विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर धोनीला बीसीसीआय निवृत्ती घ्यायला सांगणार का किंवा धोनी स्वतःहून निवृत्ती घेणार का ह्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण ह्या चर्चाना सध्यातरी पूर्णविराम लागणार असे म्हणावे लागेल. कारण धोनीचा सध्यातरी निवृत्ती घेण्याचा कुठलाही विचार नसून तो आगामी दोन महिने लष्करामध्ये सेवा बजावण्यासाठी जात आहे अशी बातमी नुकतीच हाती आली आहे. इंडिया टुडेने हि बातमी दिली असून त्यात असे म्हटले आहे कि आपण पुढील २ महिन्यांसाठी उपलब्ध नसू असे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे.
त्यामुळे आगामी वेस्टइंडीज दौऱ्यात धोनी भारतीय संघासोबत नसेल. महेंद्रसिंग धोनी ह्याच्याकडे लेफ्टनंट कर्नल हे सैन्यातील अत्यंत महत्वाचे असे पद असून तो लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. रविवारी म्हणजेच २१ जुलै रोजी आगामी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी संघनिवड केली जाणार आहे. दौऱ्याची सुरुवात ३ टी-२० सामन्यांद्वारे होणार असून त्यानंतर तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान रंगणार आहेत.
विश्वचषकातील पराभवानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनी धोनीवर टीका केली होती. अनेकांनी धोनीने आता निवृत्त व्हावे आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे मत मांडले होते. त्यावर धोनी काय प्रतिक्रिया देतो किंवा काय निर्णय घेतो ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण धोनीने आपल्या निवृत्तीविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.