भारतातील अनेक महानगरांमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आणि सार्वजनिक परिवहन आणि वाहतुकीचा चेहरा मोहराच बदलून गेला. ह्या सर्व शहरांमधील मेट्रोमध्ये एक समानता आहे ती म्हणजे ह्या सर्व शहरातील मेट्रो रेल्वेचे डबे, अर्थात रेल्वे कोच हे स्टेनलेस स्टीलचे आहेत. पण पुणे मेट्रो मात्र ह्या बाबतीत अन्य शहरांतील मेट्रोपेक्षा वेगळी ठरणार आहे. कारण ह्या पुणे मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलचे नसतील तर ते असतील अल्युमिनियमचे. कोलकाता स्थित वॅगन उत्पादक कंपनी Titagarh firema Spa ने नुकतेच हे कंत्राट मिळवले आहे.
Titagarh firema Spa कोलकाता, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे १०२ अल्युमिनियम रेल्वे कोच पुरवणार आहे. महामेट्रो अर्थात The Maharashtra Metro Rail Corporation Ltd ने ह्यासाठीचे टेंडर काढले केले होते. हे टेंडर रेल्वे कोचेसचे डिसाईन, उत्पादन, चाचणी ह्या सर्व कामांसाठी होते ज्यात Titagarh firema Spa ने बाजी मारली.
अल्युमिनियम कोचेसच का वापरण्यात येत आहेत ?
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित ह्यांनी ह्यासंबंधी माहिती देतांना सांगितले कि अश्या प्रकारे एखाद्या मेट्रोसाठी अल्युमिनियम कोच वापरण्याची हि पहिलीच वेळ आहे. दीक्षित ह्यांनी अल्युमिनियम कोचेसच का वापरण्यात येत आहेत ह्याचे कारण सांगितले. अल्युमिनियम कोच हे वजनाने हलके, अधिक कार्यक्षम आणि दिसायला अधिक आकर्षक आहेत त्यामुळे त्याचा वापर पुणे मेट्रोसाठी करत असल्याचे सांगितले.
ह्या १०२ अल्युमिनियम कोचेस पैकी २५ % कोचेसचे उत्पादन इटली मधील कारखान्यात तर उर्वरित ७५ % उत्पादन आणि चाचणी महामेट्रोच्या नागपूर येथील कारखान्यात करण्यात येईल अशी माहिती ब्रिजेश दीक्षित ह्यांनी ह्यावेळी दिली. महामेट्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि सुरुवातीला धावणारी मेट्रो हि ३ कोचेससह धावेल. त्यानंतर गरजेनुसार ह्या कोचेसची संख्या ३ वरून ६ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. पुणे मेट्रो हि संपूर्णपणे वातानुकूलित असून त्यात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहे.