विचार करा एका महिला पोलीस अधिकाऱ्याने जर खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या गाडीलाच दंड ठोठावला तर ?
होय आपल्या भारताच्या इतिहासामध्ये हे कर्तृत्व एका महिला पोलीस अधिकाऱ्याने करुन दाखवलेल आहे. त्यांचं नाव म्हणजे किरण बेदी, ज्या आज पाँडीचेरी या राज्याचा उपराज्यपाल म्हणून कार्यभार पाहत आहेत. या सर्व प्रकारानंतर किरण बेदी यांच्याबद्दल सामान्य माणसांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
हा काळ होता 1980 चा, या काळामध्ये इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान म्हणून कर्तव्य बजावत होत्या. इंदिरा गांधींना त्यांच्या कडक निर्णयांसाठी इतिहास आजही लक्षात ठेवतो. इंदिरा गांधी यांना भारताच्या “आयरन लेडी” असेही म्हटले जाते. या काळामध्ये इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय वाटचालीच्या सर्वोच्च शिखरावरती होत्या. पण कदाचित त्यांना ही कल्पना नसेल की दिल्ली पोलिसांमध्ये त्यांना त्यांच्यासारखीच एखादी कर्तव्यकठोर महिला अधिकारी गवसेल.
एकदा कर्मचार्याच्या चुकीने इंदिरा गांधी यांची गाडी नो पार्किंगला उभी करण्यात आली. या गाडीचा नंबर होता “डी. एच. एल. 8781”. ही गाडी खुद्द पंतप्रधान यांची आहे आहे याची किरण बेदी यांना कदाचीत कल्पना नसावी. गाडी नो पार्किंग मध्ये उभी आहे म्हणून त्यांनी या गाडीवरती कारवाई केली. पण त्यांना नंतर कळले की ही गाडी भारताच्या पंतप्रधानांची आहे, हे कळल्यानंतर सुद्धा किरण बेदी यांनी कारवाई मागे घेतली नाही. कारण किरण बेदी तेवढ्या कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी गाडीवरची कारवाई स्थगित केली नाही आणि दंड भरल्यानंतरच गाडीची सोडवणूक झाली.
इंदिराजी तेव्हा विदेश दौऱ्यावर होत्या. हा प्रकार इंदिरा गांधी यांना अमेरिकेत कळाला त्यावेळी त्यांना किरण बेदी यांचे कौतुक वाटले. जेव्हा इंदिरा गांधी परत भारतामध्ये आल्या, तेव्हा त्यांनी सर्वात पहिल्यांदा किरण बेदी यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.
किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाब राज्यातील अमृतसर या शहरांमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाश पेशावरीया असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव प्रेमलता असे आहे. किरण बेदी यांचे प्राथमिक शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूल अमृतसर येथे पूर्ण झाले. त्यांनी इंग्लिश हा विषय घेऊन त्यांनी पुढे कला शाखेत पदवी संपादन केली. त्यासोबतच त्यांनी पॉलिटिकल सायन्स हा विषय घेऊन एम.ए. पूर्ण केले. आयआयटी दिल्लीने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरवही केलेला आहे.
किरण बेदी यांना लहानपणापासून टेनिस खेळण्याचा छंद होता. टेनिस या खेळामध्ये त्यांना विशेष प्राविण्य प्राप्त होते. त्यांनी या खेळामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्यांनी एशियन टेनिस चॅम्पियनशिप आणि एशियन लेडीज टायटल जिंकलेला आहे. 1972 मध्ये त्यांनी भारतीय पोलिस सेवा मध्ये जबाबदारी स्वीकारली. यासोबतच त्यांना देशातील पहिली महिला पोलीस अधिकारी म्हणूनही ओळखण्यात येते. किरण बेदी त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असत. त्यांनी कर्तव्य बजावत असताना नशिल्या पदार्थांवरती नियंत्रण आणण्यासाठी विशेष कार्य केलेले आहे.
तिहार जेलमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांनी कैद्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. कैद्यांच्या कल्याणासाठी त्यांनी जेलमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना “रॅमन मॅगसेस” या प्रसिद्ध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी “नवज्योति इंडिया फाउंडेशन” आणि “इंडिया विजन फाउंडेशन” या नावाने दोन सेवाभावी संस्थांची निर्मितीही केलेली आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे, यामध्ये जर्मन फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा जोसफ ब्युज पुरस्कार, नॉर्वे एशिया रीजन अवॉर्ड, अमेरिकन मॉरिसन टॉम कॉक पुरस्कार देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांना इटली तर्फ 2002 मध्ये “वुमन ऑफ द इयर” हा पुरस्कारही देण्यात आला होता.
अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात त्या सक्रियपणे सहभागी होत्या. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार करण्यात आले होते. त्यांना या निवडणुकीमध्ये मात्र यश प्राप्त करता आले नाही. मात्र त्यानंतर 31 मे 2016 मध्ये किरण बेदी यांनी पॉंडिचेरी या राज्यात उपराज्यपाल म्हणून कार्यभार पाहण्यास सहमती दर्शवली. आज त्या त्यांचे कर्तव्य तेवढ्याच कर्तव्यकठोर भावनेने निभावत आहेत. त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तक लिहिले गेली आहेत.