृती इरानींचा अमित देशमुखांना टोला

1691

निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात प्रचाराची धामधूम जोरदार सुरु आहे. प्रचारसभा हा निवडणूक प्रचारातील एक महत्वाचा भाग ! पक्षातल्या एखाद्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याचे जनतेला केले गेलेले आवाहन निवडणुकीच्या रिंगणात अत्यंत उपयुक्त ठरते, असा आजवरचा अनुभव आहे. लातूरकरांनी नुकतीच अनुभवलेली भाजपा नेत्या श्रीमती स्मृती इराणी यांची येथील भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी यांच्यासाठीची प्रचारसभाही लातूरकरांसाठी चर्चेचा विषय बनली. नागरिकांनीही या सभेला प्रचंड प्रतिसाद दिला.

स्मृती इराणींनी आपल्या भाषणात अनेक ठिकाणी मराठी शब्दांचा वापर करून श्रोत्यांना सहजतेनं आपलंसं करून घेतलं. भाजपा सरकारचं गेल्या पाच वर्षांमधील केंद्रातील तसंच राज्यातील कार्य यांचा धावता आढावा घेण्याबरोबरच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यावर “प्रिन्स” म्हणून अप्रत्यक्ष निशाणा साधला. भारतात राजेशाही इतिहासजमा झालेली असून लोकशाही हे लोकांचं राज्य आहे, त्यामुळे लोकशाहीत कोणीही “प्रिन्स” नसतो, अशा शब्दांत त्यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृतीशी किती अभिन्न पद्धतीने जोडलेले आहेत, याची अनेक उदाहरणे देताना भाजपा सरकारचे कार्य त्यांनी विशद केले. काँग्रेसमधील सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या बाळांना भारतीय मातीतली ही संस्कृती कधीच समजली नाही आणि समजणारही नाही, त्यामुळे आपला नेता आपल्या मातीतला, आपल्या मुळांना घट्ट धरून राहिलेलं असणं गरजेचं आहे, असा टोलाही त्यांनी भाषणादरम्यान लगावला.

तत्पूर्वी शैलेश लाहोटी यांनी भाजपा विचारांची व्याप्ती आणि त्यातून आपल्याला जनकार्याची कशी प्रेरणा मिळाली, याबद्दल श्रोत्यांना सांगितले. भाजपा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराचं झालेलं समूळ उच्चाटन, लातूरमधील स्थानिक आमदार दुष्काळाला कसे कारणीभूत आहेत, अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लाहोटींनी भाष्य केलं.

लातूरमधील ही बहुचर्चित सभा नागरिकांना नक्की काय विचार करायला प्रवृत्त करते, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here