जयसूर्याने त्यावेळी केलेली खेळी क्रिकेट रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे.
आजपर्यंत आपण अनेक रोमहर्षक क्रिकेट सामने बघितलेले आहेत. या क्रिकेट विश्वामध्ये अनेक विश्वविक्रम रोज बनवले आणि मोडले जातात पण काही विक्रम असे असतात ज्यांना मोडने अत्यंत कठीण काम आहे. भारतीय क्रिकेट संघाने अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले आणि भारतीय संघाच्या विरुद्धही अनेक विश्वविक्रम तयार झालेले आहेत, पण तुम्हाला श्रीलंकेने भारताविरुद्ध प्रस्थापित केलेला विश्वविक्रम ठाऊक आहे का ? असे काय घडले होते या सामन्यादरम्यान कि हा सामना इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे जाणून घेऊयात.
वीस वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका या दोन संघांदरम्यान एक टेस्ट क्रिकेट सामना खेळला गेला होता. तो सामना आजही क्रिकेट रसिकांच्या मनावर कोरला गेलेला आहे कारण श्रीलंकेने या सामन्यामध्ये भारताविरुद्ध एक विश्वविक्रम रचन्यात यश मिळवले होते. या सामन्यामध्ये सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा या दोन फलंदाजांनी मिळून एक ऐतिहासिक खेळी केलेली होते.
या सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजीची सुरुवात एवढी विशेष राहिली नाही कारण केवळ 36 धावांवरती भारताचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र नवज्योत सिंग सिद्धू आणि राहुल द्रविड या दोघांनी मिळून भारताचा डाव सावरला आणि संघाला जरा मजबूत स्थितीत आणले. दोघांनीही कमालीची फलंदाजी केली. या सामन्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी शतक पूर्ण केले होते तर राहुल द्रविड यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. फलंदाजी करताना भारता तर्फे नवज्योत सिंग सिद्धू (111), सचिन तेंडुलकर (143), मोहम्मद अझरुद्दीन (126) यांनी नेत्रदीपक खेळ केलेला होता. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारताने 6 बाद 537 धावांचा डोंगर उभा केला.
या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. मार्वन आट्टापटु केवळ 26 धावा करून त्रिफळाचीत झाला आणि श्रीलंकेला केवळ 39 धावांवर पहिला झटका लागला. श्रीलंकेला पहिला झटका निलेश कुलकर्णी या गोलंदाजाने दिला होता. पहिला गडी गमावल्यानंतर सनथ जयसूर्या आणि रोशन महानमा यांनी श्रीलंकेच्या फलंदाजीचे सुत्र स्वीकारत जबाबदारीने खेळण्यास सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. जयसूर्याने त्यावेळी केलेली खेळी क्रिकेट रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे.
या दोन्ही फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजांनी हात टेकले होते. जयसूर्य आणि महानमा या दोघांनी मिळून सलग दोन दिवस फलंदाजी केली. यादरम्यान जयसूर्याने त्रीशतक झळकावत आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले, तर दुसऱ्या बाजूला रोशन महानमाने 225 धावांची साथ दिली. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 576 धावांची भागीदारी रचली. पुढच्या नऊ वर्षांपर्यंत कोणीही हा विश्वविक्रम तोडू शकले नव्हते. पुढे जाऊन 2006 मध्ये महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा या श्रीलंकेच्याच खेळाडूंनी 624 धावांची भागीदारी करत हा विश्वविक्रम मोडला होता.
या सामन्यामध्ये फलंदाजी करताना जयसूर्या ने 578 चेंडूंचा सामना करताना 36 चौकार आणि दोन षटकार लगावले होते. जयसूर्याने या सामन्यांदरम्यान 340 धावांची खेळी करत विश्वविक्रम रचला होता. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने आठ गोलंदाज वापरले होते. हा सामना पूर्ण पाच दिवस चालला तरीही हा सामना अनिर्णित राहिला होता.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.