2016 मध्ये भारतीय खेळाडूंवर टीका करण्याच्या आरोपावरून हर्षा भोगलेना आयपीएलमध्ये समालोचनासाठी काही काळ बंदी घालण्यात आलेली
भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर आज क्रिकेट भारताच्या रक्तात भिनलेला आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक खेळाडूंनी भारतीय संघासाठी खेळून आपले नाव कमावले आहे. अनेक धुरंदर खेळाडू आजही त्यांच्या खेळण्याच्या शैलीमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आज या लेखामध्ये आपण अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याने क्रिकेटला सर्वस्व मानत आपली कारकिर्द गाजवली, परंतु या व्यक्तीने एकही अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. आपण बोलत आहोत प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याबद्दल.
एका सामान्य मराठी घरातून आलेल्या या व्यक्तीने क्रिकेटमध्ये स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यश प्राप्त केले आहे. भारतामध्ये असा कुठलाही क्रिकेटरसिक नसेल ज्याला हर्षा भोगले हे नाव माहितीच नाही. हर्षा भोगले यांचा जन्म एका सामान्य मराठी भाषिक कुटुंबामध्ये झाला त्यांचे कुटुंब हैदराबाद येथे स्थायिक झालेले होते. हर्षा भोगले यांनी आपले प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथेच पूर्ण केले. त्यानंतर केमिकल इंजीनियरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी आयआयएम अहमदाबाद गुजरात येथे पूर्ण केले.
पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी एका जाहिरात तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्ष त्या कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी ते काम सोडून दिले आणि एका खेळाचे मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यास आरंभ केला. येथे त्यांना खेळाबद्दल अधिक माहिती प्राप्त होत गेली. खेळामध्ये त्यांची रुची वाढू लागली आणि याच कंपनीमध्ये त्यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला एक कलाटणी मिळाली.
कंपनीत काम करत असताना त्यांना क्रिकेट बद्दल प्रचंड आवड निर्माण झाली आणि क्रिकेटमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा तयार झाली. दोन वर्षांनंतर त्यांनी एपीसीएल या स्थानिक क्रिकेट संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आणि आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीला प्रारंभ केला. हर्षा भोगले यांना सुरुवातीपासूनच समालोचन करण्याची फार आवड होती. त्यांचा आवाजही अत्यंत मधुर आणि मंजुळ होता. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर भारतीय संघाच्या सामन्यादरम्यान समालोचन केले होते. काही दिवसांनी त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत होणाऱ्या सामन्याच्या समालोचनासाठी आमंत्रित करण्यात आले आणि येथूनच हर्षा भोगले हे नाव क्रिकेट जगतामध्ये अभिमानाने घेतले जाऊ लागले.
1995 पासून हर्षा भोगले ESPN या क्रिडा चॅनेलसाठी जगभरामध्ये काम करत आहेत. त्यांनी याच चॅनेलसाठी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यासाठी हर्षा भोगले प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक क्रिकेट संबंधी मालिकांमध्येही सूत्रसंचालक म्हणून काम पाहिलेले आहे.
हर्षा भोगले यांनी आयपीएलच्या प्रत्येक सीजन साठी समालोचन केलं आहे. मध्यंतरी 2016 मध्ये भारतीय खेळाडूंवर टीका करण्याच्या आरोपावरून त्यांना आयपीएलमध्ये समालोचनासाठी काही काळ बंदी घालण्यात आली होती. पण भारतातील क्रिकेट रसिकांनी हर्षा भोगले यांना पाठिंबा दाखवला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा समालोचक झाला नाही आणि कदाचित या पुढेही होणार नाही.