१९३३ साली प्रभात फिल्म कंपनीचा सिंहगड नावाचा सिनेमा आलेला. लोकांनी केवळ सिनेमा पाहिला पण ११ वर्षांच्या बाबाहेब पुरंदरेंना मात्र काहीतरी वेगळंच दिसलं
इतिहास, अनेकांसाठी अतिशय कंटाळवाणा विषय. ऐतिहासिक कथा ऐकताना कितीही रंजक वाटत असल्या तरी त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा अभ्यास करणे हे खरे कंटाळवाणे काम. पण हा, काही मंडळी जी इतिहासावर मनापासून प्रेम करतात ती मात्र इतिहास जाणतात आणि जपतात सुद्धा. आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक ऐतिहासिक कथा कोणाच्या सांगितल्या जात असतील तर ते आहेत आपले शिवाजी महाराज.
शिव-इतिहासाचा अभ्यास करणे अनेकांसाठी कंटाळवाणे, दीर्घ आणि अवघड असे काम असू शकते, परंतु एका माणसाने मात्र हा इतिहास सोप्या भाषेत, मूळ मुद्द्याचा आशय न बदलता अगदी घराघरात पोहोचविला, इतकेच नव्हे तर चक्क या शिव-इतिहासावर नाटक सुद्धा लिहिले आणि ते अजरामर देखील केले. कोण ? हि व्यक्ती आहे एक ९७ वर्षांचे बाबा ! चला बाबांची ओळख करून घेऊया.
कोण हे बाबा ?
मध्यम उंची, अंगाने गोरे आणि काटक, साधारण छातीपर्यंत लागेल इतकी पांढरी शुभ्र दाढी, मागून मान झाकली जाईल इतके मोठे केस आणि तेही पांढरे, वय ९७ असूनही करारा पण गोडवा मिश्रित आवाज आणि तीक्ष्ण नजर आणि गोड हसरा चेहरा. अगदी आपल्या घरातल्या आजोबांचीच आठवण झाली ना ? आपले हे बाबा सुद्धा आपले आजोबाच आहेत कि, फरक इतकाच कि आजोबा आपल्याला जवळ बसून गोष्टी सांगायचे, हे बाबा मात्र त्यांच्या पुस्तकातून अगदी आपल्या समोर बसून आपल्याशी संवाद साधतात आणि इतिहास कथन करतात. नाव आहे “बळवंत मोरेश्वर पुरंदरे”, होय आपलेच बाबा, “शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्म-विभूषण बाबासाहेब पुरंदरे”.
बाबांचा जन्म २९ जुलै १९२२ साली पुण्यातला सासवड या गावचा. लहानपणापासूनच बाबासाहेबांना इतिहासात गोडी होती, त्यांचे वक्तृत्त्व उत्तम होते, अभ्यासू वृत्ती होती. आज बाबासाहेब एक उत्तम लेखक, कादंबरीकार, शिवशाहीर, वक्ते, नाटककार आणि इतिहासकार आहेत. बाबासाहेब इतिहासकार आहेत कि नाही हा खूप वादाचा विषय आहे. इतिहासकार हि खूप खोल बाब आहे, या विषयात आत्ता न डोकावता केवळ शिव-इतिहासाच्या जिज्ञासेपोटी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेणे योग्य ठरेल.
कशी लागली बाबांना इतिहासाची गोडी
बाबासाहेब लहान असतांना सर्वसामान्य लहान मुलाला ज्या कथा सांगण्यात येतात तशाच कथा त्यांना सांगण्यात आल्या, त्यांना कथा सांगितल्या गेल्या शिवरायांच्या, सह्याद्रीच्या, आपल्या दऱ्याखोऱ्या आणि पर्वतांच्या, संतांच्या आणि या कथा त्यांच्या मनावर परिणाम करत होत्या.
बाबासाहेब म्हणतात, ते ११ वर्षाचे असतांना प्रभात फिल्म कंपनी ने “सिंहगड” नावाचा एक सिनेमा केला होता आणि त्या सिनेमात कोंढाणा लढण्यासाठी जाणाऱ्या तानाजी मालुसरे यांची भूमिका “शंकरराव भोसले” यांनी केली होती. ती भूमिका पाहून बाबांना साक्षात तानाजी असेच असावेत असा भास झाला, त्यांना नवल वाटले कि इतिहासात इतक्या विलक्षण गोष्टी घडून गेल्या आहेत का ?
याचबरोबर बाबासाहेब आपल्या वडिलांसोबत पुण्यातील पर्वती येथे गेले होते, त्या ठिकाणी तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना गणपती आणि पार्वती यांच्या सोन्याच्या मुर्त्या दाखविल्या आणि बाबांना सांगितले कि आपले पूर्वज सुमारे २०० वर्ष आधी या मूर्तीच्या स्थापनेसाठी उपस्थित होते. अशा छोट्या गोष्टी ऐकून आपल्याला काही वाटो न वाटो बाबांना मात्र कमाल वाटे.
त्यांना वाटले कि काय गम्मत आहे, आमचे पूर्वज याच ठिकाणी आले होते, आज तिकडेच आम्ही आहोत, हीच एक मूर्ती इतके वर्ष जपून ठेवली गेली आहे, याचप्रमाणे त्यांना अनेक रंजक प्रश्न होते कि खरंच या भूतकाळातील घटनांचा शोध घेणे इतके रोमांचकारक आहे का ? अशा छोट्या छोट्या गोष्टींनी बाबांची इतिहासाबद्दल ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा वाढविली आहे मग यातूनच आज आहेत ते बाबासाहेब महाराष्ट्राला लाभले. (स्रोत: आय.बी.एन न्यूज)
बाबा खंत व्यक्त करतात
बाबा एका मुलाखतीत एक छोटा पण शिकण्यासारखा किस्सा सांगत होते, तो असा कि; बाबासाहेब लंडन मध्ये काही काळ राहिले होते, त्या काळात एके दिवशी त्यांना एक पत्र पाठवायचे होते. ते राहत होते तिकडे जवळच डाकघर असल्याने ते थेट डाकघरातच गेले, तिकडे अनेक पत्रे गोळा केली जात होती. बाबांना वाटले आपणही पटकन पत्र देऊन टाकू म्हणजे लवकर पोचते होईल. ते याच घाई मध्ये त्यांनी डाकघरातील कक्षात बसलेल्या मुलीकडून पोस्टाचे तिकीट विकत घेतले आणि घाईत ते तिकीट चिकटवून त्या मुलीकडे दिले.
बाबा निघतात तोच ती मुलगी त्यांना बोलावते आणि म्हणते या तिकिटावर आमच्या राणीचा फोटो आहे आणि तुम्ही हे तिकीट उलटे लावले आहे, आधी ते सरळ करा, बाबांनी ते तिकीट सरळ केले आणि त्या मुलीला प्रश्न केला कि अहो मी पैसे तर तेवढेच दिले होते, मग फरक काय पडतोय तिकीट उलटे लागो किंवा कसेही आणि जर तुम्हाला न दाखवताच मी ते पत्र टपालपेटीत टाकले असते तर काय ते पोहोचले नसते का योग्य पत्त्यावर ?
बाबांच्या प्रश्नाला उत्तर देताना ती मुलगी म्हणाली, माझ्या नकळत ते पत्र पेटीमध्ये गेले असता मी जबाबदार नसते परंतु माझ्या डोळ्यांदेखत माझ्याच देशाच्या राणीचे डोके उलटे करून तिकीट लागले आहे हा माझ्यासाठी माझ्या राणीचा आणि देशाचा अपमान समजते मी आणि म्हणून माझ्या डोळ्यादेखत हे होत असताना ते थांबवणे तर माझ्या हातात आहेच कि.
हा किस्सा सांगून बाबा खंत व्यक्त करतात, बाबा म्हणतात त्यांच्याकडे त्यांच्या इतिहासाबद्दल, राजाराणींबद्दल, देशाबद्दल किती अभिमान आहे, जागरूकता आहे मग आपल्याकडेच इतिहास आणि ऐतिहासिक मंडळी गांभीर्याने का घेतली जात नाहीत ? आपण इतिहासाची टिंगल-टवाळी आणि निंदानालस्ती का करतो ? समाजात शिवरायांबद्दल अनेक खोट्या दंतकथा रुजल्या आहेत आणि अशा वेळी सत्य नाही पण दंतकथा लोकांकडे जास्त जलद जातात म्हणूनच देशाला इतिहास संशोधन करणाऱ्या मंडळींची जास्त गरज आहे. आपण आपल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू याच निष्काळजीपणामुळे गमाविल्या आहेत याची बाबांना खंत वाटते.
बाबांची कार्यसंपदा
बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या आयुष्याची ७५ वर्षे शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी निगडित इतिहासावर संशोधन, व्याखाने, नाट्यनिर्मिती, लिखाण यामध्ये घालविले आहेत. या काळात त्यांनी अनेक गडकिल्ले पालथे घातले, इतिहासातील मंडळींच्या वंशजांना ते भेटले, बरीच माहिती गोळा केली आणि याचसोबत बाबांनी अनेक दुर्मिळ अशा ऐतिहासिक वस्तू जमविल्या आणि आपले घर अशा वस्तुंनी भरून टाकले. बाबासाहेबांनी ‘राजगड, पुरंदर्यांची नौबत, कलावंतिणीचा सज्जा, महाराज, फुलवंती, मुजर्याचे मानकरी, शेलारखिंड’ आणि अशा अनेक कथा, वर्णने आणि कादंबऱ्या लिहिल्या. बाबासाहेबांनी आजपर्यंत शिवाजी राजे आणि त्यांच्याशी निगडित इतिहासावर कैक ठिकाणी हजारो व्याखाने केली आहेत.
यासर्वांसोबतच, बाबासाहेब पुरंदरे हे नाव प्रामुख्याने ओळखले जाते दोन गोष्टींसाठी आणि त्या आहेत, ‘ राजा शिवछत्रपती’ आणि ‘जाणता राजा’. जाणता राजा हे बाबांनी लिहिलेले नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४ रोजी झाला होता. त्या दिवसापासून २५/३० वर्षे या नाटकाचे १२०० हुन अधिक प्रयोग झाले आहेत. फिरता रंगमंच, खरे हत्ती, घोडे असे प्राणी आणि असंख्य कलाकार असा सगळा लवाजमा हे भव्य नाटक अशा आवेशात सादर करतो कि प्रेक्षकांना हे नाटक कायम आठवणीत राहतं. याचबरोबर बाबांनी शिवरायांची जीवन कहाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सखोल अभ्यास करून ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाची निर्मिती केली. आजपर्यंत या पुस्तकाच्या १६/१७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून लाखो लोकांपर्यंत त्यांचे हे पुस्तक पोहोचले आहे.
गरज आहे का
आपला भारत आणि प्रामुख्याने महाराष्ट्र इतिहासाबाबतीत नेहमीच निष्काळजी राहिला आहे. अनेकांनी बाहेरून येऊन आपल्या इतिहासाचे कौतुक केले, शिवरायांचे भरभरून गोडवे गायले, शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि आपण मात्र ‘तू बरोबर, मी बरोबर कि तो बरोबर’ याच वादात आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले. बाबासाहेब इतिहासकार आहेत कि नाही या वरून सुद्धा वाद होऊ शकतात हे नवलच आहे, बाबासाहेब इतिहासकार असतील अथवा नसतील परंतु त्यांनी ज्या जिज्ञासेने इतिहास शिकण्याचे, समजून घेण्याचे, अनेक दुर्मिळ वस्तू शोधून जतन करण्याचे आणि त्यांना समजलेले शिवाजीराजे आपल्या घराघरात इतिहासाच्या संशोधनाच्या जटिल प्रक्रियेतून सोडवून जरा सोप्या भाषेत पोहोचविले हे काम मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे.
कदाचित त्यांच्या लिखाणात अथवा माहितीत काही त्रुटी असतीलही, सखोल अभ्यास आणि शोधातून त्या त्रुटी दूरही केल्या जाऊ शकतात परंतु आपण तर त्या दुरुस्त करण्याऐवजी त्या चुका का झाल्या या विषयावर वाद करतो..! प्रत्येकाला वाटते माझे शिवाजी राजे जगात पोहोचले पाहिजेत पण सुरुवात तर आपल्या घरापासून झाली पाहिजे ना ? मग अशा विषयात वाद घालून का शिवरायांचा पराक्रम साता-समुद्रापार नेला जाईल ?
याउलट आपल्याला गरज आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या आणि त्याहूनही उत्तम आणि संशोधक वृत्तीच्या माणसांची, जिज्ञासू अभ्यासकांची, इतिहासाचे जतन हि काळाची गरज हे भान असणाऱ्या शासनाची आणि इतिहासाबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येक भारतीयाची. म्हणून आपल्याला फक्त बाबासाहेब नकोत, आपल्याला त्यांच्यासारखे आणि त्याहूनही उत्तम हिरे हवेत तरच बाबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने पोचपावती मिळेल.
बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले गेले. यामध्ये इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डी.लिट. (२०१३) हि पदवी, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, २०१५ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्म-विभूषण पुरस्कार समाविष्ट आहेत. आपल्या स्वतःच्या जिज्ञासेतून शिवरायांचा अभ्यास करून, शिव-इतिहासाबद्दल जागृती करीत व्याखाने देऊन आणि सखोल अभ्यासातून शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी जवळपास ७५ वर्षे घराघरातील ३ पिढ्यांपर्यंत पोहोचविले आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून हा लेख त्यांना समर्पित.
Vilakshan Stutya lekh. Babasaheban baddal chi hi apurva mahiti dilyabaddal dhanyawad.
मनापासून आभार !
पोस्ट शेअर करायला विसरू नका.