८०-९० च्या दशकात सिनेमा पहायला गेलो की अमिताभ बच्चन, सनी देओल, अनिल कपूर, शाहरुख खान हे हिरो आणि त्यांची पडद्यावरची भूमिका तगडी असायचीच. पण जवळ जवळ सगळ्या फिल्म्स मधला एकच विलन इतका डेंजर असायचा की त्याचे कट कारस्थान आणि भारदस्त शरीर आणि आवाजा समोर ह्या होरोंचा काही टीकाव लागणार नाही असं वाटायचं. पण स्क्रिप्टमध्ये चांगल्याचा वाईटावर विजय दाखवायचा हे ठरलेलं असल्याने “तो” विलन हरायचा, नाहीतर हा विलन केव्हाही ह्या सर्व हिरोंवर भारीच पडला असता.
कोण तो ? आहो तोच तो. ज्याचा आवाज भारदस्त, चेहरा भयानक वाटावा असा (पण फक्त विलन साकारतांना), डोळे वटारले की समोरचा गार. तो म्हणाला “मोगॅंबो खुश हुआ !” तर तो एकटाच खुश असतो, बाकी सगळे “आता आपली खैर नाही” असा विचार करत.
आता तर ओळख करुन द्यायची काही गरज नाही. अमरीश पुरी. ८०- ९० च्या दशकात असा क्वचितच एखादा सिनेमा असेल की ज्यात त्यांनी विलन साकारला नसेल. ७ फुटाची उंची, भारदस्त आवाज, उत्तम अभिनय ह्या जोरावर त्यांनी फार कमी वेळात हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड, इंग्लिश सिनेमांमध्ये आपली छाप पाडली.
२२ जुन १९३२ साली पंजाबच्या नवीनशर, ब्रिटिश भारतात त्यांचा जन्म झाला. शिमला कॉलेज मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मोठे बंधु मदनलाल पुरी यांनी आधीच विलन म्हणून आपली ओळख हिंदी सिनेमांमध्ये निर्माण केली होती. अमरीश पुरी यांनीही आपल्या मोठ्या भावाच्या पाउलावर पाउल ठेवुन अभिनयात करीअर करण्यासाठी मुंबईला आले. पण त्यांच्या नशिबात एवढ्यालवकर सिनेमा नव्हता.
मुंबईतला स्ट्रगल
मुंबईत आल्यानंतर पहील्याच स्क्रिन टेस्ट मध्ये ते नापास झाले. मुंबईत राहणे सुकर व्हावे म्हणून त्यांनी कर्मचारी भविष्यनिधि योजनेत काम केले. दरम्यान त्यांना कोणीतरी नाटकांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. आपली अभिनयाची भुक भागवण्यासाठी त्यांनी पृथ्वी थिएटर गाठले. सत्यदेव दुबे ह्या अवलिया माणसाशी त्यांची भेट त्यांचे आयुष्य बदलवणारी ठरली. आपल्या अनेक मुलाखतीत अमरीश यांनी दुबेजी आपले गुरु असल्याचे सांगितले आहे. ह्याच वेळी पोटासाठी ते २१ वर्ष इ.एस.आय.सी. मध्ये काम करत राहीले. नाटकांमधून विविध भूमिका करत त्यांनी आपली नाट्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याचा परीपाक म्हणजे त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. इथेच एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची तालीम झाली पण सिनेमा पासून ते अजूनही कोसो दुर होते.
“प्रेम पुजारी” हा पहीला सिनेमा त्यांच्या वाट्याला यायला त्यांच्या वयाची चाळीशी यावी लागली. पण त्यांनी आपली दखल घेतली जाईल असाच अभिनय केला आणि दखल घेतली गेली. मग “आहट- एक अजिब कहाणी”, “रेशमा और शेरा” हे सिनेमे त्याना लगेच मिळाले. दरम्यान इकडे मराठीत विजय तेंडुलकर नावाच्या लेखकाने नाटकाच्या पारंपारीक बाजाला धक्का लावणारी नाटके लिहुन मराठीच नव्हे तर भारतातील नाट्यसृष्टीत खळबळ माजवली होती.
असेच एक सामाजिक मानसिकता दाखवणारे नाटक म्हणजे “शांतता कोर्ट चालु आहे!”. आशयाच्या गंभिरतेमुळे हे नाटक गाजले. सत्यदेव दुबेंना ह्यावर सिनेमा करायचा मोह आवरला नाही. त्यांनी त्यातल्या एका भुमिकेसाठी अमरीश पुरींना विचारले, व्यावसायिक सिनेमा इतक्या प्रतिक्षेनंतर मिळत असतांना ह्या समांतर सिनेमाला हो म्हणणे म्हणजे अवघड निर्णय होता. पण सिनेमाचा आशय, गुरूआज्ञा ह्यामुळे अमरीश पुरींनी आपला पहीला मराठी सिनेमा केला.
ह्यात अमोल पालेकरही सह-कलाकार होते. दुर्मिळ सिनेमांच्या यादीत ह्या सिनेमाचे महत्व खुप आहे. पण त्यानंतरही व्यावसायिक सिनेमे त्यांना मिळत गेले. बऱ्याच वेळेला त्यांना विलनच्याच भूमिका मिळत गेल्या पण ह्याच दरम्यान ते “मंडी”, “पार्टी”, “निशांत”, “मंथन” अशा समांतर सिनेमातही काम करत राहीले. त्यांनी जवळ जवळ ४०० सिनेमांमधे काम केले आहे.
सर्वच सिनेमांची यादी इथे देणे शक्य नाही, पण काही लक्षात राहणाऱ्या भूमिका म्हणजे “मि.इंडीया” मधली “मोगॅंबॉ”ची भूमिका अजरामर आहे. “घातक”, “करण-अर्जुन”, “कोयला”, “हम पांच” हे आणखी काही विलन म्हणून गाजलेले सिनेमे. पण त्यांनी काही चरीत्र भूमिकाही गाजवल्या. “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” मधील काजलचे वडील चौधरी बलवंत सिंग, “परदेस”, “विरासत”, “हलचल”, ” मुझे कुछ केहना है” हे त्यांचे हटके भूमिका असलेले चित्रपट.
हॉलीवूडकरही अमरीश पुरींच्या प्रेमात पडलेले
ह्यांच्या विलन इतका प्रभावशाली होता की बॉलिवूडला त्यांना पर्यायच नव्हता पण हॉलिवूडलाही त्यांची भुरळ पडली. अमेरीकन दिग्दर्शक स्टीफन स्पीलबर्ग “इंडियाना जोन्स” ह्या सिनेमावर काम करतांना विलनच्या रोलसाठी त्यांना अमरीश पुरी हवे होते. चित्रपटाच्या चमुने त्यांना स्क्रिन टेस्टसाठी अमेरीकेत बोलावले. पण अमरीशजींना साफ नकार कळवळा आणि स्क्रिन टेस्टसाठी त्या चमुलाच भारतात येण्याची विनंती केली आणि ते सर्व भारतात आले देखिल.
स्क्रिन टेस्ट झाली आणि त्यांची भूमिका सुद्धा ठरली. “मोला राम” ह्या भुमिकेसाठी त्यांनी टक्कल केले आणि इंग्लिश सिनेमातही हा विलन गाजला. स्पीलबर्ग तर अमरीशजींच्या प्रेमातच पडला. “माझा मते अमरीश पुरी हे जगातील सर्वोत्तम विलन साकारणारे कलाकार आहेत. कदाचित एकमेव आणि पुन्हा होणारही नाही असा कलाकार.” ह्या शब्दात त्यांनी अमरीशजींचे कौतुक केले. ह्याशिवाय रिचर्ड ॲंटंबर्गच्या ऑस्कर जिंकलेल्या “गांधी” या सिनेमा मध्येही त्यांनी गांधीचा सहकारी “खान”ची भूमिका केली होती.
हा माणुस खऱ्या आयुष्यात खुप प्रेमळ होता, हे स्वतः शाहरुख खान सांगतो. आमीर खान “जबरदस्त” नावाच्या फिल्मला साहाय्यक दिग्दर्शकाचे काम करत असतांना अमरीश पुरींना सारखी ॲक्शन कंट्युनिटीची आठवण करुन देत होता आणि सिन मधे घुसलेले अमरीशजी चिडले. त्यांना माहीत नव्हते की हा मुलगा चित्रपटाचे दिग्दर्शक नासिर हुसेन ह्यांचा पुतन्या आहे. नासिरने त्यांना अमिर फक्त आपले काम करत होता ह्याची आठवण करुन दिली आणि अमरीशजींनी चक्क अमिरची माफी मागीतली. असा हा अवलिया “मॉगंम्बो खुष हुआ” म्हणत आपल्याला घाबरवत होता. पण त्यांची पोकळी भरुन काढणारा एकही नट सध्या नाही.
सलाम अमरीशजी. सलाम दुबेजी.