“आपुनका लाईफ फुल साप सिडी के गेम की तरह है” कभी अप तो कभी डाउन.” “संजु” चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये येरवडा जेल मधुन बाहेर पडताच हे वाक्य बोलतो संजय दत्त.
वाक्य किती खरं आहे हे त्याच्या जिवणाबद्दल वाचुन, तो चित्रपट पाहुन किंवा त्याला जवळुन ओळखुन असणारे जाणतात. इतके उतार चढाव स्वतःच्या जीवनात पाहिलेल्या फार कमी आणि हयात असलेल्या अभिनेत्यांपैकी संजुबाबा एक आहे.
आपण इथे त्याचं कौतुक अजिबातच नाही करणार आहोत. त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याने भोगली. काही इतर मार्ग वापरून संजुबाबा केसच आपल्या बाजुने वळवु शकला असता पण वडीलांच्या लढण्याच्या निश्चयाने त्यानेही लढायचेच स्विकारले. इकडे आपण तो टाडा लागल्यानंतर १९९४-९५ मध्ये १८ महीने जेल मध्ये राहीला त्यादरम्यानचा एक मनाला स्पर्श करणाऱ्या नात्यांचा किस्सा एकणार आहोत.
टाडाच्या कायद्याखाली ९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेला तो पहीला आरोपी. ते आरोप किती खरे आहे हे आजही जनतेसमोर स्पष्ट झाले नाहीये. पण त्यावेळेला त्याला तरुंगात टाकण्यात आले. बाहेर वडील सुनील दत्त आणि त्याच्या बहीणी नम्रता दत्त आणि प्रिया दत्त हे त्याच्यासाठी जिवाचं रान करत होते. ऑगस्ट १९९४ मध्ये संजय दत्त ठाण्याच्या सेंट्रल जेल मध्ये होता. त्यावेळचा एक किस्सा आपल्या “मिस्टर ॲन्ड मिसेस दत्त, मेमरीज ऑफ अवर पेरेंट्स” ह्या पुस्तकात ह्या दोन्ही बहीनी सांगतात.
त्या महीन्यात संजय दत्तला भेटण्यासाठी कायदेशीर परवानगी सुनील दत्त यांनी काढली होती आणि रक्षाबंधनच्या दिवशी सुनील दत्त, नम्रता दत्त, प्रिया दत्त हे कुटुंब संजु बाबाला भेटण्यासाठी कारागृहात गेले. ते त्याला तिथे भेटले आणि दोन्ही बहीणींनी त्याच्या हातावर राखी बांधली. संजय दत्त खुप हताश आणि निराश झाला. त्याला अपराधी असल्यासारखे वाटु लागले. तो खाली मान घालुन होता.
“माझाकडे तुम्हा दोघींना देण्यासाठी काहीच नाहीए, हे एवढच देउ शकतो मी” असं म्हणत त्याने २रुपयाचे कुपन त्या दोघींसमोर ठेवले.
कारागृहात सर्व कैद्यांकडुन काही कामं करवुन घेतली जातात, त्या बदल्यात त्यांना असे कुपन मिळतात. संजय दत्तनेही असेच काम करुन ते कुपन त्यावेळेला मिळवले होते. त्याशिवाय त्याच्याकडे त्याचं असं काहीच नव्हतं. दोन्ही बहीणी रडु लागल्या. पण हे सर्व पाहुन त्यांचे वडील सुनील दत्त खुपच दुखी झाले. “डॅड ना इतकं तुटलेलं आम्ही कधीच पाहीले नव्हते, आम्ही एकमेकांकडे पाहुन केवळ रडत बसलो होतो” अशी आठवन प्रिया दत्त लिहितात.
तरुंगात असतांना असे बरेच किस्से आहेत, काही आपण “संजु” चित्रपटातही पाहीले तर काही पुस्तकात आहेत. असे रक्षाबंधन कोणाही बहीण भावाच्या वाटेला येउ नये. संजु बाबाने चुका केल्या, त्याचे परीणाम भोगले. स्वतःत सुधार करुन पुन्हा स्थिर देखील झाला. त्यात त्याच्या बहीणींचाही वाटा आहे. ते कुपन प्रिया दत्त यांनी अजूनही एखाद्या आठवनी सारखे जपुन ठेवले आहे. संजु बाबाच्या आयुष्यावर चित्रपट आला तेव्हा अनेक जणांनी टिका केली. तो इतका ग्रेट आहे का ? ते एका अतिरेकीवर काय चित्रपट काढताय ? इतपत बोलले गेले. पण प्रत्येकाला ह्या देशात आपली बाजु मांडण्याचा अधिकार आहे.
चित्रपटातल्या मुद्द्यांवर वाद होउ शकतो पण चित्रपटच नको असा आग्रह नको. अर्थातच ह्या लेखावरही टीका होईलच. असे कित्येक भाउ बहीण असतील ज्यांच्या आयुष्यात ह्याहीपेक्षा कठीण परीस्थितीत रक्षाबंधन केले असेल. हे मान्य. पण सेलिब्रिटी आणि करोडो कमाविणाऱ्या नटावर आणि त्याच्या कुटुंबावर ही वेळ येणे हे निराळेच आणि ह्यातून पुन्हा झेप घेऊन स्थिरावलेले हे कुटुंब आहे. म्हणून ह्या प्रसंगाला महत्व आहे.