“जितेंद्र यांच्या पालकांचा इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस होता. फिल्म प्रोड्युसरला ते ज्वेलरी भाड्याने देत असत आणि कदाचित जितेंद्रचा सिनेमाशी संबंध येण्याचे हेच कारण ठरले”
जितेंद्र हे नाव सर्वश्रुत आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाला मोहित केलेलं आहे. जशी प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचाल संघर्षातून होते तशीच जितेंद्र यांचीही झालेली आहे. काय आहे त्यांच्या वाटचालीमधील संघर्ष जाणून घेऊयात. जितेंद्र यांच्या नृत्यातील कौशल्याबद्दल त्यांचे अनेक वेळेस कौतुक केले जाते, त्यांचा अभिनय आणि नृत्यातील योगदानामुळे त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यासोबतच त्यांना 2006 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी चित्रगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी चित्रपट केलेले आहेत. त्यांनी 80 हुन अधिक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये परत बनवण्याचा विक्रम केलेला आहे, यातील बहुतांशी सिनेमे तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे होते. कृष्णा आणि जितेंद्र हे दोघेही चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. जितेंद्र यांचा जन्म सात एप्रिल 1942 रोजी अमृतसर या पंजाबमधील शहरामध्ये झाला होता. त्यांचे त्यांच्या पालकांनी ठेवलेले नाव रवी कपूर असे होते. जितेंद्र यांची चित्रपट सृष्टीतील सुरुवात ही “फिल्मीच” म्हणावी लागेल. त्यांचे पालक इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करत असत, त्यामुळे चित्रपटांमध्ये लागणारे दागिने ते चित्रपट निर्मात्यांना देत असत.
एकदा जितेंद्र, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्हि. शांताराम यांच्याकडे दागिने देण्यासाठी गेले असता शांताराम यांच्या लक्षात आले की या मुलामध्ये अभिनय करण्याची प्रचंड क्षमता आहे. मग त्यांनी जितेंद्रला सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांची नवरंग या चित्रपटामध्ये डबिंग करण्याची संधी दिली. हा चित्रपट 1959 ला प्रदर्शित करण्यात आला होता. जितेंद्र यांनी या संधीचं सोनं केलं. त्यानंतर, त्यांनी मागे वळून न बघता इतिहास घडवला. नवरंगमुळे जितेंद्र यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला कुठलाही हातभार लागला नाही, पण व्हि.शांताराम यांना मात्र जितेंद्र भावले होते.
शांताराम यांना जितेंद्रमध्ये अभिनयाची क्षमता दिसत असे, त्यामुळेच व्हि. शांताराम यांनी 1964 साली जितेंद्र यांना घेऊन “गीत गाया पत्थरोने” हा चित्रपट केला. व्ही शांताराम यांनीच जितेंद्र यांना “जितेंद्र” असे नाव दिले. गीत गाया पत्थरोने या चित्रपटाने बाँक्स ऑफिसवर बर्यापैकी कमाई केली, पण यामुळे जितेंद्र यांचे करिअर सावरण्यास मदत झाली नाही. जितेंद्र तरीही थांबले नाही. 1967 साली एका गुप्तहेराच्या जीवनावरील एक रहस्यमय चित्रपट त्यांना ऑफर झाला. त्यांनी तो चित्रपट करायचे ठरवले. त्यातील जितेंद्र यांची भूमिका रसिकांना खुप भावली.
हा चित्रपट जितेंद्र यांच्या करिअरमधील पहिला आर्थिकदृष्ट्या हिट चित्रपट ठरला. यानंतर जितेंद्र यांचा प्रवास चालू झाला. जितेंद्र यांची डान्समधील प्रसिद्ध “स्टाईल” म्हणजे “मस्त बहारो का मै आशिक” या मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गाण्यातील त्यांनी केलेला तो डान्स. त्यांनी या गाण्यामध्ये वापरलेला पांढरा टी शर्ट आणि त्यासोबत वापरलेले पांढऱ्या रंगाचे बूट त्या काळामध्ये तरुणांसाठी एक फॅशन झालेली होती. जितेंद्र यांनी 80 च्या दशकांमध्ये अनेक सुप्रसिद्ध चित्रपट दिले, त्यापैकी जस्टीस चौधरी (1981), मवाली (1982), हिम्मतवाला (1983), जानी दोस्त व तोफा (1984) हे चित्रपट रसिकांनी डोक्यावर उचलून धरले होते.
मध्यंतरी एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले होते. या पुस्तकामध्ये असा उल्लेख होता की हेमा मालिनी आणि जितेंद्र हे लग्न करणार होते. जितेंद्र यांनी त्यांना लग्नासाठी मागणीही घातली होती, पण असं म्हटलं जातं की हेमा मालिनी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यानंतर जितेंद्र यांनी त्यांची बाल मैत्रिण शोभा कपूर यांच्याशी विवाह केला. या दांपत्याला दोन अपत्य आहेत, एक तुषार कपूर जो आज हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे, तर दुसरी कन्या आहे, एकता कपूर. एकता कपूर बालाजी प्रॉडक्शन्सच्या अंतर्गत अनेक मालिका तयार करत असते.
तिने अनेक यशस्वी चित्रपटही दिलेले आहेत. जितेंद्र यांच्याबद्दल जाणून घेण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे जितेंद्र यांनी गोरेगाव सेंट सेबेस्टीयन गोन या शाळेमध्ये आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि याच शाळेमधून हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांनीही त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. पुढे या दोघांनीही चर्चगेट मधील केसी कॉलेजमध्येच आपले पदवीचे शिक्षणही पूर्ण केले होते.