राज कपुरचे एकाच गोष्टीवर सर्वाधिक प्रेम होते ते म्हणजे स्वतः राज कपूरवर. आता ह्यातुन हा माणूस स्वार्थी असावा असे तुम्हाला वाटलं असेल पण तसे नाही.
रणबीरराज पृथ्वीराज कपुर. म्हणजे हिंदी सिनेमाचे शो मॅन. त्यांना ह्या जगाचा निरोप घेऊन २ जुनला ३१ वर्षे होतील. तरीही ह्या माणसामध्ये असे काय होते की त्याच्या नावाचा दबदबा अजूनही चित्रपट व्यवसायात आहे आणि भारतीय चित्रपटाचे चाहते अजूनही त्यांचे चित्रपट पाहताय ? तरुण कलाकारांना आजही त्यांच्या विषयी कुतुहल आहे. त्यांची मुले व नातवंडे अजूनही चित्रपटात सक्रिय आहे आणि राज कपुरची पुढची पीढी त्यांचा वसा कसा पुढे नेतेय हे उत्सुकतेने आजचा प्रेक्षक पाहतोय. काय ही जादु आहे “कपूर” नावाची ? जाणून घेउया.
राज कपूर यांचे पुर्ण नाव होते रणबीर राज कपुर. १४ डिसेंबर १९२४ ला आत्ताच्या पाकीस्तानात असलेल्या आणि तेव्हाच्या ब्रिटिश भारतात असलेल्या पेशावरच्या खैबर पख्तूनख्वा येथे कपुर हवेलीत त्यांचा जन्म पृथ्वीराज कपुर आणि रामसारनी ह्या कपुर दांपत्याच्या पोटी झाला. कपुर खानदान हे खानदान तेव्हाही नावाजलेलेच होते. कालांतराने त्यांनी मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. पृथ्वीराज कपुरना अभिनयात रस होता तसाच तो राज कपुर यांना अगदी लहान वयापासुन होता.
वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी “ईंक्लाब” (१९३५), ह्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली. त्यांना पहीली मुख्य भूमिका अवघ्या २३ व्या वर्षी “निलकमल” (१९४७), ह्या चित्रपटात मिळाली, जो अभिनेत्री मधुबाला ह्यांचा पहीला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी मागे वळुन पाहीले नाही. अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी आर.के. स्टुडिओ या नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आणि “आग” हा चित्रपट दिग्दर्शित करुन सर्वात तरुण दिग्दर्शक असल्याचा मानही मिळविला. ह्याच चित्रपटात ते आणि नर्गिस मुख्य भुमिकेत होते. इथेच ह्या अजरामर जोडीची ओळख झाली आणि ह्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावत अधिराज्य गाजविले.
राज कपुर ह्यांच्या १९५२ साली प्रदर्शित झालेल्या “आवारा” ह्या चित्रपटाने टीकाकार आणि प्रेक्षक दोघांची मने जिंकली आणि राज कपुर ह्यांच्या ह्या चित्रपटातला अभिनय हा कौतुकास पात्र ठरला. नावाजलेल्या “टाईम्स” साप्ताहिकाने तर ह्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट १० अभिनीत भुमिकेमध्ये स्थान दिले. ह्या आधी त्यांचा “अंदाज” हा चित्रपटही खुप गाजला होता. त्यात दिलीप कुमार आणि प्रेमनाथ देखील होते. नंतर “श्री ४२०”, “जागते रहो”, “जिस देश में गंगा बेहती है”, “बॉबी” असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित आणि आणि अभिनीत केले.
त्यांना जवळुन ओळखणारे सर्वच त्यांच्या चित्रपटप्रेमाचे साक्षीदार आहेत. ते सांगतात राज कपुरचे एकाच गोष्टीवर सर्वाधिक प्रेम होते ते म्हणजे स्वतः राज कपूरवर. आता ह्यातुन हा माणूस स्वार्थी असावा असे तुम्हाला वाटलं असेल पण तसे नाही. स्वार्थ आणि स्वाभिमान ह्यात फरक आहे. राज कपुर हे प्रचंड स्वाभिमानी होते. त्यांच्या चित्रपट बनवण्याच्या प्रक्रीयेतही तो असायचाच. चित्रपट उत्कृष्ट व्हायलाच हवा असा त्यांचा अट्टहास असायचा ज्याचा त्यांच्या सोबत काम करणाऱ्याना त्रासही व्हायचा. “मेरा नाम जोकर” ह्या सिनेमासाठी त्यांनी तब्बल ६ वर्ष घेतली. हा त्यांच्या मनाच्या जवळचा चित्रपट होता. स्वतःची खरी कथा जणू ते या चित्रपटातुन मांडु पाहत होते. ह्याच चित्रपटात त्यांचे पुत्र आणि नावाजलेले अभिनेते व अभिनेता रणबीर कपुरचे वडील ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केले.
तरुण राज कपुर म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती. हा चित्रपट सपशेल आपटला. चार तासाच्या ह्या चित्रपटाला दोन मध्यांतर होते. चित्रपटासाठी एवढा काळ बसुन राहण्याची भारतीयांची सवय हळूहळू सुटत चाललेली. आर्थिक अडचणीत सापडलेले असतांनाही त्यांनी हा चित्रपट पुर्ण केला. घरातल्या वस्तु विकून चित्रपट पूर्ण करण्याचे वेड ह्या माणसात होते असे ऋषी कपूर सांगतात.
ह्या चित्रपटानंतर “बॉबी” हा ऋषी कपुर आणि डिंपल कपाडिया ह्यांचा अभिनय असलेला चित्रपट त्यांनी आर्थिक अडचणीत असतांना हाती घेतला आणि चित्रपट सुपरहीट ठरला. भारतीय सिनेमातीक स्त्री प्रतिमेला हादरा देत डिंपल कपाडिया यांच्या बोल्ड भुमिकेने चर्चा घडवली. बिकीनी हा प्रकार पहील्यांदा भारतीय प्रेक्षकांनी पाहीला जो त्यांच्यासाठी फार नवीन होता. ह्या चित्रपटाने कपूर घराण्याला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि राज कपूर नव्या जोमाने कामाला लागले.
राज कपुर ह्यांचे स्वतः वर प्रेम असले तरी ते कामापुढे स्वतःची ही तमा बाळगत नसत. चित्रीकरणाच्या वेळी ते आपल्या युनिट सोबतच जेवत आणि संपले की त्यांच्या मोटारीत जाउन झोपत, अशी आठवण त्यांचे सहकारी खालीद एहमद सांगतात. त्यांच्या काही चित्रपटांवर अश्लीलतेची टीका झाली. कारण त्यांमध्ये स्त्रीचे शरीरप्रदर्शन होते. “राम तेरी गंगा मैली”, “सत्यम शिवंम सुंदरम”, ” बॉबी”, “प्रेमरोग” हे ते चित्रपट. खरंतर ह्या सर्व चित्रपटांमधुन ते स्त्रीयांचे प्रश्नच मांडत होते पण सादरीकरण हे त्या वेळच्या भारतीय समाज मानसिकतेसाठी नवीन होते. हे सादरीकरण नक्कीच काळाच्या पुढचे होते. त्यांच्यावर पाश्चात्य सिनेमाचा पगडा होता. तिकडे नग्नता हा विषय फार मोकळेपणाने स्विकारला गेला होता आणि तसाच तो भारतीय चित्रपटात ही व्हावा असे त्यांना वाटत होते.
हॉलीवूडची नग्नता पाहणारे माझ्या चित्रपटांना मात्र अश्लील समजतात हा दुट्टपीपणा मला सहन होणार नाही असे ते म्हणत. पुरुषी मानसिकतेत फसवली गेलेली “राम तेरी गंगा मैली” मधली “गंगा”, खोट्या सौंदर्याच्या कल्पनेने टाकुन दिलेली ‘सत्यम शिवम सुंदरम ‘मधली “रुपा”, विध्वेची कथा सांगणारी “प्रेम रोग” मधली “मनोरमा” ह्या सगळ्या भुमिकेतुन राज कपुर समाजाला पुरुषसत्ताक मानसिकतेत स्त्रीची होत असलेली पिळवणुक आणि समाजाच दांभिकत्वच दाखवत होते. पण हे समाजाला फार उशीरा कळाले. म्हणूनच अजूनही त्यांच्या ह्या चित्रपटांचे कुतुहल आहे तरुण कलाकारांना.
“मेरा नाम जोकर” जो त्या वेळी आपटला असला तरी नंतर कल्ट सिनेमा म्हणून नावाजला गेला. समाजाची दांभिकता आणि वासना ते “राम तेरी गंगा मैली” च्या एका दृश्यात अचुक टिपतात जेथे गंगा ट्रेन मध्ये आपल्या भुकेल्या बाळाला दुध पाजण्यासाठी सर्वांसमोर स्तनपान करते. तिथे तिच्या स्तनाकडे पाहणारे ट्रेन मधले प्रवासी आणि सिनेमागृहातले प्रेक्षक ह्यांच्या नजरा समाजाबद्दल बरच सांगुन जातात.
तेच स्तन जे गंगा धबधब्यात आंघोळ करत असलेल्या गंगाचेच, तिथे ते ज्यांनी चवीने पाहीले तेच अश्लील म्हणून हा चित्रपट न बघण्याचा सल्ला देउ लागले. व्वा रे संस्कृती !. ह्याच संस्कृतीला पायदळी तुडवत कित्येक “गंगा”, “रुपा”, “मनोरमा” प्रत्यक्षात रोज शोषल्या जात आहेत पण राज कपुर सारख्यांनी ते जसेच्या तसे दाखवले की मात्र संस्कृती बाटते आपली. असो, हळूहळू का असेना राज कपूर ह्यांचा वारसा पुढे नेत आज अनेक दिग्दर्शक समाज पुढे नेत आहेतच.
ह्या “शो मॅन” ला भारतीय चित्रपटातला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि तो स्विकारण्यासाठी नवी दिल्लीतल्या सिरी फोर्ट सभागृहात असताना त्यांना एस्थमाचा अटॅक आला. त्यांना चालता येत नव्हते म्हणून राष्ट्रपती स्वतः खाली उतरले आणि त्यांना पुरस्कार सोपवला त्यानंतर तातडीने त्यांना ॲम्स इस्पितळात दाखल करण्यात आले व एक महीना ते तिथेच होते. त्यावेळी “हेना” ह्या चित्रपटावर ते काम करत होते पण २ जुन १९८८ ला ह्या ‘शो मॅन’ ने कायमची एक्सिट घेतली. त्यांनी भारतीय सिनेमासाठी दिलेल्या योगदानाचा भारत ऋणी राहील. रणबीर कपूर, राज कपूर ह्यांचा नातु म्हणतो की मला जर काही मिळवायचे असेल तर हेच वेडेपण, जे माझ्या आजोबांचे चित्रपटांसाठी होते तेच. बघुया. कपुर ! नाम ही काफी है !