काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अमलात आणली.
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे हे आपण अनेक नेत्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकत असतो आणि पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला कि एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आज भारतात जातीवाद असला तरी त्याची धार बरीच बोथट झालेली आहे. आजही समाजात विषमता दिसून येत असली तरी त्याची तीव्रता व प्रमाण पूर्वीसारखे राहिलेले नाही. ह्याचे श्रेय शाहू, फुले, आंबेडकर ह्यांना व ह्यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांना जाते.
बहुजनांची परिस्थिती सुधारयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य, बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला पण त्यांनी ह्या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले. आज मागास, दलित, बहुजनांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधरली ह्याचे कारण छत्रपती शाहू महाराजांचे कठोर प्रयत्न, त्यांनी आखलेल्या व पूर्णत्वास नेलेल्या योजना.
रयतेचा राजा
रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी ह्यातच शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य व त्यामुळे बहुजनांच्या मनात त्यांना मिळालेले मानाचे स्थान ह्याची कल्पना येते. आजपर्यंत भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु शाहू महाराजांचे वेगळेपण असे कि त्यांनी बहुजनांची केवळ सामाजिक परिस्थिती सुधारण्याकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याची प्रत्यक्ष तरतूद केली.
शिक्षणानंतर बहुजन व मागासलेल्या वर्गाच्या रोजगाराचीही सोय व्हावी, ते आर्थिक दृष्ट्यासुद्धा सक्षम व्हावेत ह्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली व म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. १८९४ साली जेंव्हा त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतला तेंव्हाच त्यांनी बहुजन व मागासवर्गीयांच्या उन्नतीचे उद्दिष्ट ठरवले व आपल्या दूरदर्शी योजनांद्वारे ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेले.
असा रचला पुरोगामी भारताचा पाया
मानसिक गुलामी दूर करायची असेल तर सर्वप्रथम अज्ञान दूर व्हायला हवे हे शाहू महाराजांनी अचूक ओळखले. हे अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गुलामीचे जोखड झुगारून देण्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे शिक्षण. त्यासाठी महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांनी असा आदेशच जारी केला कि सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण घ्यावेच लागेल अन्यथा दंड ठोठावण्यात येईल. शाहू महाराज केवळ आदेश देऊन स्वस्थ बसले नाही तर आपल्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याची संपूर्ण माहिती नियमितपणे त्यांना मिळावी अशीही व्यवस्था केली. ह्यातून त्यांची सर्वसामान्य रयतेप्रती असलेली तळमळ दिसून येते व शाहू महाराजांना लोक रयतेचा राजा का म्हणत हे सुद्धा समजून येते.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम असा झाला कि १८९३ साली प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या जी अतिशय कमी होती, १९२१ सालापर्यंत ती जवळजवळ ४९६ एवढी झाली व शिक्षित विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २७ हजारांपर्यंत वाढली व हाच होता पुरोगामी महाराष्ट्राचा पाया.
ह्या चार सूत्रांवर आधारित होते शाहू महाराजांचे समाज सुधारणा व शिक्षणाविषयीचे तत्वज्ञान
१) प्राथमिक शिक्षण हि पुढील शिक्षणाची पायरी आहे त्यामुळे आधी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे, ज्यामुळे उच्च शिक्षण घेणे सहज शक्य होईल.
२) त्याकाळी शिक्षण घेणे हि केवळ एका विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी होती, त्यासाठी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या घटकांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे ह्याची विशेष तरतूद केली ज्यामुळे तो घटक शिक्षणापासून वंचित राहणार नाही ह्याची काळजी महाराजांनी घेतली.
३) आपल्या संस्थानाच्या सर्व भागांत शिक्षणाचा प्रसार व्हावा व ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये ह्यासाठी त्यांनी शहरांमध्ये मागास व अन्य जमातींसाठी वसतिगृहे चालू केली. परिणामी ग्रामीण भागातील मुलांना शहरात राहणे व शिक्षण घेणे शक्य झाले.
४) शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे ह्यासाठी रोजगार आवश्यक होता, त्यामुळे नोकऱ्यांमध्ये काही राखीव जागांची तरतूद महाराजांनी केली. शाहू महाराजांनी जवळजवळ ३ दशकं राज्यकारभार केला व समाजव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणले. त्याकाळी सवर्ण समाजाची मुलं वेगळ्या शाळेत शिकत व अस्पृश्य समाजातील मुले वेगळ्या शाळेत शिक्षण घेत असत. हि निंदनीय प्रथा सरळसरळ विषमता व जातीवादास खतपाणी घालणारी होती हे महाराजांच्या लक्षात आले व तातडीने त्यांनी आदेश जरी केला कि ह्यापुढे हि पद्धत अस्तित्वात राहणार नाही. सर्वांसाठी एकच शाळा असेल ज्यात सर्व जाती- धर्माची मुले शिक्षण घेऊ शकतील. हा निर्णय समाज व शिक्षण व्यवस्थेवर फार मोठा परिणाम करणारा ठरला ज्यामुळे विषमतेच्या मुळावरच घाव बसला होता.
त्याकाळी वेद व वेदोक्त मंत्र म्हणणे हि एका विशिष्ठ जाती व वर्गाची मक्तेदारी समजली जात होती, ज्यामुळे मोठा संघर्ष उडाला होता. ह्या संघर्षात शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष मदत व पाठिंबा दिला व स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणाऱ्यांना कडाडून विरोध केला. शाहू महाराजांनी घेतलेल्या ह्या भूमिकेमुळे ज्योतिबा फुलेंनी उभारलेल्या सत्यशोधक चळवळीला एक वेगळेच बळ मिळाले ज्याचे दूरगामी परिणाम झाले.
वैदिक पाठशाळेत शिक्षण घेणे हा एका विशिष्ठ जातीचा अधिकार समजल्या जात असे, ह्या जुलमी पद्धतीला शाहू महाराजांनी सडेतोड उत्तर आपल्या कार्याद्वारे दिला. त्यांनी समस्त बहुजनांसाठी वैदिक पाठशाळा सुरु केल्या ज्यात सर्व जातींचे लोक वैदिक शिक्षण घेऊ शकत होते. संस्कृत भाषेचा विकास व्हावा ह्यासाठीही शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले.
जातीअंताची लढाई अनेकवेळा जीवावर बेतली
तत्कालीन समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समतेचे राज्य निर्माण व्हावे ह्यासाठी शाहू महाराजांनी जे अनेक निर्णय घेतले होते त्यामुळे बहुजन समाजाची प्रगती झाली पण त्याच बरोबर काही विशेष वर्ग व समुदायांच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. ह्याच समाजकंटकांनी शाहू महाराजांना संपवण्याचा कट सुद्धा अनेकवेळा रचला परंतु वेळोवेळी महाराज ह्या प्राणघातक कटांतून सहीसलामत बचावले.
विषमता, अज्ञान, जातीयवादाचे निर्मूलन, स्त्री वर्गाला त्यांचे अधिकार मिळवून देणे, शिक्षणाचा प्रचार व प्रसार अशी अनेक कार्य करून बहुजनांचे जीवन सुसह्य करणाऱ्या अश्या ह्या महान राजाला “राजर्षी” हा ‘किताब सुद्धा सामान्य रयतेने दिला.