सध्या छोट्या पडद्यावर अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या चरित्रपटांची मालिका झळकताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी साकारलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या बड्या हस्तींच्या आयुष्यावर मालिका सुरु आहेत. पण आता, भोसले कुटुंबात आपल्या पोटी एका राजाला जन्म देणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता यांच्या चरित्रपटावरील मालिका लवकरच सुरु होणार आहे.
मध्यंतरी या मालिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत काम करणार असल्याचे कळत होते, पण आता अमृता पवार ही अभिनेत्री या मालिकेत जिजामाता यांचे व्यक्तिमत्व साकारणार असल्याचे समोर आले आहे. या आधी अमृता पवार ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ तसेच ‘ललित २०५’ या मालिकांमध्ये झळकली होती. दरम्यान ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेचा टिझर पाहता कळते की कितीही संकटं आली तरी जिजामाता कधी मागे फिरल्या नाहीत. संकटांना न घाबरता पुढे कसं जावं हे त्यांनी शिवबांना लहानपणापासूनच शिकवले. त्यांचे चरित्रपट पाहणे म्हणजे नक्कीच एक पर्वणी असेल. या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक निघाले. त्यात दाखवल्या जाणाऱ्या त्यांच्या माऊली म्हणजे जिजामाता यांचे व्यक्तिमत्व अनेक वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारली. उदाहरण द्यायचे झाले तर मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर यांनी त्यांची भूमिका सुंदररित्या साकारली. पण आता अमृता पवार जिजामातांची भूमिका कशी साकारेल ही नक्कीच पाहण्यासारखी गोष्ट ठरेल.
‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरी’, असे म्हणतात. पण त्या काळात आपल्या पोटात नऊ महिने सांभाळून ठेवणाऱ्या आणि शत्रूंशी दोन हात कसे करावे हे शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची मालिका पाहायला प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक असणार यात काही शंका नाही. राजमाता जिजाऊंवरील हि मालिका येत्या १९ ऑगस्टपासून सोनी मराठी या वाहिनीवर येणार आहे.
Good