भारतामध्ये क्रिकेट बद्दल सामान्य माणसांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. भारतामध्ये क्रिकेटचं एवढं आकर्षण खऱ्या अर्थाने निर्माण झालं ते 1983 च्या विश्वचषकानंतर. भारताने त्यावेळी संपूर्ण जगाला हादरा देत क्रिकेट विश्वचषक जिंकला. कोणी विचारही केला नव्हता भारत वेस्टइंडीजला हरवून विश्वचषकावर आपली दावेदारी सिद्ध करेल. या विश्वचषकाबद्दल अनेक किस्से, अनेक आठवणी आहेत. त्यातीलच एक किस्सा आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत.
1983 चा विश्वचषक म्हणजे भारतासाठी स्वतःला सिद्ध करण्याची फार मोठी संधी होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ यावेळी विश्वचषकामध्ये उतरला होता. पण यावेळी भारत जागतिक दृष्ट्या क्रिकेटमध्ये फारच मागासलेला संघ समजला जायचा आणि भारतातही क्रिकेटबद्दल एवढं आकर्षण नव्हते.
कपिल देव, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या सामान्य परिस्थितीतून आलेल्या खेळाडूंनी नावलौकिक गाजवल्यामुळेच क्रिकेट आज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पण तेव्हा असे नव्हते आणि जागतिक स्तरावर भारताला खूपच कमी लेखले जात असे. वेस्ट इंडिजचा संघ त्यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात असे. वेस्टइंडीज कडे व्हिव रीचर्ड्स सारखा दिग्गज फलंदाज तर होताच. त्यासोबतच अनेक घातक गोलंदाजही वेस्ट इंडिजच्या संघामध्ये होते.
या आधीचे दोन्ही वर्ल्ड कप वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकले होते आणि त्यामुळेच 25 जून 1983 ला होणाऱ्या या विश्वचषक अंतिम सामन्यामध्येही वेस्टइंडीज जिंकणार असे प्रत्येकाला वाटत होते. त्यावेळी भारताला पाठिंबा देणारे अनेक चाहतेही म्हणत होते की हा सामना वेस्टइंडीज जिंकणार पण भारतीय संघाने हा सामना जिंकत इतिहास घडवला.
पण खरा किस्सा इथून पुढे सुरू होतो, सामना संपल्यानंतर कपिल देव वेस्टइंडीज संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यांना तेथे सर्वांशी बातचीत करायची होती, सर्वांना हस्तांदोलन करायचे होते. पण जेव्हा कपिल देव त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तेव्हा तिथे स्मशान शांतता पसरलेली होती. प्रत्येक खेळाडू शांतपणे बसलेला होता. तिथे त्यांना एक कोपऱ्यामध्ये शँम्पेन बॉटल्स ठेवलेल्या दिसल्या. या बाटल्या वेस्टइंडीज संघाच्या काही खेळाडूंनी जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणून ठेवलेल्या होत्या. पण त्यांच्या दुर्दैवाने तो सामना त्यांनी गमावला आणि त्यांना आनंद साजरा करण्यासाठी काही कारणच उरले नाही. पण याच सामग्री वर कपिलदेव यांची नजर पडली.
सर्वांशी भेटल्यानंतर आणि चर्चा झाल्यानंतर कपिलदेव यांनी निघताना क्लाईब लाँयड यांना ‘त्यातील काही बॉटल मी घेऊन जाऊ का ?’ असा प्रश्न केला. कारण भारत जिंकेल अशी आशा कोणालाच नव्हती म्हणून भारतीय क्रिकेट संघापैकी कोणीही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काहीच आणून ठेवलेले नव्हते. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच कपिल देव यांनी त्यातील काही बॉटल्स घेण्याबद्दल विचारले होते. क्लाईब यांनी काहीही न बोलता कपिलदेव यांना इशारा करून त्या बॉटल घेऊन जायला सांगितले.
त्यानंतर, कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांनी मिळून काही बॉटल घेतल्या आणि भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन आनंदोत्सव साजरा केला.