२६ जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज आम्ही तुमची ओळख कारगिल युद्धातील एका वीर जवानाशी करून देत आहोत. कारगिल युद्धातील हा प्रसंग ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील अशी हि कथा आहे. ऐकुया हि कथा त्याच नायकाच्या तोंडून ज्यांचं नाव आहे सुभेदार योगेंद्र सिंह यादव. ते सांगतात,
२० मे १९९९ चा तो दिवस मला आजही लक्षात आहे. त्यावेळी मी केवळ १९ वर्षांचा होतो. सैन्यात भरती होऊन अडीच वर्ष होत आली होती. ५ मे रोजी माझं लग्न होणार होतं म्हणून मी सुट्टी घेऊन घरी आलो होतो. २० मे ला हेड क्वार्टरकडून एक संदेश माझ्यासाठी आला होता. दराज सेक्टरच्या तोलोलिंग पहाडीवर चढाई करून त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकविण्याचा आदेश हेड क्वार्टरने आमच्या बटालियनला दिला होता. पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून त्या पहाडीवर कब्जा केला होता व आम्हाला ती पहाडी परत मिळवायची होती.
मोहीम अतिशय कठीण होती. हे ठिकाण काबीज करण्यासाठी आम्हाला २२ दिवस निकराची लढाई करावी लागली. अखेर २२ दिवसांच्या दीर्घ लढाईनंतर आम्ही पाकिस्तानला तेथून हुसकावून लावले व कारगिल मोहिमेचा विजयी प्रारंभ केला. तोलोलिंग मोहीम फत्ते केल्यानंतर आमचं पुढचं लक्ष्य होतं टायगर हिल टॉप. तोलोलिंग काबीज करण्यापेक्षा टायगर हिल टॉप काबीज करणं अतिशय अवघड होतं कारण टायगर हिल टॉपवर पाकिस्तानने पूर्णपणे कब्जा केलेला होता. शिवाय तिथपर्यंत चढाई करणे अतिशय कठीण काम होते. तरीही आम्ही न डगमगता आमची चढाई सुरूच ठेवली. पाकिस्तानी सैन्यासाठी आम्ही अतिशय सोपी शिकार होतो, कारण पाकिस्तानी सैन्य उंचावर होतं आणि आम्ही खालून वर चढून येत होतो.
टायगर हिल टॉपवर चढाई करतांना आमचा रस्ता रोखू पाहणाऱ्या ५ पाकिस्तानी सैनिकांना आम्ही ठार केले व पुढे चालू लागलो. टायगर हिल टॉपवरील पाकिस्तानी सैन्याला आम्ही येत असल्याची कुणकुण लागली होती. त्यांनी आमच्यावर जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. आमच्याकडे दारुगोळा कमी होता. जितका साठा शिल्लक आहे त्याचा वापर करून मोहीम फत्ते करणे गरजेचे होते. आम्ही अचानक फायरिंग बंद केली होती. फायरिंग बंद करणे हा आमच्या योजनेचाच एक भाग होता. आम्ही फायरिंग बंद केल्यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना वाटले कि आपण केलेल्या गोळीबारात सर्व भारतीय सैन्य मारले गेले त्यामुळे ते बेसावध झाले.
आम्ही ठरल्याप्रमाणे ह्याच संधीचा फायदा उचलला व टायगर हिलटॉपवरील पाकिस्तानी सैन्यावर अचानक धावा बोलला. आम्ही केलेल्या अचानक हल्ल्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले व काही पाकिस्तानी सैनिक पळून गेले. आम्ही टायगर हिल टॉपवर कब्जा मिळवला असे आम्हाला वाटले व आम्ही विजयाचा जल्लोष सुरु केला पण अंदाजे ३५ मिनिटानंतर परिस्थिती बदलली. ३५ मिनिटानंतर पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला. ह्यावेळी त्यांचे सैन्य संख्येने खूपच जास्त होते. आम्ही व पाकिस्तानी सैन्य आमने-सामने उभे टाकलो होतो. पुन्हा लढाईला सुरुवात झाली. त्यात माझे अनेक सहकारी मारले गेले. मी सुद्धा गंभीररीत्या जखमी झालो होतो.
पाकिस्तानी सैनिकांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती. वापस जाताजाता त्यांनी अनेक शाहिद भारतीय जवानांच्या पार्थिव देहावर गोळ्या झाडल्या. एका पाकिस्तानी सैनिकाने जाताजाता माझ्या पायांवर व हातावर गोळ्या झाडल्या. तसेच एक गोळी माझ्या छातीवर त्याने झाडली. मला वाटलं आता सगळं संपलं, आता मी मरणार. पण एक चमत्कार झाला. माझ्या जॅकेटच्या वरच्या खिशात काही नाणी होती त्या नाण्यांनीच माझा जीव वाचवला. गोळी छातीत न घुसता खिशातील नाण्यांना लागली होती व मी वाचलो होतो. केवळ देवाची कृपा म्हणूनच मी वाचलो.
माझे हात रक्तबंबाळ झाले होते. माझ्याकडे एक हँडग्रेनेड शिल्लक होते पण ते फेकण्याची ताकद माझ्या हातांमध्ये उरली नव्हती. ते ग्रेनेड मी काढताच फुटले. पण त्यातूनही मी बचावलो. अखेर मी माझ्या शाहिद सहकार्याची रायफल हाती घेतली व तुफान गोळीबार केला व तेथून कसाबसा निसटलो. मोठ्या मुश्किलीने मी भारतीय सैन्याच्या बेस कॅम्पजवळ पोहोचलो होतो.
मी केवळ अर्धा डब्बा बिस्किटांवर ७२ तास काढले होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. बेस कॅम्पवर पोहोचल्यावर प्रथम मी पाकिस्तानी सैन्याच्या रणनीतीची माहिती दिली. आधीच पोटात काही नव्हते व हाताला गोळी लागल्यामुळे मी गंभीर जखमी झालो होतो त्यामुळे मी बेशुद्ध झालो. त्यानंतर तीन दिवसांनी मी शुद्धीवर आलो तेव्हा मला समजले कि माझ्या बटालियनने टायगर हिल टॉपवर कब्जा केला. आम्ही जिंकलो होतो. टायगर हिल टॉपवर पुन्हा तिरंगा फडकला होता.