अब्दुल कलाम हा शब्द राष्ट्रभक्ती आणि प्रेरणा ह्या शब्दांसाठीचा समानार्थी शब्द म्हणावा लागेल इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. भारताच्या प्रगतीमध्ये एपीजे अब्दुल कलाम ह्यांचा सिहांचा वाटा आहे हे सर्व भारतीयांना माहित आहे. म्हणूनच अब्दुल कलाम हे नाव कानावर पडलं कि मनात आपोआप ह्या थोर व्यक्तीबद्दल आदराचे भाव निर्माण होतात. एक महान शास्त्रज्ञ, थोर शिक्षक आणि महान देशभक्त म्हणून आपण त्यांना ओळखतो. भारताच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने अंतराळात भारताचा दबदबा निर्माण केलाय आणि त्यात अब्दुल कलाम ह्यांचे फार मोठे योगदान आहे.
अब्दुल कलाम ह्यांनी भारतासाठी, भारतातल्या लोकांसाठी जे केलं आहे त्यासाठी भारतीय सदैव त्यांचे ऋणी राहतील. आज माहिती घेऊया अब्दुल कलाम ह्यांनी भारताच्या विज्ञान व संशोधन क्षेत्राला दिलेल्या बहुमूल्य योगदानांची….
१) आपले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे SLV अर्थात सॅटेलाईट लाँच वेहिकल असावे असा विचार भारत खूप दशकांपासून करत होता. भारताने १९७५ साली आपला पहिला उपग्रह रशियाच्या मदतीने अवकाशात सोडला होता पण भारताला स्वतःचे, स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सॅटेलाईट लाँन्चर हवे होते. ते स्वप्न अब्दुल कलाम ह्यांच्या अथक परिश्रमामुळे सत्यात उतरले. भारताने सॅटेलाईट लाँच वेहिकल-३ (SLV -३) बनवले आणि १९८० साली रोहिणी हा उपग्रह अंतराळात सोडला. आता भारताला आपले उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नव्हते. सर अब्दुल कलाम SLV -३ च्या संशोधन व निर्माण प्रकल्पाचे डायरेक्टर होते व ह्या स्वदेशी बनावटीच्या सॅटेलाईट लाँन्चर व्हेकल निर्मितीत त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण होते.
२) ७० च्या दशकात भारताने क्षेपणास्त्र निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यावेळी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट असे दोन प्रकल्प क्षेपणास्त्र निर्मितीसाठी हाती घेण्यात आले होते. प्रोजेक्ट डेव्हीलचे लक्ष्य होते लघु पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र निर्माण करण्याचे. पण काही कारणांमुळे हा प्रकल्प १९८० मध्ये थांबवला गेला होता. पण ह्या प्रकल्पावर घेतलेली मेहनत वाया गेलेली नव्हती कारण ह्यातूनच पुढे पृथ्वी ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आणि ह्या प्रकल्पाचे डायरेक्टर होते एपीजे अब्दुल कलाम
३) इसरोसाठी २ दशकं काम केल्यानंतर अब्दुल कलाम ह्यांची नियुक्ती Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) ह्या प्रकल्पाचे सीइओ म्हणून करण्यात आली. तुम्हाला प्रश्न पडू शकतो कि Integrated Guided Missile म्हणजे काय. Integrated Guided Missile हे लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी बनवण्यात आलेलं मिसाईल आहे. ह्यामध्ये अस्थिर असलेले किंवा स्थिर असलेले लक्ष्य रडार किंवा इतर पद्धतीने ट्रॅक करण्यात येते.
मिसाईलची दिशा आणि त्याने दिलेल्या टारगेटचा अचूक भेद करावा ह्यासाठी सॅटेलाईटचीही मदत घेतली जाते. त्यामुळे कुठल्याही वातावरणात, दिवस असो किंवा रात्र हे गाईडेड मिसाईल्स आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करतातच. भारताच्या ताफ्यात असलेली अग्नी आणि पृथ्वी हि क्षेपणास्त्रं सर अब्दुल कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यामुळेच आपले लाडके सर अब्दुल कलाम मिसाईल मॅन ह्या नावाने सुद्धा ओळखले जातात.
४) १९९२ ते १९९९ दरम्यान अब्दुल कलाम संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच देखरेखीखाली भारताने एक अभूतपूर्व असे यश मिळवले होते. पोखरण इथे घेण्यात आलेल्या अणुचाचणीमुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेसहित संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याची कल्पना आली होती. भारत आण्विक शक्तीने संपन्न झाला. पोखरण इथे घेण्यात आलेली अणुचाचणी डीआरडीओचे सीईओ म्हणून सर अब्दुल कलाम ह्यांच्याच देखरेखीखाली घेण्यात आली होती.
५) हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कोरोनरी स्टेन्टचे महत्व किती आहे हे सांगण्याची गरज नाही. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधून हृदयाला आवश्यक रक्तपुरवठा झाला नाही तर माणसाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ह्या धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे हृदयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थितरीत्या होऊ शकत नाही. त्यासाठीच स्टेंटचा वापर केला जातो. हे स्टेण्ट अतिशय महागडे होते, पण सर अब्दुल कलाम ह्यांनी कार्डिओलॉजिस्ट बी सोमा राजू ह्यांच्या सहकार्याने 1994 साली स्वदेशी बनावटीच्या स्टेण्टची निर्मिती केली.
स्वदेशी बनावटीच्या ह्या स्टेंटमुळे भारताला विदेशातून स्टेंट आयात करण्याची गरज उरली नाही. ज्यामुळे स्टेण्टच्या किमती ५० टक्क्यांपर्यंत कमी झाल्या. कमी झालेल्या किमतीमुळे स्टेण्ट विकत घेणे सर्वसामान्य लोकांना शक्य होऊ लागले. ह्या स्टेण्टला कलाम – राजू स्टेण्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
६) मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अएरॉनॉटिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवणाऱ्या अब्दुल कलाम ह्यांनी हलक्या विजांच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्येही बहुमूल्य योगदान दिले. ह्या विमानांच्या निर्मितीमुळे भारताची हवाई ताकद अजून वाढली.