‘काँग्रेसचे अमित शाह’ कर्नाटकचे सरकार वाचवणार का?

378
काँग्रेसचे अमित शाह, Congress, DK Shivakumar, कर्नाटक सरकार, काँग्रेस, महाराष्ट्र, डी के शिवकुमार

काय होणार कर्नाटकात! काँग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार राहणार कि कोसळणार ह्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून काही ना काही कुरबुरी चालू आहेतच पण आता या सरकारला मोठा हादरा बसलाय.

मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात असतांना इकडे सत्ताधारी पक्षांच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले. हे सरकार वाचवण्यासाठी आणि नाराज आमदारांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसने आपल्या संकटमोचकाला म्हणजेच डी के शिवकुमार ह्यांना पाठवले असून डि के शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. इथे ते नाराज आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना त्यापासून रोखले जात आहे असे समजते.

डी के शिवकुमार ह्यांच्या राजकारणाची वेगळी शैली हे त्यांचे बलस्थान आहे व त्याचमुळे त्यांचे प्रतिस्पर्धी व विरोधकसुद्धा त्यांचा आदर करतात. कर्नाटकात लिंगायत बहुसंख्य असूनसुद्धा वोक्कलिंग असलेल्या डी के शिवकुमार ह्यांनी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७ वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले डी के, एस एम कृष्णा मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री राहिलेले आहेत. ते गांधी कुटुंबियांचे निकटस्थ समजले जातात.

महाराष्ट्रामध्ये जेव्हा असाच पेचप्रसंग उभा राहिला होता व विलासराव देशमुख सरकार कोसळते कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना तत्कालीन विलासराव सरकारच्या मदतीला डी के शिवकुमार धावून आले होते. २००२ साली महाराष्ट्रातील काँग्रेसचे काही आमदार फुटणार व विलासराव सरकार अस्थिर होणार अशी कुणकुण काँग्रेसला लागली होती. त्यासाठी काँग्रेसने आपले सर्व आमदार शेजारील कर्नाटक राज्यात हलवले होते.

त्यावेळी त्या सर्व आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी डी के शिवकुमार ह्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी सर्व आमदारांना इगलटोन रिसॉर्ट ह्या बेंगळुरुबाहेर असलेल्या हॉटेलवर आठवडाभर ठेवले होते व ज्यादिवशी विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडण्यात आला त्याचदिवशी ते त्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईला गेले व काँग्रेसने विश्वासदर्शक ठराव जिंकत आपले सरकार वाचवले. तेव्हापासून डी के शिवकुमार ह्यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाते. डी के जेडीएस-काँग्रेसचे सरकार वाचवू शकणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here